नंदुरबार – नंदुरबार येथील एका मान्यवर संस्थेच्या
शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीला अश्लील व्हिडिओ दाखवून अतिप्रसंगाचा प्रयत्न शाळेतीलच कर्मचाऱ्याने केल्याचा आरोप पालकांनी केल्यामुळे पोलीस प्रशासनासह शिक्षण विभागही पार हादरला आहे. दरम्यान, पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंदवून संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
घटना कळताच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी शहर पोलीस ठाण्यात स्वतः धाव घेतली व पीडित मुलीशी व पालकांशी संवाद केला तर शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांनी देखील तातडीने शाळेची पाहणी करून संस्थाचालकांना फैलावर घेतले. पालकांनी पोलीस ठाण्यात अर्ज देताना कथन केलेली घटना अशी की, सर्वत्र गोपाल काल्याचा पवित्र दिवस मनवला जात असताना सायंकाळी आपली मुलगी शाळेतून परत आल्यापासून प्रचंड दुखावलेली आहे व खाण्यापिण्यास नकार देत आहे असे तिच्या पालकांना लक्षात आले. म्हणून त्यांनी तिला काही घडले का असे विचारायला सुरुवात केली. काहीही न बोलणारी मुलगी भीतीच्या दबावात असल्याचे त्यांना लक्षात आले. नंतर उशिरा तिने शाळेत घडलेली दुर्घटना कथन केली. पालकांनी सांगितले की, नंदुरबार येथील एका प्रसिद्ध संस्थेच्या शाळेत इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकणारी ही मुलगी नेहमीप्रमाणे शाळेत असताना तेथील एका सफाई कामगाराने तिला काही अश्लील व्हिडिओ दाखवले. नंतर त्याने लायब्ररीत नेण्याचा प्रयत्न केला तिथे उपस्थित महिला कर्मचारी बघून त्याने तिला अन्यत्र नेण्याचा प्रयत्न केला; परंतु कशीबशी सुटका करून घेत शाळेतून ती परत आली, हा सर्व घटनाक्रम माहीत झाला म्हणून आज दिनांक 28 ऑगस्ट रोजी पालकांनी प्रारंभी शाळेत संपर्क केला. तथापि संबंधित संस्थाचालकांनी खातर जमा केल्याशिवाय घटनेची वाच्यता करू नका असे सांगायला सुरुवात केली. म्हणून लगेचच पालकांनी शहर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. ही घटना कळताच शहर पोलीस ठाण्यात जिल्हा पोलीस अधीक्षक एस. श्रवण दत्त, अतिरिक्त अधीक्षक तांबे आणि अन्य अधिकारी यांनी शहर पोलीस ठाणे गाठून माहिती घेतली पालकांचे म्हणणे सविस्तर ऐकून घेतले. दरम्यान शिक्षण अधिकारी प्रवीण अहिरे यांनी देखील घटना कळताच शाळेला भेट दिली सीसीटीव्ही आहेत का याची माहिती घेतली असून पुढील चौकशी सुरू केली आहे. संस्थाचालकांनी पालकांवर दबाव आणला काय? संबंधित सफाई कामगाराने खरोखर तसा प्रकार घडवला आहे काय? याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू झाली आहे. राजू ढंडोरे असे संशयित आरोपीचे नाव सांगण्यात आले.
पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंदवून आरोपीला घेतले ताब्यात
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवणदत्त यांनी याविषयी अधिक माहिती देताना सांगितले की, पालकांकडून संपूर्ण माहिती ऐकून घेण्यात आली तसेच त्यांनी दिलेले तक्रार नोंदवून घेण्यात आली. संशयित कर्मचारी याने स्वतःच्या मोबाईल मधून आक्षेपार्य व्हिडिओ दाखवल्याचे तक्रारीत म्हटले आहे त्यानुसार पोक्सो कायदा आणि अन्य कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. घटना काल सकाळची घडलेली असताना आज दुपारी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद होत आहे यावरून शालेय संस्थेकडून 24 तास उशीर झाल्याचे निदर्शनास येत असल्याने संबंधित अधिकारी त्याविषयी तपास करीत आहेत.
त्या कर्मचाऱ्याची शाळेतून केली हकालपट्टी
या प्रकरणाबाबत शाळा व्यवस्थापनाने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकार द्वारे अधिक माहिती देताना सांगितले की या शाळेत दहा वर्षापासून सीसीटीव्ही कार्यरत आहे त्यामुळेच पालकांची तक्रार येताच सीसीटीव्ही फुटेज तपासता आले. संशयित आरोपी हा शाळेत कंत्राटी पद्धतीने नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांपैकी एक आहे. त्या संशयित कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकण्याचा निर्णय ताबडतोब घेण्यात आला, असे देखील व्यवस्थापनाने म्हटले आहे.