दैवी आवाजाची देणगी लाभलेल्या गाणंसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर !
आई-वडिलांच्या संस्काराचा वारसा घेऊन अतिशय साधे राहणीमान असलेल्या व लहानपणापासूनच संगीताची भावमय आराधना करणाऱ्या गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर म्हणजे संगीताच्या क्षेत्रातील एक अद्भुत चमत्कार होत्या.
मुलींनी घराबाहेर पडून शिक्षण घेण्यास प्रतिकूल असणाऱ्या काळात त्यांचे वडील सुप्रसिद्ध गायक मास्टर दिनानाथ मंगेशकर यांनी त्यांना गाण्याचे शिक्षण दिले. त्यांना लताताईंच्या गाण्यावर विश्वास होता, तो विश्वास लताताईंच्या बोलण्यातून दिसायचा. वडील गेल्यावर ही ‘बाबा माझ्या पाठीशी आहेत’ असे त्यांना नेहमी वाटायचे त्यांना लहानपणापासूनच वडिलांकडून गायनाचे धडे मिळाले वयाच्या 9 व्या वर्षी लताताईंनी वडिलांच्या समवेत थिएटरमध्ये शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम केला होता. असामान्य ग्रहणशक्ती असणाऱ्या लताताईंच्या गळ्यात गंधार आहे असे त्यांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर म्हणायचे.
लताताईंच्या आवाजावर अमेरिकी वैज्ञानिकांनी संशोधन केले आहे. त्यांनी म्हटले आहे, ‘लता मंगेशकरांच्या आवाजाइतका सुरेल आवाज यापूर्वी नव्हता आणि येणार्या काळातही असण्याची शक्यता फारच अल्प आहे.’ यावरून लताताईंच्या आवाजाचा दैवीपणा लक्षात येतो.
एकदा लताताईंना विचारले गेले होते , ‘‘तुम्ही तुमच्या यशाचे श्रेय कोणाला देता ?’’ तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘देवाला आणि वडिलांना देते.’’
‘मी माझ्या आतील देवाला संतुष्ट करण्यासाठी गाते’, असा त्यांचा भाव असायचा. ‘प्रथम देवाला संतुष्ट करा, म्हणजे आपोआप गाण्याचा आनंद जगाला मिळेल’, असे त्यांना वाटायचे.
एकदा मुलाखतीला उत्तर देतांना त्या म्हणाल्या, ‘‘इतर गाण्यांपेक्षा ज्ञानेश्वरीतील ओव्या, गीतेतील श्लोक आणि संत मीराबाई यांचे अभंग गाण्यात माझे मन अधिक रमते. मला आध्यात्मिक बैठक असलेली गाणी म्हणायला पुष्कळ आवडते. मी इतर गाणी केवळ व्यवसाय म्हणून गाते. पारंपारिक आणि आध्यात्मिक गीते गातांना व्यवसाय आणि पैसा माझ्या डोळ्यांसमोर नसतो. त्यामुळे ही गीते म्हणतांना माझ्या मनाला एक वेगळाच आत्मिक आनंद मिळतो.’’
भारतातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित सहा दशके संगीताची आराधना करणाऱा हा सुर अनंतात विलीन झाला. गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली !
– डॉ०. प्रणिता महाजन,
संभाजीनगर