दिवाळीतील प्रत्येक दिवसाचे आहे ‘हे’ महत्त्व

गरीबातील गरीब आणि श्रीमंतातील श्रीमंत व्यक्तीही हा सण साजरा करते, इतका हा सण लाडका आहे; म्हणूनच तो सर्व सणांचा अनभिषिक्त सम्राट आहे. हा दिव्यांचा, म्हणजेच प्रकाशाचा सण आहे. अंधकारातून प्रकाशाकडे नेणारा, म्हणजेच ‘तमसो मा ज्योतिर्गमय ।’ (म्हणजे ‘मला अंधाराकडून प्रकाशाकडे ने’), असा सण आहे. या सणाच्या वेळी ‘दारी सडा शिंपणे, रांगोळ्या काढणे, पहाटे लवकर उठून तेल आणि उटणे लावून अभ्यंगस्नान करणे; गूळ, खोबरे, तूप, तीळ इत्यादी वापरून फराळाचे पदार्थ बनवणे’ इत्यादी कृती करतात. हा निसर्ग, स्वच्छता, आरोग्य, बुद्धी, कलात्मकता आणि धन यांचा सण आहे.

 दिवाळीतील प्रत्येक दिवसाचे महत्त्व

 

 वसुबारस, म्हणजेच ‘गोवत्स द्वादशी’ या दिवशी गोवत्सपूजन केले जाणे : आपल्याला कदाचित् ज्ञात नसेल; परंतु दीपावलीचा खरा आरंभ ‘वसुबारस’ या दिवसापासून होतो. ‘वसू’ म्हणजे धन आणि ‘बारस’ म्हणजे द्वादशी. या दिवशी गोवत्सपूजा करतात. त्यामुळे या दिवसाला ‘गोवत्स द्वादशी’, असेही म्हणतात. आपला देश कृषीप्रधान असल्यामुळे गोमातेला अधिक महत्त्व आहे. त्यामुळे दिवाळीसारख्या मोठ्या सणाचा आरंभ गोवत्सपूजनाने (गो म्हणजे गाय आणि वत्स म्हणजे वासरू यांच्या पूजनाने) केला जातो. सदैव शांत, तृप्त आणि समाधानी दिसणारी, वात्सल्याने भरलेली गाय आणि आपले टपोरे काळे डोळे विस्फारून अन् कान टवकारून निरांजनाकडे पहाणारे तिचे गोजिरवाणे बछडे, म्हणजे माय-लेकरांचे मंगल रूप आहे. त्यांच्या दर्शनाच्या शुभशकुनानंतर दीपावलीला आरंभ होतो.

 धनत्रयोदशीच्या दिवशी ‘धन, धन्वन्तरिदेवता आणि यमदेवता’ यांचे केले जाणारे पूजन ! : आश्विन वद्य त्रयोदशी, म्हणजेच धनत्रयोदशी ! या दिवशी मृत्यूदेवतेला म्हणजेच यमराजाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्याचे स्वागत करण्यासाठी दीपदान करतात. यमाचे महत्त्व सांगून त्याला आपला मित्र बनवणारा हा दिवस आहे. ‘आपला मृत्यू योग्य वेळी आणि समाधानाने व्हावा’, यासाठी यमपूजा करतात. ‘आपल्याला दीर्घायुष्य लाभावे’, ही यमाजवळ प्रार्थना !

योगायोग बघा, ज्या दिवशी (धनत्रयोदशीला) धन, वैभव आणि सोने-नाणे यांची पूजा केली जाते, त्याच दिवशी आयुर्वेदाचे पिता ‘धन्वन्तरि’ जन्माला आला. वैभवाचा खरा लाभ घेण्यासाठी निरोगी शरीर आणि मन यांची आवश्यकता असते. यासाठी आजच्या दिवशी धन्वन्तरीचे स्मरण करून त्याची जयंती साजरी करावी. या दिवशी धनाची आणि यमदेवतेची पूजा करावी. हा मृत्यूला मित्र बनवणारा आणि निरोगी शरिराचा संकल्प करण्याचा दिवस आहे.

 नरकचतुर्दशी: नरकासुर आणि श्रीकृष्ण यांची कथा : अभ्यंगस्नानाच्या गडबडीतच नरकचतुर्दशीची मंगल प्रभात उगवते. श्रीकृष्णाच्या काळात आसाममध्ये ‘नरकासुर’ नावाचा राजा होता. त्याने त्याच्या नावाप्रमाणे राज्याचा नरक केला होता. तो भारतातून सुंदर सुंदर कुमारिकांना पळवून आणून त्याच्या कैदेत ठेवत असे आणि त्यांचा वाममार्गासाठी उपयोग करत असे. त्याच्या या राक्षसी वृत्तीमुळे त्याला कुणी विरोध करत नसे. या कुमारिकांच्या सग्या-सोयर्‍यांनी केलेल्या याचनेमुळे श्रीकृष्ण त्यांच्या साहाय्याला धावला. घनघोर युद्धात त्याने नरकासुराचा निःपात केला. श्रीकृष्णाने नरकासुराच्या बंदीखान्यातून १६ सहस्र १०० कुमारिकांना मुक्त केले. मृत्यूसमयी नरकासुराची सद्बुद्धी जागृत झाली आणि त्याने समाजासाठी वर मागितला, ‘जो कुणी आजच्या तिथीला सूर्याेदयापूर्वी स्नान करील, त्याला नरकवास मिळू नये.’ त्याचे स्मरण म्हणून ‘अभ्यंगस्नान’ ही प्रथा रूढ झाली.

