नंदुरबार – अचानक बदललेल्या वातावरणामुळे मागील आठवड्यापासून नंदुरबार जिल्ह्यात सर्वत्र रोज सकाळ संध्याकाळ धुके दाटलेले आढळून येत आहे. संपूर्ण नंदुरबार शहर आणि जिल्ह्यातील प्रत्येक गाव रोज सकाळ-संध्याकाळ जणू धुक्याच्या चादरीखाली झाकले जाते. सोबतीला निर्माण झालेला गारठा तरुणाईला आणखीनच रोमँटिक बनवत आहे.
वर्षातून मोजक्या वेळेस अनुभवायला मिळणारे हे नैसर्गिक बदल अनेक परिणाम घडवताना दिसले. जसे की, तरुणांमधील उत्साह वाढल्याने ते या वातावरणाची मौज लुटताना दिसत आहेत. काही जण अशा वातावरणात छान संगीत ऐकत मोटारीने फेरफटका मारण्याचा निराळा आनंद अनुभवताहेत. तरुणाईचा रोमँटिक मूड तर चांगलाच फेसाळत आहे. पण त्याच वेळी काही जणांच्या प्रकृतीला मानवत नसल्यामुळे श्वासोच्छ्वासाच्या, दम्याच्या व सांधेदुखीच्या तक्रारी वाढल्या आहेत. शेतातील काही पिकांना नुकसानकारक आणि पिकावरील रोगांना निमंत्रण देणारे ठरत असल्याने शेतकऱ्यांना देखील ते नकोसे वाटत आहे. सर्व स्तरावर विशिष्ट शिथिलता (आळस) असून मसालेदार चहा कॉफी सारख्या उत्तेजक पेयांची आनंद घेण्याकडे कल वाढला आहे.
सध्या रोज सायंकाळी पाच वाजेपासूनच धुक्याची चादर हळूहळू ओढली जाऊन अंधार पसरायला सुरुवात होते. सकाळी देखील सात वाजे ऐवजी 8 वाजे नंतरच सूर्यप्रकाश पसरू लागतो. जणू सूर्यनारायण देखील धुक्याचे वातावरण एंजॉय करत असावे. मागील आठवड्यात पावसाने आणि गारठ्याने धुमाकूळ घातला होता. आता दिवसाचे तापमान 29 अंश सेल्सिअस तर रात्र-पहाटेचे कमीत कमी तापमान 16 अंश सेल्सिअस दरम्यान राहू लागले आहे. आर्द्रता 56% दरम्यान आहे. पुढील दहा दिवस असेच वातावरण राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.