नंदुरबार – नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील राजकीय, व्यावसायिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना एकाच वेळी राख्या बांधण्यासाठी खासदार डॉक्टर हिना गावित आणि जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी उद्या दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोजी सामूहिक रक्षाबंधनाचा भव्य सोहळा आयोजित केला आहे.
राजकीय अथवा पक्षीय भेद न करता एकाच वेळी हजाराहून अधिक जणांना राखी बांधण्याचा असा सामूहिक भव्य सोहळा नंदुरबारच्या राजकीय इतिहासात प्रथमच आयोजित करण्यात आला आहे. यासाठी दोन्ही भगिनींनी लोकसभा मतदारसंघातील आठही तालुक्यातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांना भावनिक साद घातली आहे.
हा समूहिक रक्षाबंधन सोहळा दिनांक २९ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी ३ वाजेपासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदीर येथे संपन्न होणार आहे.
या संदर्भाने प्रसारित केलेल्या माहितीत त्यांनी म्हटले आहे की, “नंदुरबार लोकसभा मतदार संघातील सर्व जिल्हा परिषद सदस्य, सर्व नगरपालिका,सर्व पंचायत समित्या तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी तसेच सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेला प्रत्येक कार्यकर्ता मग ते कोणत्याही पक्षाचे असो माझे बंधूच आहेत,त्या प्रत्येकाशी आपले भावनिक ऋणानुबंध असल्याचे मी मानत आले आहे. भाऊ आणि बहीण हे फक्त रक्ताचेच नाते असते असे नाही. लोककल्याण या उदात्त हेतूशी नाळ जुळलेले सुद्धा एकमेकाचे खरे हितचिंतक आणि खरे बहिण-भाऊच असतात. त्या प्रत्येक बहिणीचा त्या प्रत्येक भावावर भावनिक अधिकार असतो. बहिणीच्या आणि भावाच्या एकमेकांवरील त्या अधिकारांना लक्षात घेऊनच आज राजकारण आणि पक्ष बाजूला ठेवून रक्षाबंधनाचा पवित्र धागा बांधण्यासाठी सादर निमंत्रित करीत आहे.” बहिणीने दिलेल्या सादेला प्रतिसाद देऊन राखी बांधून घ्यायला उपस्थित रहा, असेही पुढे म्हटले आहे.