नंदुरबार : वसुलीची बिकट परिस्थिती पाहता मुख्य कार्यालयाकडून दरमहा थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याबाबत देण्यात येणाऱ्या यादीतील ग्राहकांचा वीजपुरवठा त्वरित खंडित करण्याचे आदेश सहव्यवस्थापकीय संचालक (प्र) रेशमे यांनी दिले आहेत. सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बारकाईने लक्ष देऊन नियमानुसार व वेळेत हे काम पूर्ण करण्या बरोबरच वीज चोरांवर कडक कारवायांसह वितरीत होणाऱ्या प्रत्येक युनिट विजेचे बिलात रुपांतर व त्याची वसुली करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
कोकण प्रादेशिक विभागातील कल्याण, भांडुप, रत्नागिरी, नाशिक आणि जळगाव परिमंडलांचे मुख्य अभियंता व त्याअंतर्गत पेण, ठाणे, वाशी, कल्याण एक व दोन, वसई, पालघर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, नाशिक, मालेगाव, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदूरबार या मंडल कार्यालयांचे अधीक्षक अभियंता यांच्या समवेत कल्याण परिमंडल कार्यालयात घेतलेल्या आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले.
याप्रसंगी त्यांनी सांगितले की, वितरित केलेल्या विजेच्या किंमतीचा परतावा वेळेत मिळत नसल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या महावितरणपुढील अडचणी आणखी वाढत आहेत. थकबाकी वसुलीचे मोठे आव्हान समोर असताना महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागात नोव्हेंबर महिन्याचे चालू वीजबिलही (करंट डिमांड) पूर्ण वसूल होऊ शकलेले नाही. त्यामुळे वसुलीच्या कामाला गती देऊन किमान वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे सक्त निर्देश कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक (प्र) प्रसाद रेशमे यांनी दिले आहेत.
अशी आहे थकबाकी
कोकण प्रादेशिक विभागात म्हणजे कल्याण, भांडुप, रत्नागिरी, नाशिक आणि जळगाव परिमंडलांचे मुख्य अभियंता व त्याअंतर्गत पेण, ठाणे, वाशी, कल्याण एक व दोन, वसई, पालघर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, नाशिक, मालेगाव, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदूरबार या मंडळात सर्व वर्गवारीतील ग्राहकांकडून नोव्हेंबर-२०२१ या महिन्यात चालू वीजबिलाचे ३ हजार १०७ कोटी रुपये वसूल होणे आवश्यक होते. मात्र चालू वीजबिलाच्या वसुलीत तब्बल ५९० कोटी रुपयांची तूट आहे. तर नोव्हेंबर महिन्याच्या निर्धारित उद्दिष्टापेक्षा ही वसुली १ हजार ३३६ कोटी रुपयाने कमी आहे. कोकण प्रादेशिक विभागात एकूण थकबाकी व नोव्हेंबरचे चालू वीजबिल लक्षात घेता कृषिपंप ग्राहक वगळता वितरित केलेल्या विजेची वसुली योग्य रक्कम ५ हजार ७३४ कोटी रुपये आहे.
या बैठकीला भांडूप परिमंडलाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर, कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर, नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे, कोकण (रत्नागिरी) परिमंडलाचे मुख्य अभियंता विजय भटकर यांच्यासह सर्व मंडल कार्यालयांचे अधीक्षक अभियंते उपस्थित होते.