नंदुरबार – शहरातील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या दंडपाणेश्वर गणपती मंदिरात दान पेट्या फोडून आणि मूर्ती वरील सव्वा किलो चांदीचे आभूषण लंपास करून चोरांनी हादरा दिला होता त्याचवेळी शंकेश्वर पार्श्वनाथ मंदिरातील दानपेटी फोडून रक्कम चोरी केली होती या चोरीचा तपास करण्यात स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेला यश मिळाले असून दोन आंतरराज्य गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंदिरातील चोरी सारखा अत्यंत गंभीर स्वरुपाचा गुन्हा अल्पावधीतच उघडकीस आणून श्री. गणपतीच्या अंगावरील चोरीस गेलेले सर्व दागिने हस्तगत करण्यात आलेले आहे. याबाबत सर्व नागरिकांनी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील व स्थानिक गुन्हे शाखेचे अभिनंदन करून कौतुक केले आहे. तसेच नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी हा गंभीर गुन्हा उघडकीस आणणा-या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास 10,000/- रुपये रोख बक्षिस जाहीर केले.
याविषयी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दिनांक 08/01/2023 रोजी रात्री 11.00 ते दिनांक 09/01/2023 रोजीचे सकाळी 04.41 वाजेच्या दरम्यान नंदुरबार शहरातील दंडपाणेश्वर गणपती मंदिराच्या गाभाऱ्याचे मुख्य दरवाज्याचे कुलूपाचा कडी कोयंडा तोडून गणपतीचे अंगावरील एक ते सव्वा किलो चांदीच्या दागिण्यांचे आभूषणे व दानपेटीमधील 12 हजार रुपये रोख रुपये तसेच श्री. पुखराज मोडमल जैन यांचे फार्म हाऊसमध्ये असलेल्या जैन मंदिरामधील दान पेटी फोडून अंदाजे 10हजार रुपये रोख असा एकुण 52,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेले होते. त्याबाबत श्री. चंद्रकांत प्रल्हाद चौधरी वय 50) रा. जळका बाजार पोस्ट ऑफिस जवळ, नंदुरबार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात दाखल आहे.
सदरची घटना नागरिकांच्या धार्मिक भावनेशी निगडीत असल्याने नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. सचिन हिरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी गुन्हयांतील आरोपीतांना तात्काळ अटक करुन गुन्हयातील मुद्देमाल हस्तगत करुन व आरोपीतांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
चोरट्यांनी दंडपाणेश्वर गणपती मंदिरामधील सी. सी. टी. व्ही. चा DVR देखील चोरुन नेला म्हणून चोरट्यांचा शोध घेवून त्यांना ताब्यात घेण्याचे व गुन्ह्यातील श्री. गणपतीचे चांदीचे आभूषणे हस्तगत करण्याचे मोठे आव्हान पोलीसांसमोर होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळाच्या परिसरातील अनेक सी.सी.टी.व्ही. तपासून अज्ञात आरोपीतांची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. परंतु CCTV फुटेज अस्पष्ट असल्यामुळे आरोपीतांची निश्चित ओळख होत नव्हती.
नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, नंदुरबार शहरातील दंडपाणेश्वर श्री. गणपती मंदिरातील चोरी मध्य प्रदेश राज्यातील बडवाणी जिल्ह्यातील रेकॉर्ड वरील आरोपी किरतलीया शिवराम ब्राम्हणे रा. मोहाला ता. सेंधवा जि. वडवाणी याने त्याच्या एका साथीदाराच्या मदतीने मिळून केली असून गुन्हयातील चोरी केलेला मुद्देमाल विक्री करण्याकरीता जळगाव सराफ बाजारात जाणार आहे. तसेच दोन्ही आरोपीतांवर यापुर्वी देखील मालमत्तेविरुध्द गुन्हे दाखल सदरची माहीती नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर यांना कळवून संशयीत किरतलीया ब्राम्हणे यांना ताब्यात घेवून माहीतीची खात्री करुन पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर यांनी तात्काळ एक पथक तयार करुन मध्यप्रदेश राज्यातील बडवाणी जिल्ह्यातील सेंधवा येथे रवाना केले. तपास पथकाने मध्यप्रदेश राज्यातील सेंधवा तालुक्यातील मोहाला गाठून दोन्ही आरोपीतांचा शोध घेतला
जळगांव शहरातील सराफ बाजार व आजू-बाजूला वेषांतर करुन सापळा रचून शिताफिने ताब्यात घेतले. किरतलीया शिवराम ब्राम्हणे (तडवी) वय 35 वर्षे आणि जतन रुमसिंग मोरे वय 25 वर्ष दोन्ही राहणार- मोहाला ता. सेंधवा जि. बड़वानी (म.प्र राज्य) असे दोघांचे नाव आहे. पथकाने त्यांच्या कडील कापडी पिशवीमधून 66,550/- रुपये किमतीचे 1 किलो 210 ग्रॅम वजनाचे गणपतीच्या अंगावरील चांदीचे दागिने, 17.260/- रुपये रोख व 60 हजार रुपये किमतीची एक लाल काळया रंगाची होंडा कंपनीची शाईन मोटार सायकल क्रमांक MP.46 MW. 0533 असा एकूण 1.44.170/- रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
या दोन्ही संशयीत आरोपींनी मागील एक ते दिड वर्षापूर्वी नंदुरबार शहराच्या अलीकडे असलेल्या 10 ते 12 कि.मी. असलेल्या एका गावातील घराचे कुलुप कडी कापून घरात प्रवेश करुन एका लोखंडी पेटीतील रोख रक्कम व सोने चांदीचे दागिने चोरून नेले होते. दोन्ही संशयीत आरोपीतांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी सांगितले आहे.
सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी, श्री. सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर, सहा. पोलीस निरीक्षक श्री. संदीप पाटील, पोलीस हवालदार मुकेश तावडे, पोलीस नाईक राकेश मोरे, विकास कापूरे, मोहन ढमढेरे पोलीस अंमलदार विजय ढिवरे, अभय राजपूत, किरण मोरे यांच्या पथकाने केली आहे.