योगेंद्र जोशी, नंदुरबार
विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर सध्या वेगवेगळ्या अंगाने परीक्षण, निरीक्षण मांडले जात आहे. विशेषत: अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातील हाय व्होल्टेज लढतीचे निकाल अधिक चर्चेत आहेत. पन्नास वर्षापासून काँग्रेसने एक हाती राखलेल्या या अभेद्य गडावर एकनाथराव शिंदे गटाच्या शिवसेनेने आमशा पाडवी यांच्या माध्यमातून प्रथमच भगवा फडकवला आणि नंदुरबार जिल्ह्यात आपले खाते ओपन केले ही या लढाईची निष्पन्नता आहे. तथापि भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्ते पदाचा राजीनामा देऊन अपक्ष उमेदवारी ज्यांनी लढवली त्या डॉक्टर हिना गावित यांना विजयाने हुलकावणी कशी दिली? डॉक्टर हिना गावित यांच्या लढाईला नेमका काय अर्थ होता? मोदी लाटेतसुद्धा के सी पाडवी यांनी अभेद्य राखला तो अक्कलकुवा विधानसभेचा काँग्रेस गड यावेळी शिंदे गटाच्या ताब्यात कसा काय गेला? के सी पाडवी यांच्या पराभवाला नेमके काय कारण झाले? आमशा पाडवी यांना प्राप्त झालेला विजय त्यांना स्वबळावर मिळवणे खरोखर शक्य होता का? त्यांच्या विजयाचे शिल्पकार कोण? अशा विविध मुद्द्यांवर सध्या चर्चा रंगल्या असून जो तो आपापल्या परीने तर्क लावत आहे. पण याचा वेगळ्या अंगाने विचार होणे आवश्यक वाटते. विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांना मिळालेली मतांची आकडेवारी स्पष्टपणे दर्शवते की, आमशा पाडवी यांना प्राप्त झालेला विजय खरोखर त्यांना शक्य झालाच नसता. केवळ आणि केवळ डॉक्टर हिनाताई गावित यांनी अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात धडाकेबाज पद्धतीने उभी केलेली परिवर्तनाची लढाई आमशा पाडवी यांच्या कामी आली. डॉ. हिनाताई गावित यांनी घडवलेल्या मत विभाजनामुळे आमशा पाडवी यांना जिंकणे शक्य झाले आहे.
कारण, अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातील लढाईचा आत्मा म्हणावा असा हा परिवर्तनाचा मुद्दा होता. परिवर्तनाचा मंत्र देऊन डॉक्टर हिना गावित यांनी उभे केलेले वादळ काँग्रेसच्या अभेद्य गडाला तडा देणारे ठरले, हे कधीही नाकारता येणार नाही. त्यासाठी आधी अक्कलकुवा आणि अक्राणी या दोन तालुक्यांमधील भौगोलिक स्थिती, पारंपारिक राजकीय संदर्भ आणि विद्यमान राजकीय मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक लोकांची बनलेली मानसिकता लक्षात घ्यावी लागेल त्याचबरोबर प्रत्येक उमेदवाराला मिळालेली मते गांभीर्याने लक्षात घेतली पाहिजे. या सर्वांचे सूक्ष्म आकलन केल्यानंतर कोणालाही हे पण लक्षात येईल की, डॉक्टर हिना गावित यांचा लौकिक अर्थाने पराभव झालेला असला तरी राजकीय अर्थाने मात्र त्यांचा विजयच झालेला आहे. होय, विजयच झाला आहे.
