धुळे – येथील राष्ट्रवादी भवनात मेळावा चालू असतांनाच कार्यकर्ते गराडा घालत खुर्च्यांवर उभे राहून फोटोसेशन करण्याला प्राधान्य देऊ लागल्याचे पाहून राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना थेट माईक ताब्यात घेऊन मुख्य भाषण ठोकत मेळावा आवरता घ्यावा लागला. नवीन नियुक्त्यांचे पत्रवाटप देखील त्यांना गोंधळातच आटोपावे लागले.
धुळे येथे आज शनिवार दि. 25 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी भवनात कार्यकत्यांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला सभागृहात एकच गर्दी झाली. मंत्री छगन भुजबळ यांचे आगमन होताच कार्यकर्त्यांनी मंचाच्या दोन्ही बाजूला मोठा गराडा घालून खुर्च्यांवर उभे रहात फोटोसेशन सुरु केले. गोंधळ होत असल्याने आयोजकांना स्वागतपर भाषण, काही पदाधिकाऱ्यांचे मनोगत तसेच सुत्रसंचालकाचे बोलणे याला कात्री मारावी लागली. चाललेला गोंधळ पाहून मंत्री भुजबळ काहीसे वैतागले आणि त्यांनी थेट स्वतःच माईक हातात घेवून बोलण्यास सुरुवात केली. भाषणामुळे आणि भुजबळ यांच्या कसदार टोल्यांमुळे गोंधळ बराच नियंत्रित झाला. पण अर्धातास भाषण झाल्यानंतर नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्याचा कार्यक्रम घेाषित होताच पुन्हा सभागृहात गोंधळ माजला. आयोजकांना अखेरीस कार्यक्रम आवरता घ्यावा लागला, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
दरम्यान, वीस वर्षा पुर्वीच्या घटनेचा गौप्य स्फोट करून मंत्री भुजबळ यांनी खळबळ उडवली. श्रीकृष्ण आयोगाच्या अहवालावरून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना त्रास देण्याचा कोणताही विचार नव्हता. या प्रकरणात त्यांना जामीन मिळाला नसता, तर ‘मातोश्री’लाच तुरुंग घोषित करणार होतो; असे ते म्हणाले. तेव्हाच्या सर्वच गोष्टी सांगता येत नाहीत. पण आता वीस वर्षांचा काळ लोटला असल्याने काही बाबी उघड करीत आहोत, असा खुलासा अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केला. 24 जुलै 2000 रोजी बाळासाहेब ठाकरे यांना अटक झाली होती व त्याच दिवशी त्यांची सुटका झाली होती. त्या प्रकरणाविषयी भुजबळ यांनी आता हे काही खुलासे केले आहेत.