नंदुरबार – अक्कलकुवा तालुक्यातील जल जीवन मिशन योजनांच्या आढावा बैठकीत अनुपस्थित राहिलेल्या तीन ग्रामसेवकांना नोटीस बजावून त्यांचे वेतन कपात करण्याचे आदेश आदिवासी विकास तथा नंदुरबार जिल्हा पालकमंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी दिले.
पिण्याच्या पाण्यासंदर्भातील सेवा जीवनावश्यक घटकाशी निगडित व अत्यावश्यक असून त्याकडे दुर्लक्ष करणे शिक्षापात्र ठरविण्यात आले आहे. असे असताना तातडीच्या जलजीवन मिशन आढावा बैठकीला हे ग्रामसेवक अनुपस्थित राहिले म्हणून ही कारवाई करण्यात आली. या संदर्भात सविस्तर माहिती अशी की, भविष्यातील पाणी प्रश्न सुटावा या हेतूने आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्हा पालकमंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित आणि खासदार डॉक्टर हिना गावित हे जलजीवन मिशन अंतर्गत कामांना नंदुरबार जिल्ह्यात गती देत आहेत. परंतु त्या कामांमध्ये काही ठिकाणी खोळंबा निर्माण केला जात असल्याचे तक्रारी आहेत. त्या अनुषंगाने पालकमंत्री डॉक्टर विजयकुमार गावित हे आढावा घेत आहेत.
त्या अंतर्गतच अक्कलकुवा तालुक्यातील जल जीवन मिशन योजनेअंतर्गत चालू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्हा पालकमंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या उपस्थितीत गुरुवार दिनांक 7 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी अक्कलकुवा येथे तहसील आवारात तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. पाणी योजनांची स्थिती आणि अडचणी जाणून घेत पालकमंत्री यांनी झाडाझडती घेत उपस्थित अधिकारी आणि कर्मचारी यांना कडक सूचना केल्या. ज्या कामांना 15 सप्टेंबर अखेर पूर्ण करायचे होते परंतु केलेले नाही अशा ठेकेदारांना ब्लॅक लिस्ट मध्ये टाका. पुढील 30 वर्षाचा पाणी प्रश्न सोडवण्याच्या उद्देशाने हे काम करायचे आहे त्यामुळे सगळ्यांनी लक्ष देऊन ते पूर्ण होईल असे पाहावे. पाणी योजना पूर्ण झाल्यावर सलग सात दिवस नियमित पाणी मिळाल्याशिवाय संबंधित ग्रामस्थांनी काम करणाऱ्या एजन्सीला सह्या आणि आधार कार्ड देऊ नये; अशाही विविध सूचना केल्या.
“त्या पोटदुखीचा मी इलाज करू शकतो”
दरम्यान अक्कलकुवा तालुक्यातील सर्व सरपंच आणि सर्व ग्रामसेवक यांना उपस्थित राहण्याच्या सूचना ग्रामपंचायत विभाग मार्फत देण्यात आल्या होत्या. परंतु कोणतीही पूर्व सूचना न देता व पूर्वपरवानगी न घेता काही सरपंच आणि काही ग्रामसेवक आढावा बैठकीत गैरहजर राहिल्याचे दिसून आले. काही जणांच्या अनुपस्थितीला राजकीय संदर्भ असल्याचे लक्षात घेत पालकमंत्री डॉक्टर विजयकुमार गावित या प्रसंगी म्हणाले की कोणत्या पोट दुखी मुळे ते आले नाही ते मी जाणून आहे. मी पण एक डॉक्टर आहे आणि त्यांच्या पोटदुखीचा इलाज मी निश्चितच करू शकतो; अशी मिश्किल टिपणी सुद्धा त्यांनी केली.
तळोदा विभागाचे उपजिल्हाधिकारी मंदार पत्की, अक्कलकुवा तहसिलदार रामजी राठोड, गटविकास अधिकारी विजय लोंढे, पोलिस निरिक्षक दीपक बुधवंत यांच्यासह अक्कलकुवा पंचायत समिती संबंधित अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते.