नवी दिल्ली : सगळ्यात वेगवान धावणारा प्राणी म्हणून ओळखला जाणारा आणि भारतातून नामशेष झालेला चित्ता आता भारतात पुन्हा दिसणार आहे. तब्बल 70 वर्षांपासून भारतात एकही चित्ता राहिलेला नाही परंतु आता भारतात चित्ते आणण्यासाठी भारत सरकार आफ्रिकन देशांशी सल्लामसलत बैठका करत आहे.
यासाठी तयार करण्यात आलेल्या कृती आराखड्यानुसार पाच वर्षांत दक्षिण आफ्रिका, नामिबिया आणि इतर आफ्रिकन देशातून 12-14 चित्ते भारतात आणण्यात येतील. भारतात आणलेल्या या चित्त्यांना जंगलात सोडण्याआधी उपग्रह/GSM-GPS-VHF रेडियो कॉलर बसविण्यात येईल, जेणेकरुन त्यांच्या हालचालींवर दुरून लक्ष ठेवता येईल. जगातील सर्वात वेगवान प्राणी म्हणून ओळखला जाणारा चित्ता हा प्राणी ताशी 90 ते 110 किलोमीटर वेगाने धावू शकतो. चित्ता हा प्राणी मांसाहारी सस्तन प्राणी आहे. शक्यतो लहान प्राण्यांची म्हणजे प्रामुख्याने पक्षी, ससे, लहान हरीण यासारख्या प्राण्यांची शिकार करतो.
भारतातून 1952 मध्ये चित्ता नामशेष झाल्याची घोषणा करण्यात आली होती, सध्या भारताच्या कुठल्याच राष्ट्रीय उद्यानात किंवा वन्यजीव अभयारण्यात एकही चित्ता नाही. विविध उद्याने/संरक्षित क्षेत्र/परदेशातून भारतात चित्त्यांचे बस्तान बसविण्यासाठी गरजेनुसार जवळपास 12-14 सुदृढ जंगली चित्ते (8-10 नर आणि 4-6 मादी) (प्रजोत्पादनाच्या वयात असलेले, जनुकीय वैविध्य असलेले, रोगमुक्त, उत्तम वागणूक असलेले – उदा. मानवाच्या अस्तित्वाशी जुळवून घेणारे, शिकारी प्राण्यांपासून दूर राहणारे, जंगलात शिकार करु शकणारे, आणि एकमेकांचे अस्तीत्व सहन करणारे), दक्षिण आफ्रिका/नामिबिया/इतर आफ्रिकन देशांतून पाच वर्षांत आणले जातील आणि त्यापुढे कार्यक्रमाच्या गरजेनुसार चित्ते आणले जातील.
स्वतंत्र भारतात नामशेष होणारा चित्ता हा एकमेव मांसाहारी प्राणी आहे. भारताच्या जंगलात एकही चित्ता उरला नसल्याने त्यांना परदेशातून आणणे क्रमप्राप्त आहे. चित्ता भारतीय परिसंस्थेचा महत्वाचा भाग, उत्क्रांतीचा महत्वाचा घटक आणि महत्वाचा सांस्कृतिक वारसा होता. त्यांच्या पुनर्स्थापनेमुळे खुली जंगले, गवताळ प्रदेश आणि झुडपी परिसंस्थेचे अधिक चांगले संवर्धन होईल आणि यासाठी ते प्रमुख प्रजाती म्हणून काम करतील.
सध्या सुरु असलेल्या केंद्र सरकार अर्थसहाय्यीत व्याघ्र प्रकल्पातून 38.70 कोटी रुपये, वर्ष 2021-22 ते 2025-26 पर्यंत भारतात चित्ता आणण्याच्या प्रकल्पाला देण्यात आले आहेत. ही माहिती पर्यावरण, वन आणि हवामान बदल, राज्य मंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी आज लोकसभेत दिली.