नंदुरबार- धडगावच्या विवाहिता हत्या प्रकरणात जे पुरवणी जबाब घेतले जाणार आहेत त्यातून हे प्रकरण दडपण्यासाठी कोणी कोणी दबाव आणला ते स्पष्ट होईल. त्या कोणाचीही गय केली जाणार नाही मग तो राजकीय व्यक्ती असो की प्रशासकीय, त्याला कठोर शिक्षा केली जाईल, अशा स्पष्ट शब्दात भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी ग्वाही दिली.
धडगाव तालुक्यातील खडकी येथे अत्याचार करून विवाहितेची हत्या करण्यात आल्या प्रकरणी चित्रा वाघ यांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या समावेत जाऊन घटनास्थळी भेट दिली तसेच मयत महिलेच्या वडिलांची व कुटुंबीयांची सांत्वन पर भेट घेतली. त्याविषयी पत्रकार परिषदेत माहिती देताना त्या बोलत होत्या. त्यांनी पुढे सांगितले की, मुळात समाजात विविध विकृती आहेत त्यामुळे अशा घटना तर घडणारच. परंतु राज्यात आमचे सरकार आहे त्यामुळे धडगावच्या विवाहिता हत्या प्रकरणात न्याय मिळवून देण्याची जबाबदारी आमची 100 पट अधिक आहे. शिंदे फडणवीस सरकार सतत पूर्णतः ॲक्शन मोडमध्ये राहत असल्याने नराधमांना कठोर सजा मिळणारच; असा विश्वासही चित्रा वाघ यांनी व्यक्त केला.
मयत महिलेचे शवविच्छेदन करताना धडगाव ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नेमके काय पाहिले आणि काय केले हे स्पष्ट व्हावे म्हणून वैद्यकीय अधिकाऱ्यांची एक समिती नेमून सखोल चौकशी करण्यात यावी तसेच केवळ बदली न करता हे प्रकरण दडपणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांचे निलंबन करावे ही मागणी आम्ही लावून धरणार आहोत असे याप्रसंगी चित्रा वाघ म्हणाल्या.