नंदुरबार – येथील जमीन विकासक देवेंद्र जैन यांच्या कार्यालयात पिस्तुलचा धाक दाखवून एकोणावीस लाखाची रक्कम दरोडेखोरांनी चोरून नेल्याचा बनाव रचणाऱ्या कर्मचाऱ्यांसह चारही आरोपींना न्यायालयाने रोख दंडासह 21 महिन्यांची शिक्षा ठोठावली.
घटनेची पार्श्वभूमी अशी की, येथील जमीन विकासक देवेंद्र चंदनमल जैन यांच्या डी.सी. डेव्हलपर्स कार्यालयात दि.१९/०८/२०२० रोजी सकाळी ८.२४ वाजेच्या दरम्यान वरील दोन जणांनी जबरीने त्यांच्या कार्यालयात प्रवेश केला. त्यांचा कामगार उमेदसिंग याला मारहाण करत व नंतर पिस्टलचा धाक दाखवून उमेदसिंग याचे सेलो टेपने हातपाय व तोंड बांधून त्यास ऑफिसच्या किचनमध्ये कोंडून, त्यानंतर त्याच्या ऑफिसच्या वेगवेगळ ठिकाणी ठेवलेल्या टेबलांच्या ड्रावरमधून रोख रक्कम १५,६९,००० रुपये जबरीने चोरी करून निघून गेले, अशी रचलेली कथा उमेदसिंग याने जैन यांना ऐकवली. त्याप्रमाणे त्यांनी पोलिसांना माहिती दिली परंतु तो बनाव असल्याचेेे लगेच उघड झाले. भगतसिंग ऊर्फ भगू व नोकर उमेदसिंग यांनीच संगनमत करून कट कारस्थान रचून जबरी चोरी केलेली आहे. तसेच विक्रमसिंग राजपूत यांच्या घरुन देखील बॅगेसह ४ लाख रुपये चोरून नेले म्हणून एकुण १९,६९,००० रुपये जबरी चोरी करून नेल्याची तक्रार शहर पोलीस स्टेशनला नोंद झाली होती. याप्रकरणी आज दिनांक १४ सप्टेबर २०२१ रोजी मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही. जी. चव्हाण यांच्या न्यायालयात नंदुरबार शहर पोस्टे गु.र.नं. ६५८/२०२० नि.फौ.ख. २२०/२०२० मधील आरोपी उमेदसिंग भवरसिंग राजपूत, भगतसिंग जोगसिंग राजपुत, उत्तम जेसाराम सुदेशा, राजु माळी उर्फ हर्षनराम सुजानराम चौधरी यांना भा. द.वि. कलम 394 (जबरी चोरी) व 120(ब) मध्ये दोषी धरून प्रत्येकी ७ वर्षे शिक्षा व रु. 287750 प्रत्येकी दंड व दंड न भरल्यास प्रत्येकी २१ महिने कैद सुनावण्यात आली. आरोपी क्रं. 1 व 3 यांना भा. द.वि. कलम 380 मध्ये दोषी धरून 5 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व प्रत्येकी रू. 200000 दंड व दंड न भरल्यास 19 महिने शिक्षा ठोठावली आहे. सदर खटला हा परिस्थितीजन्य व सीसीटीव्ही फुटेजवर आधारित होता. तपासणी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक सुनिल नदंवाळकर, पोलीस निरीक्षक किशोर नवले, पोलीस निरीक्षक विजयसिंह परदेशी, पोलीस ऊपनिरीक्षक योगेश राऊत यांनी काम पाहिले तर कोर्ट पैरवी पोलीसनायक गिरीष पाटील यांनी केली. सदर खटल्यात सरकारपक्षातर्फे सरकारी वकील म्हणून सुनिल पेचरा पाडवी यांनी काम पाहिले.