शहादा: खान्देशातील तापीकाठाला जलसमृध्द बनवणार्या तापी खोरे विकास प्रकल्पाचा आराखडा ज्यांनी आकाराला आणला होता, ते सातपुडा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक, पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे समन्वयक पांडुरंग रामदास पाटील ऊर्फ पी.आर.पाटील (६२) यांचे अल्पशा आजाराने सोमवार दि. ४ ऑक्टोबर रोजी नाशिक येथे निधन झाले. रात्री उशिरा त्यांच्यावर लोणखेडा येथे अंतिम संस्कार करण्यात आले.
पांडुरंग रामदास पाटील हे शहादा तालुक्यातील पाडळदा गावाचे मूळ रहिवासी होते. सातपुडा साखर कारखान्यात सिव्हिल इंजिनिअरपासून त्यांच्या सेवेला सुरुवात झाली. तेव्हापासून ते आजीवन स्व.पी.के.आण्णा पाटील यांच्या सेवेत राहिले. स्व.पी.के.आण्णा यांच्या अनेक महत्वाकांक्षी प्रकल्पांची तांत्रिक आखणी त्यांच्या हातूनच पार पडली होती. तापी खोरे विकास प्रकल्पासंदर्भाने जलतज्ञाला साजेसे त्यांनी केलेले काम विशेष वाखाणले गेले. तापी नदीचे पाणी कुणीकडे वळवल्याने किती गावांना कसा लाभ होईल व कोणत्या साईटवर धरण बंधारे उभारता येतील, याची मूळ कल्पना स्व.पी.के.अण्णांची होती. तथापि ब्लू प्रिंट आखून सांगता येण्या ईतपत बारीक तांत्रिक अभ्यास पांडूरंगभाईंचा होता. काही वर्ष त्यांनी हे परीश्रम घेतले. स्व.पी.के. आण्णा यांनी मुंबईत बैठका घडवल्या. त्यानंतर १९९२ मधे हा प्रकल्प सरकारकडून विचारात घेतला गेला. स्व.पी.के.अण्णा पाटील यांनी तापी पट्ट्यातील धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील ३५ उपसा सिंचन योजना उभारणीसह कार्यान्वित करण्याची त्यांच्यावर जबाबदारी सोपवली ती त्यांनी यशस्वी पार पाडली. तापी खोरे विकास अंतर्गत सुलवाडा, सारंखेडा व प्रकाशा या बॅरेज सर्वेक्षणाची जबाबदारीही त्यांनी पार पाडली. याशिवाय नर्मदा खोर्यातील पाणी बोगद्यातून नंदुरबार जिल्ह्यात आणून नद्या बारमाही करणे तसेच तापी नदी बारमाही प्रवाहित व्हावी, यासाठीच्या खुरिया घाटी प्रकल्पाचेही सर्वेक्षण त्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
याशिवाय २००३ मध्ये कारखान्याचे कार्यकारी संचालक म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला. बंद कारखाना सुरू करून तसेच शेतकर्यांचा विश्वास संपादन करून त्यांनी सातपुडा कारखान्याची यशस्वी धूरा सांभाळली. विविध संस्था, संघटनांचे ते मार्गदर्शक होते. त्यांच्या पश्चात पत्नी पुरुषोत्तनगरच्या सरपंच ज्योती पाटील, मुलगा, मुलगी, सून, जावई असा परिवार आहे. ते सातपुडा कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे समन्वयक प्रा. मकरंद पाटील यांचे मेहुणे होत.