नंदुरबार – वीज बिलाची थकबाकी भरत नाही म्हणून महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी थेट तहसील कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित केला म्हणून लगेचच संतप्त तहसीलदार यांनी थकित महसुल करासाठी तालुक्यातील महावितरणची कार्यालये सील करीत महाशॉक दिला. पोलीस ठाण्यात पोहोचलेला वाद जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे मात्र तूर्त संपला आहे.
वरिष्ठांच्या आदेशामुळे कठोरपणे अंमलबजावणी करीत महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंता मनीषा कोठारी यांनी नंदुरबार तहसील कार्यालयाला वीज बिलाची थकीत रक्कम त्वरित भरण्याचे सांगितले होते. परंतु ट्रेझरी मधून बिलाची रक्कम हस्तांतरित होण्याला अवकाश असल्यामुळे वीज बिल भरले गेले नाही. तोपर्यंत महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांनी आज दिनांक 29 नोव्हेंबर रोजी दुपारी थेट नंदुरबार तहसील कार्यालयात जाऊन मुख्य वीज पुरवठाच खंडित करून टाकला. त्यामुळे तहसील कार्यालयातील काम ठप्प झाले आहे. यावरून संतप्त
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी महावितरण कंपनीच्या सब स्टेशन आणि कार्यालयांवर थकीत महसूलासाठी अस्त्र उगारले. त्यांनी सरळ नंदुरबार शहरातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयाला सील ठोकले. नंतर तालुक्यातही कारवाई सुरू केली. यावरून महसूल आणि वीज वितरण कंपनीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये तणाव पसरला.
दरम्यान संतप्त कार्यकारी अभियंता पाटील, अतिरिक्त कार्यकारी अभियंता मनीषा कोठारी आणि कर्मचारी यांनी आक्रमक पवित्रा घेत पोलिस ठाणे गाठले.
तथापि शहर पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी सौम्य हाताळणी केली. नंतर वीज वितरण च्या या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांची भेट घेऊन प्रसंग कथन केला. जिल्हाधिकारी खत्री यांनी महसूल कर भरणे अगत्याचे असल्याचे सांगितले त्याचबरोबर विज बिल भरण्याची तहसील कार्यालयाकडून करण्यात आलेल्या प्रोसिजर ची माहिती दिली. परस्पर सहकार्य आवश्यक असल्याचे सांगून वाद मिटवण्यासही सांगितले. त्यावर या अधिकाऱ्यांनी त्वरित तहसील कार्यालयाचा वीजपुरवठा सुरू करून प्रतिसाद दिला. दरम्यान जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना वीज कंपनीच्या कार्यालयांना ठोकलेले सील काढण्याचे आदेश दिले.
याविषयी अधिक माहिती देताना जिल्हाधिकारी खत्री म्हणाल्या की, परस्पर सामंजस्याने थकबाकी भरण्याची तयारी दोन्ही बाजूने दाखविण्यात आली यामुळे वाद संपुष्टात आला आहे. खंडित केलेला वीज पुरवठा सुरळीत झाला असून तहसीलदार यांना सील काढण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत; असे जिल्हाधिकारी म्हणाले.
तर तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी सांगितले की वीज मंडळाकडे केवळ शहरातील अकृषिक कर 3.42 लाख रुपये थकित आहे. ग्रामीणचे त्या त्या गावानुसार वेगवेगळे आहेत. जिल्हाधिकारी महोदय यांनी त्यांना तहसील कार्यालयाची लाईट तातडीने जोडण्यास सांगितले. त्यानंतर आम्ही त्यांचे कार्यालय खुले करून देत आहोत.