नंदुरबार- शेतकऱ्यांचे आंदोलन चालू असताना आंदोलकांवर ट्रॅक्टर चालवण्याच्या घटनेवरून काँग्रेस पक्षासह समविचारी पक्षांनी एकत्र येत देशव्यापी संप पुकारला आहे. त्याचाच भाग म्हणून योगी सरकारचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील महा विकास आघाडी सरकारने पुकारलेल्या बंदमध्ये सामील व्हावे; असे आवाहन नंदुरबार जिल्हा काँग्रेसच्या वतीने पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी पत्रकार परिषदेत केले.
दिलीप नाईक म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार मधील घटक पक्षाचे जिल्ह्यातील नेते पदाधिकारी, जिल्हा अध्यक्ष, जिल्हा प्रमुख यांच्या समवेत महाराष्ट्र बंद बाबत चर्चा झाली आहे. सर्व समाजघटकांना सहभागी होण्यासाठी आवाहनही केले आहे. महाराष्ट्र प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशावरून जिल्हा व तालुका स्तरावरील काँग्रेसच्या सर्व आघाडी संघटना व सेलच्या प्रमुखांनी महाराष्ट्र बंद यशस्वी करावा; असेही नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी आवाहन केले.
दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुक निकालाच्या पार्श्वभूमीवर दिलीप नाईक पुढे म्हणाले की, अक्कलकुवा धडगाव तालुक्यातून मतदारांनीच भाजपाला हद्दपार केले आहे. जिल्हा परिषद पोटनिवडणुकीच्या निकालावरून हे चित्र स्पष्ट झाले. ते म्हणाले की, भाजपाला कोणत्याही परिस्थितीत सत्तेपासून दूर ठेवण्याचे टारगेट महाविकास आघाडीचे आहे. त्यानुसार आलेल्या सूचना अमलात आणून कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत मेहनत घेतली आणि त्याला यश मिळाले. आदिवासी दुर्गम भागातून भाजपा हद्दपार झाल्याचे चित्र दिसत असल्याचा दावा त्यांनी केला.