धुळे (योगेंद्र जोशी) – काँग्रेसचे विद्यमान मंत्री के सी पाडवी, भाजपाचे माजी मंत्री अमरीश भाई पटेल व माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या नेतृत्वातील सर्वपक्षिय शेतकरी विकास पॅनलचे अधिक उमेदवार जिंकून आल्यामुळे धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर या गटाचे वर्चस्व राहणार हे आजच्या निकाला अंती स्पष्ट झाले आहे. तथापि या गटाला शह देऊ पाहणाऱ्या संघर्ष पॅनलला चार जागा प्राप्त झाल्या आहेत.
ही निवडणुक बिनविरोध करण्यासाठी आमदार अमरीशभाई पटेल , आमदार कुणाल पाटील , माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्यासह सर्वपक्षिय नेत्यांनी एकत्र येत जीवतोड प्रयत्न केला होता. परंतु राष्ट्रवादीचे जिल्हा परीषद सदस्य पोपटराव सोनवणे यांनी आणि शिवसेनेचे नंदुरबार जिल्हा नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी या सर्वपक्षीय पॅनल मध्ये सहभागी न होता निवडणूक बिनविरोध न होऊ देण्याची भूमिका घेतली व संघर्ष पॅनल उभे केले होते. यांच्या या भूमिकेमुळे राजकीय चुरस निर्माण झाली. परिणामी 7 जागा बिनविरोध होऊ शकल्या तर नऊ मतदार संघातील 10 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. या राजकीय लढाईत मात्र संघर्ष पॅनेलला फक्त चार जागांवर समाधान मानावे लागले. जिल्हा परीषद सदस्य पोपटराव सोनवणे यांचे चिरंजीव पराभूत झाले. तर ईकडे भाजपाचे माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार डॉ सुभाष भामरे यांचे बंधु सुरेश पाटील हे पराभुत झाले. माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांनी येथे विजय मिळवला.
दरम्यान सर्वपक्षिय शेतकरी पॅनलचे उमेदवार माजी आमदार तथा बँकेचे मावळते चेअरमन राजवर्धन कदमबांडे , माजी मंत्री विजय नवल पाटील यांच्या पत्नी शिलाताई पाटील , जिल्हा परीषदेचे अध्यक्ष तुषार रंधे यांच्या पत्नी सिमाताई रंधे , तसेच राजेंद्र देसले, हर्षवर्धन दहीते, दर्यावगीर महंत , अमरसिंग गावीत हे विजयी झाले आहेत. विरोधी संघर्ष पॅनलचे उमेदवार माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी , माजी आमदार शरद पाटील , संदीप वळवी हे विजयी झाले आहेत. यापुर्वी सर्वपक्षिय शेतकरी पॅनलचे शिरीष नाईक, दिपक पाटील , भरत माळी , प्रभाकरराव चव्हाण , शामकांत सनेर , भगवान पाटील हे तर संघर्ष पॅनलचे आमशा पाडवी हे बिनविरोध झाले आहेत.
अध्यक्ष कोणाचा ? भाजपाचा की आघाडीचा ?
बॅकेवर सर्वपक्षिय शेतकरी पॅनलचे 13 सदस्य निवडून आल्याने बँकेवर सर्वपक्षिय नेते ठरवतील त्यालाच अध्यक्षपदावर संधी मिळेल, असे दिसते. पण राज्यातील भाजपा विरुध्द महाविकास आघाडी हा वाद लक्षात घेता पुढील घडामोडींवर परीणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या निवडणुकीत 17 पैकी महाविकास आघाडी घटक पक्षांचे 9 सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे राजकीय डावपेच झाल्यास बँकेवर महाविकास आघाडीचा अध्यक्ष बसू शकतो, असा कयास लावला जात आहे.
मतमोजणी अंती महा विकास आघाडी विरुद्ध भाजपा अशा दृष्टिकोनातून आढावा घेतल्यास असे दिसून येते की, महाविकास आघाडीचे 9 जण विजयी झाले आहेत. यात शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, माजी आमदार शरद पाटील , शिवसेनेचे नंदुरबारचे जिल्हाप्रमुख आमशा पाडवी , काँग्रेसचे शामकांत सनेर , भगवान पाटील , शिरीष नाईक , अमरसिंग गावीत , संदीप वळवी , शिलाताई पाटील यांचा समावेश आहे.तर भाजपाप्रणित 8 जण निवडून आले आहेत. दोन्ही गटांची ही आकडेवारी पहाता राज्यातील नेत्यांनी आदेश दिल्यास बँकेवर महाविकास आघाडीचा झेंडा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
उमेदवारांना मिळालेली मते
कृषी पणान व शेतमाल प्रक्रिया संस्था मतदार संघ : राजवर्धन कदमबांडे – 131, अंकुश पाटील – 8.
विजाभज विशेष मागास मतदार संघ : दर्यावगिर महंत – 694, सुरेश शिंत्रे – 243.
इतर शेती संस्था मतदार संघ: सुरेश रामराव 77, प्राध्यापक शरद पाटील 120, लक्षदीप सोनवणे 2.
महिला मतदार संघ: शीला पाटील 758 तर हिरकणी बाई पाटील 200, सीमा रंधे 745.
प्राथमिक कृषी आदी सहकारी संस्था : पावबा धनगर 8, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी 59, हर्षवर्धन दहिते 52, अक्षय पोपटराव सोनवणे 25, अमरसींग गावित 13, अभिमान वसावे 4, विलास पाडवी 6, संदीप वळवी 10, राजेंद्र देसले 62, संध्या बोरसे 44.