धैर्यशील व दृढनिश्चयी स्वामी विवेकानंद
स्वामी विवेकानंद हे एकमेवाद्वितीय व्यक्तिमत्व होय. युवकांचे प्रेरणास्थान, युगानुयुगे आपल्या तेजस्वी विचारांची ज्योत संपूर्ण जगात तेवत ठेवून सर्वांना सकारात्मक करणारे मनःशांती देणारे स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ दत्ता होते. स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी कोलकात्यात झाला. बालपणापासून विवेकानंदांच्या वर्तणुकीत दोन गोष्टी प्रकर्षाने दृष्टोत्पत्तीस येऊ लागल्या. त्या म्हणजे ते वृत्तीने श्रद्धाळू व कनवाळू होते व दुसरे म्हणजे ते बालपणात कोणतेही साहसी कृत्य बेधडकपणे करत. विवेकानंदांनी मॅट्रिकच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवून त्यांच्या कुळाची व शाळेची कीर्तीध्वजा उंचावली. पुढे कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी महाविद्यालयातून त्यांनी `तत्त्वज्ञान’ या विषयात एम्.ए. केले. भारताच्या आध्यात्मिक संस्कृतीबद्दल गाढ अभिमान असला, तरी त्यात शिरलेल्या अनिष्ट रूढी, परंपरा, जातीभेद यांसारख्या हीन गोष्टींवर त्यांनी भाषणांतून कडाडून हल्ला चढवला व निद्रिस्तांना गदागदा हालवून जागे केले. अशा वेळी ते सौदामिनीच्या अभिनिवेशाने समाजातील निष्क्रीयतेवर प्रहार करत आणि आपल्या देशबांधवांना जागे होण्यासाठी कळकळीचे आवाहन करत. निराकार समाधीत मग्न रहाण्याची स्वत:ची स्वाभाविक प्रवृत्ती बाजूला सारून त्यांनी सर्वसामान्य लोकांच्या सुखदु:खाचा ऐहिक पातळीवरही विचार केला आणि त्यांच्यासाठी झटले व `परहितार्थ सर्वस्वाचे समर्पण म्हणजेच खरा संन्यास’, हे वचन सार्थ केले.
उठो जागो, और तब तक नहीं रुको जब तक लक्ष्य ना प्राप्त हो’ ।।
असे सांगत ध्येयपूर्ती ची दिशा देणारे स्वामी विवेकानंद हे सर्व तरुणांचे आजही प्रेरणास्थान आहेत.
स्वामीजींच्या जीवनातील प्रत्येक प्रसंग प्रेरणादायी आहे.
जयपूरला असतांना स्वामी विवेकानंद पाणिनीचे संस्कृत व्याकरण शिकण्यासाठी तेथील एका प्रसिद्ध संस्कृत पंडितांकडे जात होते. पंडितजींनी त्यांना पहिले सूत्र नाना प्रकारे समजावून सांगितले, तरीही त्यांना ते येत नव्हते. तीन दिवसांच्या सततच्या प्रयत्नांनंतर पंडितजी म्हणाले, “पुष्कळ प्रयत्न करूनसुद्धा मी आपल्याला एकही सूत्र समजावून देऊ शकलो नाही. त्यामुळे माझ्याजवळ शिकण्याने आपल्याला लाभ होईल, असे मला वाटत नाही.” पंडितजींचे बोलणे ऐकून विवेकानंदांना फार वाईट वाटले. जोवर या सूत्राचा अर्थ समजणार नाही, तोवर जेवण-खाण सर्व बंद! असा ठाम निर्धार त्यांनी केला. त्यांनी एकाग्र चित्ताने त्या सूत्रातील भाष्य समजून घेतले. नंतर ते पंडितजींकडे गेले. त्यांच्याकडून सूत्रांचे सुरेख आणि सहज स्पष्टीकरण ऐकून पंडितजींनाही आश्चर्य वाटले.ठाम निर्धार केला की, कुठलीही गोष्ट असाध्य नसते हे त्यांनी त्यांच्या क्रुतीतून सर्वांना दाखवून दिले. अशा या महान तत्त्वज्ञानी आपल्या प्रेरणादायी विचारांनी जगाला जिंकणाऱ्या व्यक्तिमत्व शतशः प्रणाम.
– डॉ०. प्रणिता महाजन, संभाजीनगर