धुळे-नंदुरबार जिल्हा पूर्णतः भाजपामय करणार; शिरपूरच्या सत्कार सोहळ्यात मंत्रीद्वयांचा निर्धार

धुळे – जनतेच्या आणि गावांच्या विकासाला प्राधान्य देणाऱ्या योजना एकमेव भाजपा सरकार राबवू शकते हा विश्वास जनतेत निर्माण झालेला आहे आणि म्हणूनच त्या बळावर संपूर्ण महाराष्ट्रात शतप्रतिशत भाजपा हा उपक्रम यशस्वी करून दाखवण्याचा मनोदय असून धुळे-नंदुरबार जिल्हासुद्धा पूर्णतः भाजपामय करून दाखवू, असा दृढ निश्चय मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित, मंत्री गिरीश महाजन आणि माजी मंत्री अमरीश भाई पटेल यांनी शिरपूर येथील कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्हा पालकमंत्री पदावर  डॉ. विजयकुमार गावित यांची तसेच ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्रीपदी गिरीष महाजन यांची नुकतीच निवड झाली. त्यानिमित्त शिरपूर शहराच्या व तालुक्याच्या वतीने या मंत्री द्वयांचा जाहीर सत्कार सोहळा शिरपुर येथिल  आर. सी. पटेल फार्मसी कॉलेजच्या मैदानावर आयोजित करण्यात आला होता. त्या प्रसंगी ते बोलत होते. या भव्य सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी देशाचे माजी संरक्षण राज्यमंत्री खासदार डॉक्टर सुभाष भामरे होते.
हा सत्कार सोहळा महाराष्ट्र राज्याचे माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार डॉ. हिनाताई गावित, माजी रोजगार हमी व पर्यटन मंत्री आ. जयकुमार रावल, आ. काशिराम पावरा, आ. राजेश पाडवी, धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन भूपेशभाई पटेल, महाराष्ट्र प्रदेश भाजपा उपाध्यक्ष बबनराव चौधरी, धुळे व नंदुरबार जिल्हा सहकारी बँकेचे संचालक प्रभाकरराव चव्हाण, धुळे जिल्हा परिषद उपाध्यक्ष कुसुमताई निकम, सभापती मंगलाताई पाटील, समाज कल्याण सभापती मोगराताई पाडवी, महिला व बालकल्याण सभापती सौ. धरती देवरे, महापौर प्रदिप कर्पे उपस्थित होते.
या प्रसंगी आ. अमरिशभाई पटेल यांनी आदिवासी भागातील जात पडताळणीसह विविध समस्यांकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, तालुक्यात आदिवासी भागात जुने बंधारे, वन विभाग परिसरात पाझर तलाव, अनेक समस्या असून वनवासी, आदिवासी बांधव यांना सहकार्य करा, माती घ्यायची त्यांना परवानगी द्या. जात पळताडणीचे काम वेगाने होणे अपेक्षित आहे त्यासाठी शिरपूर येथे त्याचे कार्यालय व्हावे. या भागात अत्याधुनिक हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज साठी शासन स्तरावर योग्य सहकार्य करावे. असा विकास जर होत राहिला तर, नक्कीच सर्व आमदार भाजपाचे निवडून येतील असा आशावाद आ अमरीशभाई पटेल यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी ना. डॉ. विजयकुमार गावित भाषणात माजी मंत्री आमदार अमरीश भाई पटेल यांच्या कार्यशैलीबद्दल विशेष गौरव उद्गार काढले व पुढे म्हणाले, येत्या दोन वर्षात विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष भर दिला जाणार असून आदिवासी भागातील विकासाकडे विशेष लक्ष राहणार आहे प्रत्येक घराला नळ पाणी योजना देण्यासाठी विशेष लक्ष दिले जाणार असून   आदिवासी भागातील 100 टक्के मागण्या पूर्ण करेन. वनविभाग व आदिवासी विभागातील धरणे, अनेक प्रश्न मार्गी लावू , असे नमूद करतानाच मंत्र नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी  धुळे आणि नंदुरबार हे दोन्ही जिल्हे पूर्णपणे भाजपमय करण्यासाठी आता यापुढे दक्ष राहणार असल्याचे स्पष्ट केले.
मंत्री ना. गिरीष महाजन यांनी देखील आमदार अमरीश भाई पटेल यांच्या कार्यकर्तृत्वाचा आणि दूरदृष्टीकोनाचा उल्लेख केला व पुढे म्हणाले, शिरपूर तालुक्यात एस व्ही के एम संस्थेच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षणाची सोय राज्याचे माजी मंत्री तथा आमदार अमरीशभाई पटेल यांनी उपलब्ध करून दिली आहे. याबरोबरच त्यांनी जलसंधारणाचे आदर्श काम केले असून आगामी काळात त्यांच्या शिक्षण आणि जलसंधारणाच्या कामाला शासनाच्या माध्यमातून मदत केली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!