नंदुरबार – अवघ्या चार दिवसांवर दीपावली सण आला असतांना येथील राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन चालू ठेवल्यामुळे लाल परीवर विसंबून राहणाऱ्या मध्यमवर्गीय प्रवाशांना फटका बसला. शासकीय कर्मचारी म्हणून सामावून घ्यावे, यासह विविध मागण्यांसाठी हे बंद आंदोलन चालू आहे. नंदुरबारसह शहादा, तळोदा, नवापूर, अक्कलकुवा, धडगाव येथील सर्व फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांचे हाल झाले.
दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे खाजगी वाहतूकदारांनी भाडेवाढ करून संधीचा फायदा घेतला. नंदुरबार बस स्थानकावरुन धुळे, शहादा, तळोदा, नवापूर, अक्कलकुवा या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांना नेहमीपेक्षा जास्त दराने प्रवास भाडे द्यावे लागले. यात सुमारे 25 ते 40 टक्के भाडे वाढ झाल्याने अनेक प्रवाशांना नाहक भुर्दंड बसला.
सण उत्सव येऊन ठेपल्याने बाहेरगावी जाण्यासाठी अनेकांनी नियोजन केले होते मात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे अनेकांचा हिरमोड झाला. एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे राज्य शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे तसेच वेळोवेळी मागणी करून देखील कुठलीही दखल न घेतल्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे शस्त्र हाती घेतले. बुधवारी दुपारनंतर कर्मचारी संघटनांनी सर्व मतभेद विसरून एकत्रित येऊन आंदोलनाला प्रारंभ केला. परंतु विशेष असे की बुधवारी जेवढे प्रवासी उपस्थित होते त्या प्रवाशांना आणि विद्यार्थ्यांना सोडल्यानंतर बंद आंदोलन सुरू करण्यात आले. नंदुरबार एसटी डेपोच्या प्रवेशद्वाराजवळ मंडपात वाहक आणि कामगार असे सुमारे कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. गुरुवारी सायंकाळपर्यंत कुठलेही ठोस आश्वासन मिळाले नसल्यामुळे आणि शासनाकडून अद्याप दखल नसल्याने कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन सुरूच आहे.