परिवर्तनाच्या लढाईने घेतला
‘गद्दारी’ आणि ‘नेरेटिव्ह’चा बदला
अक्कलकुवा आणि धडगाव या दोन्ही दुर्गम तालुक्यांच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये रंगलेल्या हाय व्होल्टेज राजकीय लढाईला लोकसभा निवडणुकीतील काही संदर्भ आहेत. ते असे की, लोकसभा निवडणुक प्रसंगी काँग्रेस पक्षाने अक्कलकुवा विधानसभेचे काँग्रेस आमदार तथा प्रस्थापित नेते के सी पाडवी यांचे चिरंजीव गोवाल पाडवी यांना उमेदवारी दिली होती. अत्यंत नवखे असल्यामुळे आणि ठोस राजकीय कार्याची पार्श्वभूमी नसल्यामुळे गोवाल पाडवी निवडून येणारच नाहीत, अशी खात्री भाजपा समर्थकांना होती. डॉक्टर हिना गावित यांचा विजय त्या वेळी खरोखर दृष्टीपथात होता. परंतु आदिवासींचे आरक्षण धोक्यात येणार आणि संविधान बदलले जाणार, हा तद्दन खोटा प्रचार भाजपा विरोधात अत्यंत विषारीपणे काँग्रेस मंडळीने सर्व आदिवासी समूहांमध्ये रुजवला. आपल्या अस्तित्वाला भाजपामुळे धोका निर्माण झालाय; हा गैरसमज आदिवासी समूहांमध्ये निर्माण करण्यात राहुल गांधींपासून केसी पाडवी पर्यंत कोणीही कसर सोडली नाही. काँग्रेसने ज्याप्रमाणे मुस्लिम कट्टरता आणि दलित कट्टरता वाढीस लावली त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील आदिवासी भागात आदिवासी कट्टरता वाढीस लावण्यात राहुल गांधी यशस्वी झाले. परिणामी नेरेटिव्हचे अस्त्र दुर्दैवाने यशस्वी झाले आणि खरोखर आदिवासी मतदारांनी भाजपा विरोधात भूमिका घेत लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला भरघोस मतदान केले. त्यामुळे डॉक्टर हिना गावित यांचा त्या निवडणुकीत पराभव झाला, तर गोवाल पाडवी आश्चर्यकारक रित्या निवडून आले. गोवाल पाडवी यांच्या विजयाला दुसरे कारण हे पण आहे की, महायुतीचा घटक असताना सुद्धा एकनाथराव शिंदे गटाच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी उघडपणे काँग्रेसशी हात मिळवणी करीत लोकसभा निवडणूक प्रसंगी डॉक्टर हिना गावित यांना पराजित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते. डॉक्टर हिना गावित यांच्या शब्दात सांगायचे तर, शिंदे गटाची गद्दारी त्यांना भोवली होती. हे प्रकरण इथेच थांबले नाही. आताच्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा चंद्रकांत रघुवंशी यांच्या माध्यमातून शिंदे गटाने डॉक्टर हिना गावित यांच्याप्रमाणेच महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनाही नंदुरबारपासून मंत्रालयापर्यंत सर्व ठिकाणी अडचणीत आणण्याची भूमिका निभावली. महायुतीचे राजकारण नासवणारी स्थानिक नेत्यांची ही खेळी वरिष्ठ नेत्यांनी का थांबवली नाही? हा प्रश्न तेव्हाही चर्चेत होता आजही लोकचर्चेत कायम आहे. नंदुरबार जिल्ह्यात भाजपाचा आवाज मजबूत करणाऱ्या नेतृत्वाला भाजपाच्याच वरिष्ठ नेत्यांनी योग्य साथ देऊ नये हे खरोखर मोठे अनाकलनीय आहे.
डॉ. हिना गावित यांची लढाई साध्य?
दरम्यान, लोकसभेतील तो पराभव आणि अद्याप चालू असलेली गद्दारी जिव्हारी लागल्यामुळे तितक्याच जोरकसपणे बदला घेण्याची प्रतिज्ञा डॉक्टर हिना गावित यांनी केली होती. म्हणूनच भारतीय जनता पार्टीतील आपल्या राष्ट्रीय पातळीच्या कारकिर्दीचा विचार न करता त्यांनी थेट राजीनामा ठोकून अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी लढवली. के सी पाडवी यांच्या प्रस्थापित नेतृत्वाला म्हणजे काँग्रेसच्या वर्चस्वाला संपवण्या बरोबरच शिंदे गटाला धक्का देण्यासाठी परिवर्तनाची लढाई उभी करण्याचा निर्णय त्यांनी केला होता. या सर्व पार्श्वभूमीतूनच अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत रंगलेली पहायला मिळाली. (विशेष बाब आशी की, गद्दारी प्रकरणाशी वैयक्तिक आमशा पाडवी यांचा कधीही काहीही संबंध नव्हता तरी त्यांना राजकीय विरोधाची किंमत मोजावी लागली) पुढे आमश्या पाडवी विजयी झाले आणि काँग्रेसचे प्रस्थापित नेतृत्व के सी पाडवी हे पराभूत झाले, हे आपण सर्व जाणतातच. डॉक्टर हिना गावित स्वतः पराजित झाल्या असल्या तरी त्यांनी ज्या परिवर्तनासाठी अपक्ष लढाई लढवली ती मात्र यशस्वी झाल्याचे दर्शवणारे हे चित्र आहे. हाच त्यांचा विजय मानला जात आहे. आमश्या पाडवी विजयी झाले खरे, परंतु ३ हजार २८९ एवढेच मताधिक्य मिळाले असल्याने एक प्रकारे शिंदे गटाला रोखण्यात डॉक्टर हिना गावित यशस्वी झाल्या, असा अर्थ लावला जातो. आदिवासी आरक्षण हक्कावर बोलले म्हणून पद्माकर वळवी यांना एकही गावात फिरू देणार नाही, असा इशारा देणारे चंद्रकांत रघुवंशी यांच्या बद्दल आदिवासी भागात किती तीव्र नाराजी आहे हे निवडणूक काळात सर्वांना पाहायला मिळाले होते. हे घडले नसते तर आमशा पाडवींचे मताधिक्य वाढले असते यावरही सध्या चर्चा आहे.
