नंदुरबार – अयोध्येतील अत्यंत पवित्र अशा श्री राम जन्मभूमीत भव्य अशा श्रीराम मंदिराचे निर्माण पूर्णत्वास आले असून 22 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. त्या पवित्र आणि ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातून किमान 10 हजार भाविकांना अयोध्येला घेऊन जाईन; असे जाहीर आश्वासन संसद रत्न खासदार डॉक्टर हिना गावित यांनी जाहीर सभेत बोलताना दिले.
घर चलो अभियान, संपर्कसे समर्थन अभियान आणि सुपर वॉरियर यांच्याशी संवाद, अशा विविध कार्यक्रमा सोबतच भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या उपस्थितीत आज दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी पार पडली. यानिमित्त काढण्यात आलेली भव्य मिरवणूक, भाजपाचे ध्वज आणि पताका लावून सजवण्यात आलेले प्रमुख मार्ग तसेच जागोजागी झळकलेले बॅनर्स यामुळे संपूर्ण नंदुरबार शहर भाजपामय बनलेले दिसले. प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक किलोमीटर पायी चालून रहिवासी आणि व्यावसायिक यांना भेटून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारताला जगातील सर्वाधिक विकसित देश बनविण्यासाठी संघटित राहण्याचे आवाहन केले. भारतीय जनता पार्टीचे महामंत्री विजय चौधरी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित, संसद रत्न खासदार डॉक्टर हिना गावित, आमदार राजेश पाडवी, भाजपाचे माजी आमदार शिरीष चौधरी, प्रदेश सदस्य राजेंद्र कुमार गावित, संघाचे जेष्ठ प्रसारक राजेश गावित, भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी, तालुका अध्यक्ष जे एन पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
दरम्यान, संपर्क अभियान संपल्यानंतर जळका बाजारात झालेल्या सभेत बोलताना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी 22 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत पार पडणार असलेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पवित्र आणि ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले. परंतु, भाषणातून यावर बोलता बोलता प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी अचानक खासदार डॉक्टर हिना गावित यांना उभे केले आणि अयोध्येला येण्याची इच्छा असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील किमान 5000 जणांची व्यवस्था करावी, असे जाहीरपणे सांगितले. बावनकुळे यांनी तसे सांगताच खासदार गावित उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या, “हिंदू धर्मशास्त्रात प्राणप्रतिष्ठेला मोठे महत्त्व असून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनणे मोठे भाग्याचे ठरेल. त्यासाठी मी नंतर वाट लोकसभा मतदार संघाच्या प्रत्येक तालुक्यातून किमान दहा हजार श्रीराम भक्तांना घेऊन जाण्याची व्यवस्था करेल.” खासदार हिना गावित यांनी असे जाहीरपणे सांगताच उपस्थितांनी एकच जल्लोष केला, तर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे स्वतः चकित झाले..
प्रत्येक मंदिरात होणार उत्सव
प्राप्त माहिती नुसार अयोध्येच्या धरतीवर श्रीराम मंदिर निर्माणाचे कार्य पुर्णत्वास येऊ लागले असून अयोध्येत २२ जानेवारी रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडणार आहे. त्यासाठी देशभरातून एकूण सात हजार जणांना आमंत्रित करण्यात आले आहे. यात महंत(साधूसंत) परिवारातील तीन हजार जणं उपस्थित असतील, तर बाकी विविध क्षेत्रातील मान्यवरांची यावेळी उपस्थिती असेल. अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण यावेळी देशभरात गावागावातील मंदिरांमध्ये स्क्रीनिंगच्या माध्यामातून दाखवण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक गावातील राम मंदिरात उत्सव साजरा करण्याचे आयोजन केले जात आहे.