तीन जिल्ह्यातील दिग्गज नेते मदतीला घेऊन सुद्धा साक्रीत नागरेंना नडली ‘एंटी इनकम्बेन्सी’

साक्री –  येथील नगरपंचायतीत तब्बल 30 वर्षांनंतर सत्तांतर घडले असून येथे सर्वाधिक अकरा जागा जिंकून भारतीय जनता पार्टीने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. 30 वर्षे एक हाती सत्ता ठेवणारे शिवसेना नेते ज्ञानेश्वर नागरे यांना मात्र अवघ्या चार जागा मिळाल्या आहेत, तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. तीन जिल्ह्यातील दिग्गज नेते मदतीला घेऊन सुद्धा शिवसेनेला येथे यश का मिळाले नाही? हा प्रश्न आता येथे चर्चेत आला आहे.
साक्री नगरपंचायतीच्या 17 जागांसाठी निवडणूक झाली. यात पहिल्या टप्प्यात 13 जागांसाठी मतदान घेण्यात आले. तर ओबीसीच्या मुद्द्यावरून उर्वरित 4 जागांवर काल मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणूकीत भाजपचे अनुप अग्रवाल यांनी स्थानिक नेतृत्व केले तर प्रचारासाठी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या व्यतिरिक्त महत्वाचे नेते कोणी फिरकले नाही. कारण ‘एंटी इनकम्बेन्सी’ मुळे अगोदरच मतदारांचा निर्धार पक्का झाला होता व भाजपाचा विजय निश्चित झालेला होता. या ऊलट ही निवडणूक शिवसेनेने प्रतिष्ठेची केली होती. भारतीय जनता पार्टीचा दारूण पराभव करा, असे आवाहन करीत धुळ्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार, राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील, आमदार मंजुळाताई गावित यांनी मतदारसंघ पिंजून काढला. त्याच प्रमाणे नंदुरबारचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी देखील भारतीय जनता पार्टीवर टोकदार टीकेचा भडीमार केला होता.  मात्र प्रत्यक्षात निकाल हाती आल्यानंतर शिवसेनेचा या नगरपंचायती मध्ये पुरता धुव्वा ऊडालेला दिसून आला. 17 पैकी 11 जागांवर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयी झाले असून शिवसेनेला अवघ्या चार जागा मिळाल्या आहेत. निवडणुकीचा निकाल हा पुढील प्रमाणे आहे .प्रभाग क्रमांक एक मधून अपक्ष उमेदवार कल्पना राजेंद्र खैरनार 244, प्रभाग 2 मधून भारतीय जनता पार्टीच्या संगीता बाबूलाल भावसार चारशे, उषाबाई अनिल पवार 499, प्रवीण राजेंद्र निकुंभे 388, मनीषा महेंद्र देसले 565 ,रेखा आबा सोनवणे 427, प्रभाग 8 मधून जयश्री हेमंत पवार 404 ,प्रभाग 11 मध्ये उज्वला विजय भोसले 405, प्रभाग 12 मध्ये जयश्री विनोद पगारिया 446, प्रभाग 14 मध्ये गजेंद्र रामराव भोसले 460, प्रभाग 15 मधून दीपक दिलीप वाघ 404, प्रभाग 16 मधून नर्गिसबी याकुब खा पठाण 224 तर प्रभाग 17 मधून बापू पुंडलिक गीते यांनी 287 मते मिळवून विजय मिळवला आहे .प्रभाग 7 मधून शिवसेना नेते ज्ञानेश्वर नागरे यांची सून  सोनल सुमित नागरे 296, मुलगा सुमित ज्ञानेश्वर नागरे 533, पंकज पंढरीनाथ अहिरराव 604 आणि राहुल अरविंद भोसले यांनी 464 मते मिळवून विजय मिळवला आहे.
शिवसेनेचा बोदवडला फडकला भगवा
गिरीष महाजन, नाथाभाऊंना दिली टक्कर
बोदवड – नगरपंचायत निवडणुकीत भाजपचे माजी मंत्री तथा ‘संकटमोचक’ नेते म्हणून प्रसिद्धी पावलेले आमदार गिरीश महाजन यांना मोठा धक्का बसला असून त्यांच्या भाजपा गटाला एकाच जागेवर विजय मिळाला आहे. तेही केवळ ईश्वर चिठ्ठीने हे खाते उघडता आले. येथे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी 9 जागा पटकावून बहुमत राखले आहे. तर माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीला 7च जागांवर विजय मिळाल्याने धक्का बसला आहे. रोहिणी खडसे यांच्यावरील प्राणघातक हल्ला प्रकरणाने बोदवड निवडणूक लक्षवेधी बनली होती.
 काँग्रेस पक्षाला बोदवड नगरपंचायतीत एकही जागा मिळालेली नाही. बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस 17, भाजप 13, कॉग्रेस 8, शिवसेना 17, अपक्ष 13 असे एकूण 68 उमेदवार रिंगणात होते. बोदवड नगरपंचायतीत वास्तविक भाजपाची सत्ता होती. परंतु शेवटच्या काळात बहुतांश जणांनी शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला होता. यामुळे बोदवड नगरपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा फडकवण्यात आमदार चंद्रकांत पाटील यशस्वी होणार असे आधीपासूनच दिसत होते. एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खेवलकर खडसे विरुद्ध आमदार चंद्रकांत पाटील अशीच लढत रंगली होती. रोहिणी यांच्यावरील प्राणघातक हल्ला प्रकरणामुळे बोदवड निवडणूक बहुचर्चित ठरली होती. प्रभाग क्रमांक 5 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप उमेदवार याना 374 अशी समसमान मते मिळाल्याने ईश्वर चिठ्ठी ने निकाल देण्यात आला इयत्ता 4 थी मधील आराध्या विजय अग्रवाल हिने ईश्वर चिठ्ठी काढली असता बडगुजर विजय  भाजप चे उमेदवार विजयी झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!