मतांची आकडेवारी काय सांगते?
या दोघांच्या तुलनेने सुक्ष्म संपर्क आणि कसब असलेले पुरेसे मनुष्यबळ हाताशी नसतानाही डॉक्टर हिना गावित यांनी दिलेली एकाकी लढत निश्चितच त्यांच्या चाहत्यांना कौतुकास्पद वाटावी अशी आहे. त्यांनी मिळवलेली मते सुध्दा मोठी उल्लेखनिय आहेत. धडगाव तालुक्यात म्हणजे के सी पाडवी यांच्या कार्यक्षेत्रात डॉ. हिना गावित यांना दोन्ही प्रमुख उमेदवारांपेक्षा जास्त म्हणजे 30 हजार 930 मते मिळाली, तर अक्कलकुवा तालुक्यात 36 हजार 101मते मिळाली. अटीतटीच्या या लढतीत आमश्या पाडवी यांना एकूण 72 हजार 629 मते, अॅड.के.सी. पाडवी यांना 69 हजार 725 तर डॉ. हीना गावित यांना 67 हजार 31 मते मिळाली आहेत. माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी 8 हजार हून अधिक मते घेतली. नोटा च्या माध्यमातून वाया गेलेली मते 5 हजार 71 इतके आहेत. या मतांचा घोळ लक्षात घेता डॉक्टर हिनाताई गावित यांचा विजय शक्य होता हेच अधोरेखित होते. आमशा पाडवी यांच्या एकट्याकडून के सी पाडवी पराजित झालेच नसते हे देखील पुन्हा अधोरेखित होते.
आता डॉ. हिना गावित यांच्या रडारवर कोण?
विशेष हे पण लक्षात घेण्यासारखे आहे की, सलग सात वेळा निवडून आलेले असताना कोणताही उल्लेखनीय विकास केलेला नाही, असा आरोप आदिवासी संघटनांकडून होत असताना आणि अँटिइनकंबसी असताना के सी पाडवी यांना इतकी मते मिळतात; हा महायुतीने गांभीर्याने घेण्याचा विशेष मुद्दा आहे. संविधान बचाव मोहीमेचे समर्थन करणारे इथल्या दुर्गम भागात कसे जोरदार आहेत याचेच हे निदर्शक आहे. काँग्रेसचे खासदार या नात्याने आताच्या विधानसभा निवडणुकीनिमित्त गोवाल पाडवी यांना जिल्हास्तरीय कामगिरी बजावण्याची सुवर्णसंधी होती. तथापि त्यांची ती सर्व समावेशक कामगिरी जाहीरपणे त्यांच्या कार्यकर्त्यांना देखील जाणवली नाही. काँग्रेसला धाडसी युवा नेतृत्व मिळाल्याचे लोकसभा निवडणुक निकालानंतर जे म्हटले जात होते तो भ्रम असल्याचे आज अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांना वाटत आहे. डॉक्टर हिना गावित यांचे युवा नेतृत्व याच्या काही पटीने प्रभावी आहे; हे आता भाजप नेतृत्वाने अधिक गांभीर्याने लक्षात घ्यायला हवे. दरम्यान अपक्ष उमेदवारी करून डॉक्टर हिनाताई गावित यांनी राजकीय धक्के देण्याचे वैयक्तिक लक्ष पूर्ण केले त्याच धर्तीवर ते पुढील काम पार पाडतील असे संकेत आहेत. त्यांच्या रडारवर आता पुढील कोण? हे नंतर स्पष्ट होईल. तुर्त देवेंद्र फडणवीस यांचे शब्द उसने घेऊन म्हणता येईल की, बाज की असली उडान बाकी हैं !
———-