तुटपुंज्या वस्तूंचं वाटप म्हणजे आदिवासींचा शाश्वत विकास नव्हे – उपमुख्यमंत्री अजित पवार

नाशिक – किरकोळ तुटपुंज्या वस्तूंचं वाटप करुन नाही, तर आदिवासींना विकासाच्या मूळ प्रवाहात आणले तरच आदिवासींचा शाश्वत विकास होईल हे विचार ए.टी. पवार साहेबांनी अनेक वेळा, अनेक ठिकाणी बेधडकपणे मांडले. नुसते बेधडक विचार मांडून ते थांबले नाहीत, तर आपल्या समाजाचा, आपल्या लोकांचा, आपल्या भागाचा शाश्वत विकास करण्याचा त्यांनी आयुष्यभर प्रामाणिक प्रयत्न केला. आजचा हा संवाद कोरड्या पध्दतीनं होणार नाही, तर ज्या कळवण-सुरगाणा मतदार संघात विकासाचा ‘एटी’ पॅटर्न राबविला गेला, त्या ठिकाणी तब्बल १८३ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन तुमच्या सर्वांच्या साक्षीनं आताचं झालं आहे. पूर्वीच्या कळवण मतदार संघाचे तब्बल पंचेचाळीस वर्षे नेतृत्व करणाऱ्या दिवगंत ए.टी. पवार साहेबांना ही महाविकास आघाडी शासनाची द्विवर्षपूर्तीच्या निमित्ताने दिलेली कृतिशील वंदना आहे, असं मी समजतो, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
ते काल दि.28 नोव्हेंबर 2021 रोजी नाकोडे ता. दिंडोरी येथील तालुका क्रीडा संकुलात आयोजित कळवण-सुरगाणा विधानसभा मतदार संघातील १८३ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण तसंच शेतकरी, शेतमजुर, आदिवासी, युवक मेळाव्यात संबोधित करताना बोलत होते. यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार नितीन पवार, आमदार हिरामण खोसकर, आमदार सरोज अहिरे, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार दिलीप बनकर, नाशिक बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयश्री पवार, माजी आमदार जयंत जाधव, अपूर्व हिरे उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, आपल्या महाविकास आघाडीचं सरकार, राज्यात सत्तेवर येऊन आज दोन वर्षे झाली. या दोन वर्षांच्या काळात महाविकास आघाडी सरकारला साथ, सहकार्य, पाठिंबा दिलेल्या, सरकारवर विश्वास व्यक्त केलेल्या राज्यातल्या तमाम बंध-भगिनी-मातांचं, तरुण मित्रांचं, आपल्या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. राज्यातल्या जनतेच्या विश्वासावर आणि आशिर्वादावर महाविकास आघाडी’ चं सरकार आज यशस्वीपणे दोन वर्षे पूर्ण करत आहे. राज्याच्या विकासासाठी आणि उन्नतीसाठी हे महाविकास
आघाडी’चं सरकार कायमचं कटीबध्द राहिल, याची ग्वाही मी यानिमित्तानं आपल्याला देतो. या दोन वर्षांत राज्यातल्या जनतेनं दाखविलेला विश्वास आणि केलेलं प्रेम महाविकास आघाडी सरकारसाठी मोलाचं आहे. त्याबद्दल सरकारच्यावतीनं आपले आभार मानतो. जनतेचं प्रेम महाविकास आघाडी सरकारबरोबर असचं कायम राहिल, याची मला खात्री आहे. या शुभदिनी आज कळवण सुरगाणा विधानसभा मतदार संघातल्या शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, आदिवासी बांधवांशी, युवकांशी संवाद साधण्याची संधी मला मिळाली. त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. कळवण-सुरगाणा मतदार संघाच्या विकासासाठी कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू दिला जाणार नाही, याची ग्वाही या निमित्तानं तुम्हा सर्वांना देतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!