ढेकाटी-वाल्हेरी शिवारातील खूनाचा ४८ तासात उलगडा; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

नंदुरबार – अतिदुर्गम भागातील ढेकाटी-वाल्हेरी शिवारात दगडाने ठेचून झालेल्या खूनाचा अवघ्या ४८ तासात उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले. सीसीटीवी फुटेज आणि तत्सम कोणतेही पुरावे हाती नसताना निरीक्षक रवींद्र कळमकर कामगिरी करून दाखवली.
 पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुरूपसिंग भोंग्या नाईक (वय 75) रा. ढेकाटी ता. तळोदा जि. नंदुरबार हे आपले दिवसभरातील शेतीचे काम संपवून सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास घरी जात असतांना त्यांना ढेकाटी वाल्हेरी शिवारात नर्मदानगर पुनवर्सन येथे एका दादरच्या शेताच्या बांधावर एका मनुष्याचे प्रेत रक्ताच्या थारोळ्यात निपचित पालथे पडलेले दिसले. तो मृत अवस्थेतील व्यक्ती म्हणजे त्यांचा मुलगा राजू असल्याचे त्यांना कपड्यावरून लक्षात आले. स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलीसांना पाचारण केले. पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी, अक्कलकुवा संभाजी सावंत, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, तळोदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक केलसिंग पावरा यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. मृत व्यक्तीच्या डोक्यावर जखमेच्या खूणा होत्या व कानातून रक्त येत होते. सदरचा प्रकार हा घातपाताचा असल्याने सदर बाबत मयताचे वडिल सुरूपसिंग भोंग्या नाईक वय-75 धंदा- शेती रा. ढेकाटी ता. तळोदा जि. नंदुरबार यांचे फिर्यादीवरुन तळोदा पोलीस ठाणे येथे अज्ञात आरोपीतांविरुध्द् खूनाचा गुन्हा नोंदविण्यात आला.
घटनास्थळी कोणत्याही प्रकारचे पुरावे, मोबाईल, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, अतिदुर्गम डोंगराळ भाग असल्यामुळे सी.सी.टी.व्ही. तसेच इतर कोणतीही वस्तू मिळून आलेली नव्हती. त्यामुळे गुन्हा उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान पोलीसांसमोर होते. तथापि वरिष्ठांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनांप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या अमंलदारांचे वेगवेगळे पथके तयार करुन पथके तपासासाठी रवाना करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर व त्यांच्या पथकांनी घटनास्थळाच्या अतिदुर्गम डोंगराळ भागातील 10 ते 15 गावे व पाड्यात विचारपूस करून माहिती काढली. परंतु उपयुक्त अशी कोणतीही माहिती पथकांच्या हाती लागत नव्हती. अखेर दिनांक 23/01/2022 रोजी माहिती मिळाली की, मयत राजु सुरूपसिंग नाईक याचे दिनांक 22/01/2022 रोजी सरदारनगर ता. तळोदा येथील उदेसिंग ऊर्फ उद्या याचेशी भांडण झाले होते व तेव्हापासूनच उदेसिंग हा त्याच्या राहत्या घरी व गावात दिसलेला नाही. यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्ह्यातील संशयीत आरोपी उदेसिंग कुशा वसावे याच्यावर लक्ष केंद्रीत
केले. दरम्यान गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली व तेवढ्यावरून ढेकाटी वाल्हेरी गावाचे जंगलातील एका झोपडीत लपून बसलेल्या उदेसिंग कुशा वसावे वय 30 रा. सरदारनगर ता. तळोदा जि. या संशयीतास ताब्यात घेतले. या आरोपीला सन 2015 मध्ये तळोदा पोलीस ठाणे येथे घरफोडी सारख्या गुन्ह्यात 9 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा झालेली होती, असे चौकशी दरम्यान समोर आले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी तपासाचे संपूर्ण कौशल्य वापरून आरोपीतास बोलते केले. तेव्हा त्यानेच हा खून केल्याचे कबुल करीत धक्कादायक माहिती दिली.
त्यांने सांगितले की, स्वत: आरोपी उदेसिंग कुशा वसावे व मयत राजु सुरुपसिंग नाईक हे दोन्ही मित्र होते. दिनांक 22/01/2022 रोजी दुपारी एक ते दिड वाजेच्या सुमारास त्यांच्यात दारुचे पैसे देण्याच्या कारणावरून वाद होऊन मारामारी झाली. तेव्हा उदेसिंग वसावे याने मयत राजु सुरुपसिंग नाईक याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर व अमंलदार यांनी तपासाचे परिपूर्ण कौशल्य वापरुन गुन्ह्याची उकल केल्याने आरोपी उदेसिंग कुशा वसावे वय- रा. सरदारनगर ता तळोदा जि. नंदुरबार यास गुन्ह्याच्या पुढील तपासकामी तळोदा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.
     कुठल्याही प्रकारचा पुरावा, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तांत्रिक पुरावा, सी.सी.टी.व्ही. कॅमेरे नसतांना क्लिष्ठ अशा गुन्ह्यातील आरोपीतास कौशल्यपूर्वक विचारपुस करुन आरोपीतास बोलते केले व गुन्हा उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे म्हणून मा. पोलीस अधिक्षक पी. आर. पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला 25,000/- रुपयांचे बक्षीस जाहिर केले.
ही कामगिरी पोलीस अधिक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधिक्षक विजय पवार, उप विभागीय पोलीस अधिकारी, अक्कलकुवा संभाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहा. पोलीस उप निरीक्षक अनिल गोसावी, पोलीस नाईक सुनिल पाडवी, बापू बागुल पोलीस अमंलदार अभिमन्यू गावीत तसेच संपूर्ण स्थानिक गुन्हे शाखेच्या अमलदार यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!