नंदुरबार – जनतेने दिलेला जनादेश मान्य करून त्याचा सन्मान करीत मी पुढील कामाला सुरुवात करीत आहे. पराभवामुळे माझी व्यस्तता संपुष्टात आली असून आता खऱ्या अर्थाने पक्ष कार्यासाठी मी पूर्ण वेळ उपलब्ध राहणार आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी आघाडीवर राहील यासाठी आतापासून मी कामाला लागणार आहे; अशा शब्दात भारतीय जनता पार्टीच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी पराभवानंतर सुरू केलेल्या नव्या इनिंगची आज माहिती दिली.
मागील दहा वर्षाच्या काळात नंदुरबार लोकसभा मतदार संघात विविध विकास कामे केली आहेत. मेडिकल कॉलेज मंजूर करण्यासह राष्ट्रीय महामार्गाच्या कामांना मंजुरी केंद्र • सरकारच्या माध्यमातून मिळवून दिली. दहा वर्षात साडेपाचशे कोर्टपिक्षा अधिक निधी आणून माझ्या खासदारकीच्या काळात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत. परंतु विरोधक काँग्रेस पक्षाने आदिवासी बांधवांमध्ये संविधान व आरक्षणाबाबत गैरसमज पसरविला. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जाण्याची वेळ आली. या निवडणुकीचे कुणी श्रेय घेऊ नये कारण आदिवासी बांधवांमध्ये संविधानाबाबत अपप्रचारातून गैरसमज पसरवला गेला. तरीही जनतेने मला दिलेल्या जनादेशाच्या मी सन्मान करीत असून यापुढेही नंदुरबार लोकसभा मतदार संघातील जनतेच्या सेवेसाठी नेहमी तत्पर असेल, अशी माहिती माजी खासदार तथा भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. हिना विजयकुमार गावित यांनी दिली.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचा धक्कादायक निकाल लागला असून महायुतीच्या उमेदवार तथा भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉक्टर हिना गावित अनपेक्षितपणे पराभूत झाल्या आहेत. आदिवासी विकासाचे रेकॉर्ड ब्रेक काम करून सुद्धा आदिवासी मतदारांनीच भाजपाकडे पाठ फिरवल्याचे येथे पाहायला मिळाले. त्या पार्श्वभूमीवर सविस्तर म्हणणे मांडण्यासाठी नंदुरबार येथे निवासस्थानी आज दिनांक 6 जून 2024 रोजी सायंकाळी डॉ. हिना गावित यांनी पत्रकार परिषद घेतली. याप्रसंगी आ.आमश्या पाडवी उपस्थित होते.
डॉक्टर हिना गावित म्हणाल्या, २०२४ च्या निवडणुकीत काँग्रेसने संविधान व आरक्षणाबाबत अपप्रचार केला. त्या अपप्रचारामुळे आदिवासी समाज बांधवांमध्ये गैरसमज पसरण्याचे काम काँग्रेस पक्षाने केले. म्हणूनच राज्यात ज्या ठिकाणी आदिवासी राखीव मतदार संघ आहेत, त्या ठिकाणी काँग्रेसच्या अपप्रचारामुळे भाजपचे उमेदवार पराभूत झाले आहेत. त्यामुळे माझ्या पराभवाचे इतरांनी म्हणजे माझ्या विरोधकांनी श्रेय घेऊ नये, कारण हा पराभव केवळ विरोधकांनी संविधान व आरक्षणाबाबत केलेल्या खोट्या व अपप्रचारामुळे झाला आहे. त्या उलट वास्तव अस आहे की माझ्या राजकीय विरोधकांच्या क्षेत्रातच मला मताधिक्य मिळालं आहे. तरीही जनतेने दिलेला जनादेश मान्य करून त्याचा सन्मान करीत, पुढील कामाला सुरुवात करीत आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी आघाडीवर राहील यासाठी आतापासून मी कामाला लागणार आहे. पराभवामुळे माझी व्यस्तता संपुष्टात आली असून आता खऱ्या अर्थाने पक्ष कार्यासाठी मी पूर्ण वेळ उपलब्ध राहणार आहे. पुढील पाच वर्षात जनतेची कामे करण्यासाठी नेहमीच तत्पर राहील. जे राजकीय विरोधक मानतात, त्यांच्यात भागात मला मतदानात लीड भेटला आहे. म्हणून त्यांनी आपल्यामुळे माझा पराभव झाला असा श्रेय घेऊ नये. मी आता खासदार नसली तरी जनतेच्या सेवेसाठी कामे करणार असून पुढील पाच वर्षातील लोकसभा निवडणुकीसाठी तत्परतेने काम करेल, असेही डॉ. हिना गावित यांनी यावेळी सांगितले.
यावेळी डॉ. हिना गावित म्हणाल्या की, नंदुरबार लोकसभा मतदारसंघात निवडणुकीमध्ये जनतेने मला लाखांच्या मताने जनादेश दिला आहे. त्या जनादेशाचा मी आदर व सन्मान करते. मतदारांचे मी खुप आभारी आहे. खासदारकीच्या माध्यमातून मागील दहा वर्षाच्या कार्यकाळात नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी मोदी सरकारच्या माध्यमातून भरपूर निधी आणला. नंदुरबार जिल्ह्यात मेडिकल कॉलेज, आयुष हॉस्पिटल, क्रिटिकल केअर हॉस्पिटल हे माझ्या ■ काळातच मंजूर झाले असून त्याचे भूमिपूजन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील कुपोषण कमी करण्यासह सर्वसामान्यांना आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी केंद्र सरकारच्या योजना, निधी मिळवून दिला. आता 195 कोटी रुपये खर्चाची इमारत उभारणी चालू आहे. याचा मला अभिमान आहे, असे माजी खासदार डॉक्टर हिना गावित म्हणाल्या. रस्ते विकासाच्या कामांचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातून जाणाऱ्या सुरत-अमरावती या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम माझ्या कार्यकाळातच पूर्ण झाले आहे. तसेच जिल्ह्यातील इतर राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गांना देखील मंजुरी मिळाली आहे. आता ८९० किलोमीटरच्या महामार्ग होत असून नंदुरबार शहरातील नवापूर चौफुली पासून ते तळोदा चौफुली पर्यंत काही ठिकाणी उड्डाणपूल तयार केले जाणार आहेत. ही कामे निवडणुकी अगोदरच झाली असती..परंतु निवडणूक लागल्याने ती राहिली होती. महामार्गाची कामे मागील दोन वर्षाच्या काळातच मंजूर झाली असून आता त्यांना सुरुवात होणार आहे. नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या विकासासाठी अवघ्या दहा वर्षाच्या कार्यकाळात सुमारे साडेपाचशे कोटींपेक्षा जास्त निधी केंद्र सरकारच्या माध्यमातून आणण्यात आला आहे.