धुम स्टाईलने मोबाईल हिसकावणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद,5 गुन्हे उघड; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

नंदुरबार –  नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार शहर, उपनगर, नवापूर पोलीस ठाणे हद्दीत धुम स्टाईलने मोबाईल हिसकावणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला जेरबंद करण्यात आले. 5 गुन्हे उघड झाले असून स्थानिक गुन्हे शाखेने ही कामगिरी केली आहे.

 मागील काही दिवसात मोटारसायकलवरील इसम नागरिकांच्या हातातील मोबाईल जबरीने हिसकावून घेवून जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल असून हे अद्याप उघड झालेले नव्हते. त्याअनुषंगाने गुन्ह्यांचा गांभीर्याने तपास करुन गुन्ह्यातील सक्रीय गुन्हेगारांवर कारवाई करणेबाबत नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना याबाबत निर्देश दिले. अशातच श्री. लंकेश हरिदास सांगोडकर वय-33 व्यवसाय नोकरी रा. LIC कार्यालयाजवळ, माणिक नगर, नंदुरबार जि. नंदुरबार हे नंदुरबार शहरातील अंधारे स्टॉपजवळ फोनवर बोलत घरी जात होते. त्यावेळेस त्यांच्या मागून अचानक एका काळ्या रंगाच्या मो. सा. वर दोन अनोळखी इसम आले. मोटार सायकलच्या मागील सीटवर बसलेल्या इसमाने फिर्यादीच्या हातातील 13000/- रुपये किमतीचा Redmi कंपनीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेवून गेले, म्हणून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात दिनांक 15/09/2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, नंदुरबार शहरातील सी. बी. पेट्रोल पंप परिसरात एका काळ्या रंगाच्या मोटार सायकलवर दोन अनोळखी इसम बिल पावती नसलेले महागडे मोबाईल फोन कमी किमतीत विक्री करण्याच्या उद्देशाने फिरत आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांनी लगेचच सापळा रचला. तिथे काळ्या रंगाच्या मोटार सायकलवर बसलेल्या दोन्ही संशयीत इसमांना शिताफीने ताब्यात घेतले. राहुल ऊर्फ सनी बाबा जितेंद्र साळवे वय-24 आणि समीर विजय वसावे वय-26 दोन्ही रा. भिल जांबोली ता. निझर जि. तापी गुजरात अशी या दोघांची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पंचासमक्ष दोन्ही इसमांची अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यात 8 महागडे मोबाईल मिळून आले. मोटरसायकल वरून नंदुरबार शहर, उपनगर व नवापूर शहरात येवून मोबाईलवर बोलत असलेल्या नागरिकांच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेवून गेल्याचे सांगितल्याने त्यांच्या ताब्यातून 86 हजार 500 रुपये किमतीचे 08 महागडे मोबाईल व 70 हजार रुपये किमतीची होंडा सी.बी. शाईन मोटार सायकल असा एकूण 1 लाख 56 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करुन हस्तगत करण्यात आला.
या दोघांवर गुजरात राज्यातील सुरत येथे अशाच प्रकारचे जबरी चोरीचे दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत. आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
सदर कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. विजय पवार, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक श्री. संदीप पाटील, पोलीस हवालदार मुकेश तावडे, पोलीस नाईक मनोज नाईक, जितेंद्र ठाकुर, मोहन ढमढेरे, जितेंद्र तोरवणे, पोलीस कॉन्सटेबल अभय राजपुत यांच्या पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!