धुळे – धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत चार जागा बिनविरोध झाल्याचे आज छाननी अंती स्पष्ट झाले तथापि याची अधिकृत घोषणा 21 नोव्हेंबर रोजी होईल. दरम्यान सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनल बनवण्याचे प्रयत्न काँग्रेसचे मंत्री के सी पाडवी व माजी मंत्री तथा भाजपाचे आमदार अमरिशभाई पटेल यांच्यासह सर्व नेत्यांनी चालू ठेवल्याचे दिसत असतानाच शिवसेना मात्र महाविकास आघाडीवर ठाम राहून अलिप्त राहात असल्याचे दिसत आहे. बिनविरोध होणाऱ्या चार पैकी तीन जागा शेतकरी विकास पॅनलच्या तर एक जागा शिवसेनेची आहे.
धुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील उमेदवारी अर्जांची आज दि.21 रोजी छाननी करण्यात आली. यात शिरपुर तालुका सोसायटी गटातुन राजधर पाटील यांच्या अर्जावरील अनुमोदकाची स्वाक्षरी बनावट असल्याची हरकत माजी उपनगराध्यक्ष प्रभाकर चव्हाण यांनी घेतली. या हरकतीवर सुनावणी झाल्यानंतर पाटील यांचा अर्ज बाद झाला व शेतकरी सर्वसमावेशक पॅनलचे माजी उपनगराध्यक्ष प्रभाकर चव्हाण हे बिनविरोध झाले. तर विवीध कार्यकारी संस्था मतदार संघातून विरोधात एकही उमेदवार नसल्याने नंदुरबार जिल्हयातील शहादा मतदार संघातून दिपक पाटील, तळोदा येथून भरत माळी तर अक्कलकुवा मतदार संघातुन शिवसेनेचे नंदुरबार जिल्हाप्रमुख आमशा पाडवी यांची देखिल बिनविरोध निवड होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. बिनविरोध झालेले दिपक पाटील, भरत माळी व प्रभाकर चव्हाण यांनी मावळते चेअरमन राजवर्धन कदमबांडे यांची लगेचच भेट घेतली.
आज छाननी अंती 13 जागांसाठी 66 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. 8 नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी मागे घेण्याची मुदत आहे. दरम्यान ही निवडणुक बिनविरोध करण्यासाठी शिवसेना वगळून सर्व पक्षांचे नेते संघटीत झाल्याचे पहयला मिळत आहे. भाजपाचे आमदार अमरीशभाई पटेल , माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील , राज्याचे मंत्री के सी पाडवी , राष्ट्रवादीचे किरण पाटील, माजी आमदार शरद पाटील यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी बैठकांचे सत्र सुरु ठेवले आहे, असे सूत्रांकडून कळते.
याच पॅनलचे समर्थक असणारे दीपक पाटील, भरत माळी व प्रभाकर चव्हाण हे बिनविरोध झाल्याने या पॅनलची विजयी वाटचाल सुरु झाली आहे.