मुक्त केलेल्या तरुणींना स्वगृही नेण्यासाठी त्यांचे स्वकीय पुढे येईनात. त्यामुळे श्रीकृष्ण चकित झाला. त्याने सर्वांना समजावण्याचा प्रयत्न केला; परंतु नीतीमत्तेच्या दांभिकतेला बळी पडलेल्या समाजातील कर्त्या पुरुषांनी त्या तरुणींचा त्याग केला. अशा स्त्रियांना असेच असाहाय्य स्थितीत सोडणे, म्हणजे परत स्वैराचाराच्या, कलंकतेच्या नरकात सोडण्यासारखेच होते. शेवटी श्रीकृष्णाने त्यांचा ‘पती’ होण्याचे ठरवले. ‘पती’ या शब्दाचा अर्थ ‘पालक’ असाही होतो. श्रीकृष्ण त्यांचा ‘अवनी’ म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा यांची सोय करणारा झाला. श्रीकृष्णाने त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवून त्यांना प्रतिष्ठा प्राप्त करून दिली.

 या दिवसाचा संदेश : ‘निर्दाेष मुलींना बहिष्कृत केले’, हे पुरुषप्रधान संस्कृतीचेच उदाहरण आहे. समोर अन्याय दिसत असतांना डोळे, कान आणि तोंड बंद ठेवून बसणे कितपत योग्य आहे ? म्हणून हा पुरुषांच्या मानसिकतेच्या परिवर्तनाचा दिवस आहे. ‘अनिष्ट रूढी आणि परंपरा यांतून अबला स्त्रीला मुक्त करून तिचे सबलतेत रूपांतर करणे’, हा या दिवसाचा संदेश आहे.

 लक्ष्मीपूजन कष्टाने मिळालेले धन ही ‘लक्ष्मी’ आणि दुसर्‍याला फसवून मिळवलेले धन ही ‘अलक्ष्मी’ असणे : आश्विन अमावास्येला लक्ष्मी आणि कुबेर यांचे पूजन केले जाते. हिंदु संस्कृतीत लक्ष्मीला फार महत्त्व आहे. धनामुळेच समाज आणि राष्ट्र यांचा उत्कर्ष होतो. धन नेहमी घाम गाळून कष्टाने मिळते. जे धन दुसर्‍याला फसवून आणि लबाडी करून मिळते, ती लक्ष्मी नव्हे, तर अलक्ष्मी आहे. ती अविद्या आणि अज्ञान आहे. ज्या लक्ष्मीला धर्माचे अधिष्ठान आणि सरस्वती अन् चारित्र्य यांची संगत नाही, अशी लक्ष्मी हे एक संकट आहे. त्याचा अंत दुःखातच होतो.

 लक्ष्मीपूजनाला लक्ष्मीसह निरपेक्ष, संयमी आणि स्थितप्रज्ञ असलेल्या कुबेराचेही पूजन केले जाणे : मनुष्याला प्रमाणापेक्षा अधिक धन मिळत गेले, तर त्याच्यातील अहंकार वाढतो. तो इतरांचा तिरस्कार करतो; म्हणूनच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कुबेराचे स्मरण करतात. कुबेर हा इंद्राचा खजिनदार आहे. त्याच्याजवळ एवढी संपत्ती असूनही तो निर्लाेभी आहे. कुबेराने केलेल्या शंकराच्या भक्तीमुळे तो परम वैराग्यशील आहे. तो निरपेक्ष, संयमी आणि स्थितप्रज्ञ आहे; म्हणून या मंगल दिवशी लक्ष्मीपूजनासह कुबेराचेही पूजन करतात.

बलीप्रतिपदा: साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त : लक्ष्मीपूजनानंतर येतो पाडवा, म्हणजेच बलीप्रतिपदा ! साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त म्हणून हा महत्त्वाचा दिवस आहे. या दिवसापासून शुभकार्याला आरंभ करण्याची प्रथा आहे. ‘विक्रम संवत्’ आणि ‘महावीर संवत्’ यांचा नववर्षारंभ याच दिवसापासून होतो.

 बळीराजा आणि वामन यांची कथा : बळीराजा दानशूर, प्रजाप्रेमी आणि सत्यवचनी होता. त्याला त्याच्या दानशूरपणाचा अहंकार झाला होता. त्याचा अहंकार न्यून करण्यासाठी विष्णूने वामनावतार धारण केला आणि तो बळीराजाकडे याचक म्हणून गेला. बळी वामनाला म्हणाला, ‘‘काय हवे ?’, ते माग.’’ त्यावर वामन उत्तरला, ‘‘मला केवळ त्रिपाद भूमी हवी.’’ तेव्हा बळीला सर्वकाही उमगले; परंतु त्याने वामनाला दिलेला शब्द पाळला. ‘भूमी दिली’, असे म्हणून तो गरजला. वामनाने त्याच्या एका पावलात स्वर्ग आणि दुसर्‍या पावलात पृथ्वी व्यापली. वामनाने ‘तिसरे पाऊल कुठे ठेवू ?’, असे विचारताच बळीने आपले मस्तक पुढे केले. विष्णूने त्याला पाताळात गाडले; पण एक वर दिला. तो वर समाजाच्या हिताचा होता, ‘जो कुणी बलीप्रतिपदेला दीपदान करील, त्याला यमयातना होणार नाहीत. त्याच्या घरी लक्ष्मीचा सदा वास राहील.’

 लक्ष्मीने विष्णूचे औक्षण केल्याचे प्रतीक म्हणून या दिवशी पत्नी पतीला ओवाळत असणे : लक्ष्मीला आपल्या पतीचे, म्हणजे श्रीविष्णूचे कौतुक वाटले; म्हणून तिने विष्णूचे औक्षण केले. विष्णूने लक्ष्मीला ओवाळणी म्हणून हिरे, माणके इत्यादी अलंकार दिले. यामुळेच आजही बलीप्रतिपदेला पत्नी पतीला ओवाळते आणि पती पत्नीला भेटवस्तू देतो.

 याच दिवशी श्रीकृष्णाने गोवर्धनपूजेचा प्रारंभ करणे आणि त्यातून रूढ झालेली किल्ल्यांचे देखावे उभारण्याची प्रथा ! : श्रीकृष्णाने आजच्या दिवशीच गोवर्धनपूजेचा प्रारंभ केला. निसर्गाप्रती मानवाच्या कृतज्ञतेचा हा आरंभ होता. त्या निमित्त पाडव्याला श्रीकृष्ण, गोपिका आणि गोवर्धन पर्वत यांच्या देखाव्याची पूजा होई. तेव्हापासून या दिवशी किल्ले, म्हणजे गड, सैनिक आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे मोठ्या कल्पकतेने देखावे उभारण्याची प्रथा महाराष्ट्रात रूढ झाली. यातून मुलांमधील कलागुण आणि कल्पनाशक्ती यांना वाव मिळू लागला.

 भाऊबीज, म्हणजे यमद्वितीया ! : कार्तिक शुक्ल पक्ष द्वितीयेला भाऊबीज साजरी करतात.

३ ऊ १. यमाने त्याची बहीण यमुना हिच्या घरी जाऊन वस्त्रे, अलंकार इत्यादी भेटी देऊन तिच्या घरी भोजन केले; म्हणून या दिवसाला ‘यमद्वितीया’ म्हणतात.

 बहिणीने भावाला ओवाळणे आणि ‘भावाला स्वास्थ्य अन् समृद्धी लाभावी’, अशी निःस्वार्थीपणे मनोमन कामना करणे : या दिवशी भाऊ बहिणीच्या घरी येतो. बहीण त्याच्या आवडीचे पक्वान्न बनवते. ती त्याला प्रेमाने भरवते. त्यानंतर दोघांच्या मनसोक्त गप्पा होतात. त्यांच्या जुन्या रेशमी आठवणींना उजाळा मिळतो. संध्याकाळ पणत्या आणि आकाशकंदील यांच्या प्रकाशात न्हाऊन निघते. बहीण सजते आणि भावाचे औक्षण करण्याची सिद्धता करते. ती भावाला प्रेमाचा टिळा लावते आणि त्याला हसतमुखाने ओवाळते. त्या वेळी भाऊ बहिणीकडे अगदी कौतुकाने पहात असतो. बहीण ‘भावाला आरोग्य आणि समृद्धी लाभावी’, अशी निःस्वार्थीपणे मनोमन कामना करते. इतका लोभसवाणा भावा-बहिणींच्या मंगल प्रेमाचा दिवस, म्हणजे खरोखरच भारतीय संस्कृतीतील सोनेरी पानच म्हणावयास हवे.

 भाऊ नसल्यास चंद्राला ओवाळण्याची पद्धत असणे : भाऊ नसल्यास चंद्राला ओवाळण्याची पद्धत आहे. चंद्राला सार्‍या भगिनींचा भाऊ मानल्यामुळे तो सार्‍या बालगोपाळांचा लाडका ‘चंदामामा’ झाला आहे. ‘आपल्या सणांच्या कल्पना किती विशाल आहेत !’, हेच या उदाहरणावरून दिसून येते.’

(संदर्भ : दैनिक सनातन प्रभात)

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!