वाचकांचे पत्र:
दिल्लीतील प्रदूषण आणि दिल्ली सरकारने चालविलेली भाविकांची थट्टा
छट पूजेच्या वेळी दिल्लीतून वहाणार्या यमुना नदीचे पाणी पुष्कळ प्रदूषित असल्याचे बातम्यांमधून पाहीले. त्यातून विषारी फेसाचे मोठे थर पाण्यावर तरंगताना पाहीले तेव्हा मनात उद्रेक निर्माण होऊन भाविकांची दिल्ली सरकारने थट्टा चालविली आहे ह्याची जाणीव झाली. छट पूजा करतांना भाविकांना पुष्कळ अडचणी आल्या. त्यांनी स्वतःच्या आरोग्याशी तडजोड करून वर्षातून एकदाच येणाऱ्या छट पूजेला महत्व दिले. देहलीतील हवेतील प्रदूषणाचे कारण ‘हरियाणा येथे शेतातील तण जाळून धूर असे सांगितले जाते. तसेच काहींनी देहलीतील फटाक्यांचे कारणही दिले; मात्र ह्या दोन्ही गोष्टी विशिष्ट कालावधीपर्यंत असतात. देहलीतील हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी युद्ध पातळीवर उपाययोजना राबवल्या जाणे आवश्यक आहेत; मात्र तसे होतांना दिसत नाही. आप सरकारने ‘सम आणि विषम दिवशी वेगवेगळ्या लोकांनी त्यांच्या गाड्या वापराव्यात’, अशी योजना राबवली; मात्र ती कालांतराने बंद झाली कि त्याकडे दुर्लक्ष झाले, हे सरकारलाच ठाऊक ! देहली हे राजधानीचे शहर असल्याने तेथे ये-जा करणार्या वाहनांची संख्या अधिक जरी असली तरी जगातील कितीतरी मोठी शहरे कसे प्रदूषण नियंत्रण करतात ह्याचा अभ्यास करून देहली प्रदूषणमुक्त करणे काळाची गरज आहे. दरवर्षी एकच प्रदूषणाचा राग गायचा का? दिल्लीत प्रदूषण करणारे उद्योगधंदे शहराबाहेर हालवले पाहिजेत कारण पाण्यातील अमोनियाचा फेस हा इंडस्ट्रीतील रसायने योग्य प्रक्रिया न करता सरळ यमुना नदीत सोडून लोकांच्या जीवनाशी खेळण्याचा प्रकार आहे. अशा व्यावसायिकांवर कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे. इतरांवर ताशेरे ओढत बसण्यापेक्षा दिल्ली सरकारने प्राधान्याने अभ्यासपूर्वक प्रदूषण नियंत्रण करून दिल्लीच्या जनतेला वेठीस न धरता स्वच्छ हवा आणि पाणी द्यावे ही विनंती आहे.
– डॉ. भारती अनिल हेडाऊ, यवतमाळ