तुळस – एक संजीवनी
आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीनुसार घरोघरी दारात आपल्याला तुळशी वृंदावन व त्यात डौलाने फुलणारी तुळस दिसून येते. धार्मिक कृती म्हणून रोज पुजल्या जाणाऱ्या तुळशीचे वैज्ञानिक महत्त्वही तेवढेच आहे आज वैज्ञानिक दृष्ट्या पाहिले तर तुळस ही एक संजीवनी वनस्पतीच आहे. तीचे आरोग्यदायी गुणधर्म मानवाला किती लाभदायक आहेत हे आज सर्वांना दिसून येत आहेत.
तुळस ही जगातील एकमेव वनस्पती आहे की जी दिवसा ऑक्सिजन, रात्री कार्बन डाय ऑक्साईड व फक्त पहाटेच्या वेळी 0.03% इतका ओझोन-O3 वा़यु सोडते व या वायुच्या संपर्कात मनुष्य आल्यास त्याच्या मेंदुत 5HTPn-सेरॉटोनीन नावाचे संप्रेरक (Neurotransmiter) स्त्रवते. ज्यामुळे मनुष्य दिवसभर प्रसन्न व आनंदी राहतो. तसेच त्याची रोग प्रतिकारक शक्ती (Immune System) बळकट होते. आपल्या संस्कृतीनुसार रोज सकाळी स्त्रियांनी तुळशीची पूजा करून तिला प्रदक्षिणा घालण्याचा प्रघात आहे.
वैज्ञानिक संशोधनात हे स्पष्ट झाले आहे की, तुळशीत विद्द्युत् तत्वाची निर्मिती करण्याचे आणि शरिरात ते तत्त्व टिकवून ठेवण्याचे अद्भुत सामर्थ्य आहे. तुळशीच्या थोड्या रसाने तेलासारखे मालीश केल्यास विद्द्युत् प्रवाह उत्तम रितीने चालेल.
आयुर्वेदानेही तुळशीचे महत्त्व विशद केले आहे की तुळस ही अनेक आजारांवर औषधी आहे जिच्या पासून मिळणारी हवा आम्हास ऑक्सिजन देते तसेच तिच्या प्रत्येक भागात औषधी गुणधर्म आहेत. पाने, मंजिरी, बिया, तुळशीच्या काड्या प्रत्येकाचे औषधी गुणधर्म वेगवेगळे आहेत. आयुर्वेदानुसार तुळशीमुळे सर्दी, खोकला, ताप, त्वचारोग, मधुमेह, रक्तदाब, पोटाचे व किडनीचे विकार, कँन्सर, होत नाहीत असे उल्लेख दिसून येतात.
आज विज्ञान सांगत असलेले हे सर्व औषधी गुणधर्म आमच्या ऋषिमुनींना आधीच अवगत होते, तसे त्याचे उल्लेख आमच्या विविध ग्रंथांमध्ये आढळून येतात.
स्कन्दपुराणातील् खण्ड ४, अध्याय २१, श्लोक ६६ मध्ये तुळशीपूजनाचे महत्त्व आणि तुळशीमुळे होणारे आरोग्यदायी लाभ विशद केले आहे.
तुलसी यस्य भवने प्रत्यहं परिपूज्यते ।
तद्गृहं नोपसर्पन्ति कदाचिद्यमकिङ्कराः ।
अर्थात ज्याच्या घरी तुळशीची प्रतिदिन पूजा होते, त्या घरी यमदूत कधीही येऊ शकत नाहीत.
जेथे तुळशीची पुरेशी रोपे असतात, तेथील हवा २४ घंटे शुद्ध रहाते. अशा घरातील लोक निरोगी रहातात. त्यांना दीर्घायुष्य लाभते.
संतांनीही सांगितले आहे, ‘‘तुळस निर्दाेष आहे. प्रत्येक घरी तुळशीची एक-दोन रोपे असलीच पाहिजेत. सकाळी तुळशीचे दर्शन करा. तुळशीजवळ बसून दीर्घ श्वास घ्या आणि सोडा, तर आरोग्य चांगले राहील, तसेच दमा होण्याची शक्यता अल्प होईल. तुळशीला स्पर्श करणारी हवा श्वासावाटे शरिरात घेतल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते.’’
‘ब्रह्मवैवर्त पुराण’ (प्रकृती खंड : २१.३४) मध्ये भगवान नारायण म्हणतात, ‘‘हे वरानने (सुमुखी) ! त्रैलोक्यात देवपूजेच्या उपयोगात येणार्या सर्व पानाफुलांमध्ये तुळस मुख्य मानली जाईल.’’
‘श्रीमद्देवीभागवत’ (९.२५.४२-४३) मध्ये सांगितले आहे, ‘फुलांमध्ये कुणाशीही जिची तुलना होऊ शकत नाही, जिचे महत्त्व वेदांमध्येही वर्णिलेले आहे, जी सर्व अवस्थांमध्ये सदैव पवित्र रहाते, जी ‘तुळशी’ नावाने प्रसिद्ध आहे, जी भगवंतासाठी शिरोधार्य आहे, जी सर्वांची आवडती आहे, तसेच जी संपूर्ण जगाला पवित्र करणारी आहे, त्या जीवन्मुक्त, मुक्तीदायिनी आणि श्रीहरिंची भक्ती प्रदान करणार्या भगवती तुळशीची मी उपासना करतो.’
संत म्हणतात, ‘‘तुळशीची पाने त्रिदोषनाशक आहेत. त्यामुळे कोणताही दुष्प्रभाव होत नाही. प्रतिदिन तुळशीची ५ ते ७ पाने खाऊ शकता. तुळस हृदय आणि मेंदू यांसाठी पुष्कळ लाभदायी आहे. ईश्वराकडून मिळालेली ती आरोग्य संजीवनी आहे.’’
अशा या संजीवनी वनस्पती चा लाभ सर्वांना व्हावा म्हणून आमच्या तत्त्वदर्शी ऋषी-महर्षी यांनी तुळशीतील सर्व गुण पारखून तिच्यातील देवत्व आणि मातृत्व यांचे मानवाला दर्शन घडवले; म्हणून देवत्व अन् मातृत्व यांचे प्रतीक मानून तुळशीचे रोप लावणे, तसेच तिची पूजा करण्याचे विशेष महत्त्व सांगितले आहे. आमच्या संस्कृतीने ती धार्मिक कृती सांगितली आहे की तुळशीला सकाळी जल अर्पण करून तिची पूजा करावी, प्रदक्षिणा घालाव्या तुळशीची विविध अनुष्ठाने, तुळशीची पाने प्रसाद म्हणून वाटली जातात, तीर्थामध्ये तुळशीची पाने घातली जातात जेणेकरून तिच्या औषधी गुणधर्मांचा लाभ सर्वांना होईल यावरून आपल्या संस्कृतीतील वैज्ञानिक दृष्टिकोण आम्हाला दिसून येतो.
– डॉ० प्रणिता महाजन, संभाजीनगर