धक्कादायक!.. महिलेचे कापलेले शीर आढळले, सलग दुसरी निर्घृण हत्या उघड झाल्याने एकच खळबळ

 

नंदुरबार – भटके कुत्रे लचके तोडत असल्याचे निदर्शनास आल्यावर युवकाचा खून करून मृतदेह लपविल्याचे विसरवाडी पोलीस ठाणे क्षेत्रातील झरीपाडा रस्त्यावरील प्रकरण उघडकीस आल्याने खळबळ उडालेली असतानाच याच पोलीस ठाणे क्षेत्रातील पळशी धरणात एका महिलेचे मुंडके छाटून फेकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने आणखी खळबळ उडाली आहे. ही महिला कोण? याचा तपास पोलिसांनी सुरू केला असून या दोन्ही हत्यांमागे एकच सूत्रधारा असावा काय? या दिशेने तपास सुरू केला आहे.

याबाबतचे अधिक वृत्त असे की, नवापूर तालुक्यातील झामट्यावड ते वडझाकन रस्त्यादरम्यान झरी पाडा गावाच्या फाट्याजवळ रस्त्यावरील नाल्याच्या फरशी पुलाच्या पाइपमध्ये एका गोणीत युवकाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. मंगळवारी (दि.११) सकाळी काही कुत्रे मृतदेहाचे लचके तोडताना परिसरातील शेतकऱ्यांना दिसले होते. त्यानंतर या घटनेचा उलगडा झाला. खिशातील पाकिटामुळे मृताची ओळख पटली असून राकेश रमेश समाल (२९) रा. विष्णुनगर, उधना असे मृताचे नाव उघड झाले आहे.

याबाबत पोकॉ. प्रविण दिलीप अहिरे यांनी विसरवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलिस उपनिरीक्षक किरण पाटील करीत आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधिक्षक निलेश तांबे, नंदुरबारचे उपविभागीय पोलिस अधिकारी संजय महाजन, नंदुरबार स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक किरण खेडकर, उधना येथील विसरवाडीचे संहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश झोडगे यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.

तथापि, तरुणाचा निर्घण खून करणाऱ्या मारेकऱ्याचा विसरवाडी पोलिस शोध घेत असतांनाच आज दिनांक 12 जून 2024 रोजी याच पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या खांडबारा परिसरातील पळशी धरणाच्या पाण्यात एका महिलेचे फेकलेले शीर आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बैल धुण्यासाठी या धरणाच्या काठी शेतकरी आले असताना त्यांना पाण्यावर तरंगणारी प्लास्टिकची पिशवी आणि त्यात महिलेचे कापलेले शीर आढळून आले. संबंधित पोलीस पाटलाच्या माध्यमातून विसरवाडी पोलीस ठाण्याला ही माहिती देण्यात आली त्यानंतर ताबडतोब पथकाने भेट देऊन परिसराची पाहणी केली परंतु कुठेही सायंकाळी उशिरापर्यंत शव आढळून आले नव्हते. ही महिला कोण? हिचे शिर कापण्याचा निर्घृण प्रकार कोणी कशामुळे केला असावा? शीर येथे टाकले आहे तर धड कुठे असावे? याचे उत्तर पोलीस मिळवत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!