धक्का! अविनाश माळी चमकले प्रदेश भाजपाच्या व्यासपीठावर; ये रिश्ता क्या कहलाता है?

नंदुरबार – मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील तथा माझी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या गटातील निष्ठावान नगरसेवक तथा धडाडीचे युवा नेते अविनाश माळी हे भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांकडून सत्कार स्वीकारतानाचे छायाचित्र व्हायरल झाले आहे.  नंदुरबार मधील राजकीय भूकंपाची ही नांदी आहे काय?  अशी शंका देखील व्यक्त होऊ लागली आहे.
भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी व विशेष निमंत्रित यांची बैठक नागपूर येथील अशोका हॉटेल येथे संपन्न झाली. याप्रसंगी प्रमुख पदाधिकाऱ्यांना प्रदेशाध्यक्ष आ.श्री.चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश महामंत्री विजयभाऊ चौधरी यांनी मार्गदर्शन केले.
 यावेळी राष्ट्रीय सरचिटणीस तथा महाराष्ट्र प्रभारी सी. टी. रवीजी, आ.जयकुमार पवैय्या, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, प्रदेश सरचिटणीस ऍड. माधवी नाईक, प्रदेश सरचिटणीस रणधीर सावरकर, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी तथा कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.
दरम्यान माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वात पूर्वी काँग्रेसमध्ये निवडून आलेले व विद्यमान स्थितीत माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या समवेत एकनाथराव शिंदे यांच्या बाळासाहेब शिवसेनेत कार्यरत असलेले युवा नगरसेवक अविनाश माळी हे भारतीय जनता पार्टीच्या व्यासपीठावर या नेत्यांची भेट घेतानाचे एक छायाचित्र व्हायरल झाले आहे या छायाचित्रात अविनाश माळी यांना भारतीय जनता पार्टीचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे पुष्पगुच्छ देताना दिसत आहेत अविनाश माळी हे त्यांच्या हातून पुष्पगुच्छ घेत असताना शेजारी भाजपाचे महामंत्री विजय भाऊ चौधरी महाराष्ट्र प्रभारी सिटी रवीजी विक्रांत पाटील आदी भाजप नेते उपस्थित दिसत आहेत. यावरून नगरसेवक अविनाश माळी हे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा गट सोडून भाजपात जाणार की काय? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. महत्त्वाचे असे की, या छायाचित्रत भारतीय जनता पार्टीचा स्कार्फ मात्र अविनाश माळी यांच्या गळ्यात दिसत नाही.
अविनाश माळी हे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे निष्ठावान सहकारी म्हणून ओळखले जातात. अनेक वर्षांपासून रघुवंशी परिवारासमवेत त्यांची व्यावसायिक आणि राजकीय वाटचाल निष्ठेने चालू आहे ही बाजू लक्षात घेता अविनाश माळी यांच्या विषयी पक्षांतराची शक्यता कोणालाही वाटणार नाही, हे देखील वास्तव आहे. अविनाश माळी यांच्या समर्थ प्लॉट विक्री केंद्राची व्यावसायिक व्याप्ती मोठी असल्यामुळे तसेच सर्वपक्षीय मित्र असल्यामुळे व्यावसायिक कारणाने असल्या भेटीगाठी होत असतात असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगितले जात आहे. तथापि नागपुर येथे भाजपा प्रदेश समितीच्या विशेष निमंत्रितांसाठी  विशेष बैठक एकीकडे होत असतानाच अविनाश माळी यांचे भाजपाच्या व्यासपीठावर जाणे कसे होऊ शकले?  हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण अविनाश माळी यांच्या छायाचित्रात भाजपा प्रदेश समितीच्या बैठकीचे बॅनर्स स्पष्टपणे दिसत आहे.
भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेण्याची पूर्वतयारी आहे काय ?  हा प्रश्न त्यामुळेच आता समोर आला आहे. अविनाश माळी हेच त्याविषयी सत्य काय ते मांडू शकतील. तोपर्यंत कोणीही वेगळे अर्थ  लावणे गैर होऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!