नंदुरबार- न्युमोनियाने मृत्यू झाल्याचा उल्लेख चुकीचा असल्याने मृत्यूदाखला बदलवून मिळावा आणि रुग्णाचा जर कोरोनामुळे मृत्यू झाला आाहे तर तेच कारण नोंदवावे; या मागणीसाठी अधिकार्यांकडे खेटा घालून दमलेल्या मयत डॉक्टरच्या पत्नीच्या व्यथा अखेर जिल्हाधिकारी डॉ.मनिषा खत्री यांनी जाणल्या आणि जिल्हा रुग्णालयाला तातडीचे लेखी आदेश देऊन सुधारित मृत्यूदाखला मिळवून देण्याचा मार्ग मोकळा केला. अनेक दिवसांपासून कागदीघोडे नाचवून दमलेल्या श्रीमती पाटील यांनी तो सुधारित मृत्यूदाखला आज शुक्रवार दि.१ ऑक्टोबर २०२१ रोजी हाती घेतला तेव्हा त्यांच्या डोळ्यात आपसूकच अश्रू तरळले.
अधिक वृत्त असे की, नंदुरबार तालुक्यातील धमडाई येथील डॉ.संजय भावराव पाटील यांचा नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार चालू असतांनाच दिनांक ७ एप्रिल २०२१ रोजी सकाळी मृत्यू झाला. ते कोविडने मरण पावलेले असतांना संबंधीत वैद्यकीय अधिकार्याने मृत्यूदाखल्यावर मात्र न्युमोनियाचे कारण नोंदविले. त्या अधिकार्याने केलेल्या चुकीचा परिणाम असा घडला की, कोरोनाने मयत झालेल्यांना मिळणारी शासकीय मदत, मुलांना आणि पत्नीला मिळणारी सवलत सर्व काही मयत डॉक्टरच्या परिवाराला नाकारले गेले. मयत डॉक्टर संजय पाटील यांच्या पत्नी श्रीमती पाटील यांच्यावर जणू आकाश कोसळले. प्रपंच चालवणारा प्रमुख आधार गेल्याने हादरलेल्या श्रीमती पाटील या नातलगांच्या मदतीने तेव्हापासून शासकीय जिल्हा रुग्णालयाकडे चुकीच्या नोंदीची दुरुस्ती करून मिळावी यासाठी लगातार प्रयत्न करीत होत्या. परंतु त्या महिलेचा आटापीटा समजून न घेता तब्बल सहा महिने प्रत्येक अधिकारी कागदी घोडे नाचवत राहिला.
शासन दरबारी व्यथा मांडणार्या पत्रातून श्रीमती पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार घटनाक्रम थोडक्यात असा- ६ एप्रिल २०२१ ला सायंकाळी डॉ.संजय पाटील यांना नंदुरबार जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या कोविड वॉर्डात दाखल करण्यात आले. त्यावेळी सर्वत्र कोविडमुळे होणार्या मृत्यूने थैमान घातलेले होते. अशातच काही तासाने म्हणजे ७ एपिल २०२१ रोजी सकाळी डॉ.संजय पाटील हे उपचार चालू असतांना मरण पावले. लगेचच रुग्णालय व्यवस्थापनाने पथक बोलवून त्यांचा अंतिम संस्कार करायला सांगितले. तसेच महिनाभराने येऊन मृत्यूदाखला घेऊन जा असेही सांगितले. श्रीमती पाटील यांना महिनाभराने मृत्यूदाखला हाती दिला परंतु त्यावर न्युमोनियाने मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली होती. कोविडग्रस्तांना मिळणार्या सवलतींना अनुषंगून मुलांची शैक्षणिक फी माफ करून मिळावी या साठी प्रयत्न केला तसेच आपत्ती निवारण निधीतून मदत मिळावी म्हणूनही त्यांनी प्रयत्न केला, तेव्हा ही बाब उघड झाली. हादरून जात त्यांनी लगेचच शासनदरबारी संपर्क व अर्जफाटे सुरु केले.
खाजगी संस्थांचा कोविड चाचणी अहवाल ग्राह्य धरला जात नाही आणि त्यामुळे जिल्हा रुग्णालयाकडे मयत डॉ.संजय पाटील यांची कोविड रुग्ण म्हणून तपासणी अथवा नोंद केली नव्हती, असा धक्का देणारा खुलासा यावर संबंधितांकडून करण्यात आला. श्रीमती पाटील तक्रार अर्जात म्हणतात की, कोविड टेस्टसाठी खास भारत शासनाने मान्यता दिलेल्यापैकी एक असलेल्या आयसीएमआर या लॅबचा चाचणी (तपासणी) अहवाल त्यांच्याकडे होता. त्यात मयत डॉ.पाटील हे पॉझिटिव असल्याचे नमूद आहे. शिवाय भारत सरकारने पॉझिटिव रुग्णांच्या नोंदीसाठी बनवलेल्या देशस्तरीय पोर्टलवरील यादीत देखील त्यांचे नाव आहे. डॉ.पाटील हे मृत्यूपूर्वी १२ तास सिव्हिल हॉस्पिटलच्या कोविड सेंटरमधेच दाखल होते, ऑक्सिजन पातळी कमी असल्याचे व सिटीस्कॅनचे रिपोर्टही होते, शिवाय डॉ.पाटील यांचे अंतिमसंस्कार कोविडनिकषानुसार पालिकेच्या पथकाकरवी अधिकृतपणे करण्यात आले. असे असूनही संबंधीत वैद्यकीय अधिकार्याने त्यावेळी त्यांची कोविड रुग्ण म्हणून नोंद का घेतली नाही? हा प्रश्न ते सातत्याने उपस्थित करीत राहिल्या. तथापि त्यांना लगातार सुधारित मृत्यूदाखला देण्यास नाकारले गेले.
अखेर या सर्व दाखल्यांसह श्रीमती पाटील आणि त्यांच्या नातलगांनी जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांच्यापुढे दोनवेळेस जाऊन कागदी पुराव्यासह व्यथा मांडल्या. एका महिलेने दुसर्या महिलेचे दु:ख शेवटी जाणून घेतले. जिल्हाधिकारी मनिषा खत्री या तसेही महिलांना न्याय देण्यासाठी व त्यांच्या समस्यांचे निवारण प्राधान्याने करण्यासाठी तत्पर राहणार्या अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी तत्परतेने तक्रार अर्जावरच शेरा मारून जिल्हा रुग्णालयाला कार्यरत केले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रघुनाथ भोये आणि निवासी शल्यचिकित्सक डॉ.सातपुते यांनी सुधारित मृत्यूदाखला आज शुक्रवार रोजी श्रीमती पाटील व त्यांच्या नातलगांना लगेच सुपूर्द केला.
एका डॉक्टर कुटूंबाला शासकीय कागदी घोड्यांचा आलेला हा कटू अनुभव मात्र इतर रुग्णांना नक्कीच धडा देणारा आहे. कोरोना उपचार घेतांना मरण पावलेल्या रुग्णांच्या मृत्यूदाखल्याविषयी सुप्रिम कोर्टाने दिलेल्या गाईडलाईन अधिकार्यांनी आणि रुग्णांनीही अधिक खोलात जाऊन जाणून घेतल्या पाहिजेत; असे मत श्रीमती पाटील यांनी यावर व्यक्त केले तसेच जिल्हाधिकारींसह सर्वांचे आभार व्यक्त केले.