नंदुरबार – महायुतीच्या तथा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार डॉक्टर हिना विजयकुमार गावित यांनी दिनांक 27 एप्रिल 2024 रोजी प्रचाराचा श्री गणेशा केला त्या क्षणापासून झंजावाती प्रचार फेऱ्या सुरू केल्या असून नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात संपर्क करायला प्राधान्य दिले आहे.
उमेदवार डॉक्टर हिना गावित यांचे पिताश्री तथा महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित हे स्वतःच त्यांच्या प्रचाराची धुरा आणि नियोजन सांभाळत आहेत़. प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक मान्यवरांशी व्यक्तिगत संपर्क करणे त्यांनी चालू ठेवले आहे.भाजपाच्या प्रचारकांचे फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम आणि व्हाट्सअप याद्वारे लोकांशी संपर्क करणे चालू आहे. त्यामुळे नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील आठही तालुक्यात दाही दिशांना भाजपाचा प्रचार चालल्याचे पाहायला मिळते. तर, नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी सुध्दा नंदुरबार तालुक्यातील ग्रामीण परिसर पिंजून काढण्याला वेग दिला असून शनिमंडळ, कोपर्ली, खोंडामळी, नाशिंदे भागातील सर्व लहान गावांमधून नुकताच संपर्क पूर्ण केला. भाजपाचे महामंत्री विजय भाऊ चौधरी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी, माजी आमदार शिरीष चौधरी, श्याम बापू मराठे व अन्य पदाधिकारी आपापल्या स्तरावर संपर्क अभियानाला गती देत आहेत.
साक्री तालुक्यात एकनाथराव शिंदे गटाच्या शिवसेनेच्या आमदार मंजुळाताई गावित, राष्ट्रवादीचे सुरेश सोनवणे भाजपाचे उपाध्यक्ष चंद्रजीत पाटील, वसंत घरटे आदींनी डॉक्टर हिना गावित यांच्या समवेत वेगवान प्रचार फेऱ्या करून मागील दोन दिवसात ग्रामीण संपर्क पूर्ण केला. भाजपाचे आमदार राजेश पाडवी हे स्वतः जातीने मंत्री डॉक्टर गावित आणि उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्यासोबत बैठका कॉर्नर सभा आणि मिरवणुकांमधून सहभागी दिसले. तळोदा शहादा विधानसभा क्षेत्रात माजी आमदार पद्माकर वळवी यांनी डॉक्टर हिना गावित यांच्या वतीने भेटीगाठीवर भर दिला आहे. शिरपूर तालुक्यात माजी मंत्री अमरीश भाई पटेल, भाजपाचे आमदार काशीराम पावरा, लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी तुषार रंधे, तसेच अक्कलकुवा धडगाव तालुक्यातील दुर्गमपट्ट्यात शिंदे गटाचे आमदार आमशा पाडवी आणि प्रत्येक तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी भाजपाच्या प्रचारात कार्यरत दिसत आहेत. एकंदरीतच भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांचा दाही दिशांना प्रचार वेगात आला आहे.
गोवाल यांचा अस्तंबात शुभारंभ
दरम्यान, काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांनी अस्तंबा येथील पुरातन श्रद्धास्थानी जाऊन आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. त्यांचे पिताश्री तथा माजी मंत्री एडवोकेट के सी पाडवी आणि काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी त्यांच्या समवेत होते. काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावरून प्रचाराचा भडीमार करण्यात भर दिला आहे. गोवाल पाडवी हे प्रथमच राजकारणात आले असल्यामुळे आपली ओळख रुजवण्यासाठी त्यांनी प्रत्येक तालुक्यात झपाट्याने पहिली प्रचार फेरी पूर्ण केली. गोवा पाडवी आणि त्यांच्या समर्थकांनी आता ग्रामीण भागात देखील संपर्क फेरी काढायला प्रारंभ केला असून लवकरच त्यांच्या कॉर्नर सभा सुरू होतील असे काँग्रेस पक्षातून सांगण्यात आले.