नंदुरबार – पानटपरीच्या उधारी वरून वाद झाला असता कानशिलात लगावली होती. म्हणून मित्रांसमवेत हल्ला करून थेट पोटात सुरा भोसकून त्याचा वचपा काढल्याची घटना काल शहाद्यात घडली. मध्यरात्री दाखल झालेल्या या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 19/02/2022 रोजी रात्री 8 वाजे दरम्यान शहादा शहरातील प्रेस मारुती मैदानाच्या मोकळ्या जागेत हा प्रकार घडला. जखमी युवकाचा आतेभाऊ केबल डीश टी.व्ही.चालक गणेश मांगु नेरकर वय 29 वर्षे, रा. गांधी नगर, शहादा यांनी शहादा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मामे भाऊ देवेन्द्र समाधान पाटील याचा तीन दिवसापूर्वी आरोपी आकाश वाडीले याच्याशी पानटपरीवरील ऊधारीच्या पैशावरून किरकोळ वाद झाला होता व त्याप्रसंगी देवेंद्र याने आकाश वाडीलेच्या गालावर चापट मारली होती. त्याचा वचपा काढण्याच्या इराद्याने काल प्रेस मैदानावर आकाशने मित्रांसमवेत येऊन हल्ला केला. त्यांनी हाताबुक्यांनी मारहाण करून थेट धारदार सुऱ्याने देवेंद्रच्या पोटावर वार करीत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
यात गंभीर जखमी होऊन देवेंद्र कोसळला. दरम्यान घटना कळताच उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे, पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत, हेड कॉन्स्टेबल मेहेरसिंग वळवी, किरण जिरेमाळी, भरत ऊगले यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन स्थिती नियंत्रणात आणली. जखमी युवकाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर मध्यरात्री शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. फिर्यादीवरून आकाश वाडीले ऊर्फ फाक्या, योगेश मराठे, मंगल (पूर्ण नाव माहित नाही), निलेश बच्चु पाटील, कुणाल ठाकरे, सर्व. रा. शहादा ता. शहादा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार योगेश संजय मराठे वय 22 रा. रामनगर शहादा, तुकाराम बच्चु पाटील वय 25 सालदार नगर शहादा, आकाश उर्फ फाक्या शंकर वाडीले वय 22 रा. साईबाबानगर शहादा याााा तिघांना अटक करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप आरक अधिक तपास करीत आहेत.