तृतीयपंथीयचा असाही विशेष सन्मान ! लोकअदालतीच्या पॅनलवर दिले स्थान 

धुळे – राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार येथे लोक अदालत पार पडली. याप्रसंगी लोकअदालतीच्या माध्यमातून शेकडो खटल्यांचा निपटारा करण्यासाठी बनवलेल्या महत्वपूर्ण पॅनलवर स्थान देत तृतीयपंथी समाजकार्यकर्तीला विशेष सन्मान देण्यात आला.

विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एच. मोहम्मद यांनी तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य चालवले आहे. त्या अंतर्गत त्यांनी हा सन्मान घडवला. याविषयीच्या शासकीय माहितीत म्हटले आहे की, धुळे जिल्हा न्यायालय व धुळे जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले होते. लोक न्यायालयामध्ये पॅनल  सदस्यांकडून पक्षकारामध्ये तडजोडीसाठी प्रयत्न केले जातात. यासाठी राष्ट्रीय लोक अदालतसाठी एकूण 24 पॅनल गठित करण्यात आले होते. दरम्यान, राष्ट्रीय लोक अदालतच्या निमित्ताने विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एच. मोहम्मद यांनी तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. शुभांगी पवार यांना अध्यक्ष तथा न्या. मोहम्मद यांनी स्वतःच्या पॅनलवर सदस्य म्हणून स्थान देत त्यांचा सन्मान केला. शासकीय अधिकाऱ्यांचा व समाजाचा तृतीयपंथीयांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा, अशी अपेक्षाही न्या. मोहम्मद यांनी याप्रसंगी व्यक्त केली. प्राधिकरणाच्या माध्यमातून तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ते कार्यरत आहेत.
धुळे व नंदुरबारला ईतके खटले निघाले निकाली
धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या राष्ट्रीय लोक अदालतीत एकूण प्रलंबित खटल्यांपैकी ५८९ खटले तडजोडीने निकाली काढण्यात आले. तसेच अपघातग्रस्तांना एकूण आठ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली. ग्रामपंचायतींच्या कराची एकूण 97 लाख 54 हजार रुपये रक्कम वसूल झाली. एकूण ६८०२ दाखल पूर्व खटले लोक अदालत मध्ये निकाली निघाले, अशी माहिती  जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डॉ. डी. यू. डोंगरे यांनी दिली आहे.
याच प्रमाणे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार नंदुरबार येथेही लोक अदालत पार पडली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकिल संघ, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालय, नंदुरबार व तालुकास्तरावर राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीस नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
याप्रसंगी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एस. तिवारी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डि. व्ही. हरणे, जिल्हा न्यायाधीश वर्ग-1, न्या. ए. एस. भागवत, दिवाणी  न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्या. एस. टी. मलिये, सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर न्या. आर. एन. गायकवाड, मुख्य न्यायदंडाधिकारी न्या. व्ही. जी. चव्हाण, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड.  के. एच. साबळे आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील लोकअदालतमध्ये आज निकाली निघालेल्या दिवाणी प्रकरणात मोटार अपघात, चलनक्षम धनादेश, कौटूंबिक वाद, फौजदारी, भूसंपादन, इतर किरकोळ फौजदारी अशा एकुण 1 हजार 934 प्रकरणातील 668 निकाली प्रकरणात 1 कोटी 15 लाख 82 हजार 767 रुपये वसुल करण्यात आले. तर जिल्हयातील एकुण दाखलपूर्व प्रकरणांमध्ये बँक वसुली, वीज थकबाकी वसुली, पाणीपट्टी, घरपट्टीच्या, पेटी केसेसच्या, टेलिफोन आणि श्रीराम ट्रॉन्सपोर्ट अशा एकूण 8 हजार 499 प्रकरणापैकी 1 हजार 453 प्रकरणे निकाली काढण्यात येवून 1 कोटी 71 लाख 80 हजार 759 रुपये वसुल करण्यात  आले. असे दोन्ही मिळून दाखल प्रकरणात 2 हजार 121 प्रकरणे सामंजस्याने निकाली काढून 2 कोटी 87 लाख 63 हजार 526 रुपये वसुल करण्यात आले आहे.
पॅनल प्रमुखाच्या मदतीसाठी विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. डी. चौधरी, विधिज्ञ व्ही. बी. शहा, प्रदीप डी. राठी, शुभांगी चौधरी, आर. डी. गिरासे, गीतांजली पाडवी, पी. एस. पाठक, एस. व्ही. गवळी यांनी पॅनल सदस्य म्हणून काम पाहिले.
सह दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर श्रीमती. वाय. के. राऊत, एन. बी. पाटील यांनी किरकोळ स्वरुपाची फौजदारी प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी विशेष कामकाज केले. लोकअदालत यशस्वीतेसाठी जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक एच. व्ही. जोशी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिक्षक जे. बी. ताडगे, न्यायालयीन कर्मचारी व विधिज्ञ आदींनी परिश्रम घेतले. या राष्ट्रीय लोकअदालतीत कोविड-19 च्या मार्गदर्शक तत्वांच्या नियमाचे कोटेकोरपणे पालन करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!