मुंबई – खादी आणि ग्रामोद्योग आयोगा (KVIC) ने अलीकडच्या वर्षांत बनावट खादी नसलेल्या उत्पादनांच्या विक्रीविरुद्ध “शून्य सहनशीलता” स्वीकारली आहे. त्यानुसार त्यांनी आपल्या सर्वात जुन्या मुंबई खादी आणि ग्रामोद्योग संघटनेचे (MKVIA) “खादी प्रमाणन” रद्द केले आहे, जे 1954 पासून मुंबईतील डॉ. डीएन सिंग रोड येथील हेरिटेज बिल्डिंग मेट्रोपॉलिटन इन्शुरन्स हाऊसमध्ये प्रतिष्ठित “खादी एम्पोरियम” चालवत होते.
अलीकडे फॅशनचा भाग म्हणून खादीला मोठ्या प्रमाणात पसंती दिली जाते. खादी वापरणे आता प्रतिष्ठेचे देखील मानले जाते. परिणामी खरेदी करणाऱ्यांचा कल वाढला आहे. “खादी एम्पोरियम”च्या माध्यमातून मुंबई खादी आणि ग्रामोद्योग संघटना विविध खादी उत्पादने विकण्याचे कार्य 68 वर्षापासून करीत आहे. परंतु ही संस्स्थाच बिगर खादी उत्पादने विकून करारा विरुद्धध कृती करीत होती, असा ठपका खादी ग्रामोद्योग आयोगाने ठेवला आहे.
याविषयी शासकीय माहितीत म्हटले आहे की, खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या निरीक्षणात आले की डॉ. डी.एन. रोड येथील ‘खादी एम्पोरियम’ अस्सल खादीच्या नावाखाली खादी नसलेल्या उत्पादनांची विक्री करत आहे. नियमित तपासणी दरम्यान, खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या अधिकार्यांनी एम्पोरियममधून नमुने गोळा केले. जे ‘खादी’ नसल्याचे आढळून आले. आयोगाने जारी केलेल्या “खादी प्रमाणपत्र” आणि “खादी मार्क प्रमाणपत्र” च्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने आता मुंबई खादी आणि ग्रामोद्योग संघटनेला कायदेशीर नोटीस बजावली आहे. नोंदणी रद्द केल्यामुळे, ‘खादी एम्पोरियम’चे अस्सल खादी आउटलेट बंद झाले असून यापुढे एम्पोरियमकडे खादी उत्पादने विकण्याची परवानगी राहिलेली नाही. मुंबई खादी आणि ग्रामोद्योग संघटने विरुद्ध कायदेशीर कारवाईचाही खादी आणि ग्रामोद्योग आयोग विचार करत आहे.
खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने 1954 मध्ये खादी एम्पोरियमचे संचालन आणि व्यवस्थापन मुंबई खादी आणि ग्रामोद्योग संघटन या नोंदणीकृत खादी संस्थेकडे सोपवले होते. ते एम्पोरियममधून फक्त “ऑथेंटिक खादी उत्पादने” विकतील, या कठोर अटीवर हे संचालन सोपविण्यात आले होते. तथापि, अलीकडच्या काळात मुंबई खादी आणि ग्रामोद्योग संघटनेने मात्र बनावट खादी उत्पादने विकले शिवाय हे एम्पोरियम खादी आणि ग्रामोद्योग आयोगाद्वारे चालवले जात असल्याचा भास निर्माण केला व आलेल्या लोकांची फसवणूक करून अन्यायकारक व्यापार केला, असा आयोगाने ठपका ठेवला आहे.
हे नमूद करणे उचित आहे की आयोगाने गेल्या काही वर्षांमध्ये त्यांचे ब्रँड नाव “खादी इंडिया” चा गैरवापर आणि ट्रेडमार्कमधील उल्लंघनाविरुद्ध कठोर कारवाई केली आहे. आत्तापर्यंत 1200 हून अधिक व्यक्ती आणि कंपन्यांना “खादी” ब्रँड नावाचा गैरवापर केल्याबद्दल आणि “खादी” नावाने गैर-खादी उत्पादने विकल्याबद्दल किरकोळ ब्रँड फॅबिंडियासह कायदेशीर नोटीस बजावल्या आहेत. आयोगाने Fabindia कडूनही 500 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागितली आहे, जी मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. गेल्या वर्षी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने ऑनलाइन शॉपिंग पोर्टल्स Amazon, Flipkart आणि Snapdeal या 140 वेब लिंक्स काढून टाकण्यास भाग पाडले जे खादी नसलेली उत्पादने “खादी” म्हणून विकत होते.