दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी होणार रेशन कार्ड अदालत

 

नंदुरबार – तालुक्यातील नागरिकांच्या रेशन कार्ड संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी तहसील कार्यालयात दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी “रेशन कार्ड अदालत” आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती तहसिलदार मिलींद कुलथे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

या अदालतीमध्ये नवीन रेशन कार्ड काढणे, नावात बदल करणे, नाव कमी करणे, नावात दुरुस्ती करणे, रेशनकार्डची ऑनलाईन दुय्यम प्रत तसेच महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजने संबंधित समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे. रेशन कार्ड, धान्य वाटप याबाबत स्वस्त धान्य दुकानदारांच्या तक्रारी आणि पुरवठा विभागाच्या ऑनलाइन कामांबाबतच्या समस्यांवरही या अदालतीमध्ये विचार केला जाणार आहे.

शासनाच्या 100 दिवसांच्या कृती आराखड्याचा भाग म्हणून हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना 25 किलो तांदूळ आणि 10 किलो गहू तसेच प्राधान्य कुटुंब लाभ योजनेतील लाभार्थ्यांना 3 किलो तांदूळ आणि 2 किलो गहू मोफत वितरित करण्यासाठी नियतन मंजुर करण्यात येते.

अदालतीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असेही आवाहन तहसिलदार श्री. कुलथे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!