नंदुरबार – आमचं स्वप्न हे फक्त एमबीबीएसच्या ऍडमिशन किंवा बॅचेस पर्यंत सिमीत नाही. तर आम्हाला हे मेडिकल हब या ठिकाणी तयार करायचे आहे. भविष्यात पोस्ट ग्रॅज्युएशनची आम्हाला या ठिकाणी विद्यार्थी आणायचेत आणि तेवढेच नाही तर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुद्धा आमच्या नंदुरबारच्या या मेडिकल कॉलेजमध्ये सुरू झालं पाहिजे यासाठीसुद्धा आम्ही प्रयत्न करत आहोत; असे नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर हिना गावित यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या भूमिपूजनाप्रसंगी भाषणातून सांगितले.
येथील महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई अधिनस्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा तसेच 23 कोटी रुपये खर्चाच्या क्रिटिकल केअर हॉस्पिटलच्या भुमिपुजनाचा सोहळा व गव्हाणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन आज दि. 25 फेब्रुवारी 2024 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ हिना गावित व जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ सुप्रिया गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत अॉनलाइन करण्यात आले. त्या प्रसंगी त्यावर त्या बोलत होत्या.
देशातील 200हून अधिक विविध आरोग्य पायाभूत सुविधा प्रकल्पांचे भुमिपुजन आणि राष्ट्रसमर्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अॉनलाइन करण्यात आले. त्यात नंदुरबारच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचाही समावेश आहे. आदिवासी भागातील देश व राज्य पातळीवरील हे पहिलेच वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रूग्णालय आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित हे तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री असताना या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह रुग्णालयाची संकल्पना त्यांनी मांडली. पुढे केंद्र सरकार व राज्य सरकारच्या संयुक्त निधीतून ते सुरू व्हावे, यासाठी खासदार डॉ. हिना गावित यांनी वेळोवेळी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला.
एम्सच्या धरतीवर पहिले महिला रुग्णालय
खासदार डॉक्टर हिना गावित यांनी प्रमुख भाषणात याप्रसंगी सांगितले की, नंदुरबार जिल्ह्याच्या आरोग्याच्या सुविधा कशा बऱ्या करता येतील आणि नंदुरबारला चांगला इन्फ्रास्ट्रक्चर कसं देता येईल यासाठी नेहमीच माझा प्रयत्न असतो क्रिटिकल केअर ब्लॉक हे आपलं सरकार देत आहे हे जेव्हा मला कळालं मी लगेच माझं पत्र केंद्र सरकारला दिलं आणि माझ्याच पत्रावर नंदुरबारचं 23 कोटी रुपयांचं क्रिटिकल केअर ब्लॉक सुद्धा मंजूर झालं. मागच्या वर्षी नंदुरबारला आपण एमसीएची विंग मंजूर करून घेतली 100 खाटांचं महिला रुग्णालय हे या ठिकाणी आपण एम्सच्या धरतीवर तयार करत आहोत. ज्या ठिकाणी 11 लेबर रूम आहे, असं महाराष्ट्रात दुसरीकडे कुठेच नसेल तसं हॉस्पिटल आपण नंदुरबारला करत आहोत, असे खासदार डॉक्टर गावित म्हणाल्या.
हे वैद्यकीय महाविद्यालय स्थापन होणे ही आपले वडील मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांची तळमळ आणि स्वप्न होते ते आज पूर्णत्वास आल्याचे पाहून आनंद वाटतो, असे नमूद करून जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी भाषणात सांगितले की, नंदुरबार आणि अन्य आदिवासी जिल्ह्यात खूप आरोग्याचे प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी मेडिकल कॉलेज किती महत्त्वाचे असते याचे संपूर्ण महत्व मंत्री डॉ गावित यांना माहीत होतं आणि म्हणून 1995 पासून 2013 पर्यंत साहेबांनी नंदुरबारला मेडिकल कॉलेज झालं पाहिजे यासाठी खूप प्रयत्न केले. ते आरोग्य मंत्री असताना त्यांनी महाराष्ट्रात चार वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केले होते आणि त्यापैकी नंदुरबार चे हे वैद्यकीय महाविद्यालय एक होते, असे डॉक्टर सुप्रिया गावित म्हणाल्या.
दरम्यान, त्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांना ऑनलाइन संबोधित करताना सांगितले की, उच्च आरोग्य सेवा जनतेपर्यंत पोहोचवी म्हणून देशाला 10 आधुनिक एम्स रूग्णालये, आयुष्मान मंदिर, 700 वैद्यकीय महाविद्यालये देऊन प्रमुख सेवकाचे कर्तव्य पूर्ण केले. पारंपरिक आरोग्य चिकित्सा शिकवणारे विश्वविद्यालय उभारत आहोत. गरिबांच्य आरोग्यावर होणारा खर्च कमी व्हावा आणि अनारोग्यपासून बचाव व्हावा, हा आमचा उद्देश आहे. असा लोकोपयोगी कारभार करत राहू आणि नवा सक्षम भारत उभारून दाखवू ही मोदीची गॅरन्टी आहे; असे याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी नंदुरबार येथे उद्योजक तथा सीएसआर समितीचे सदस्य पृथ्वीराज रघुवंशी, डॉ. अजय चंदनवाले सहसंचालक, वैद्यकीय शिक्षण व औषधी संशोधन मुंबई, डॉ. अरुण हुमणे अधिष्ठाता, शा.वै.म.व.रु. नंदुरबार, डॉ. दिनेश वाघमारे (भ.ग.से.) प्रधान सचिव वै. शि.व. ओ. द्रव्ये विभाग, राजीव निवतकर (आ.प्र.से.) आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व आयुष, नंदुरबार,आयुक्त राजीव निमकर, विवेक वाघमोडे, विनायक महामुनी, हाइट्सचे व्हाईस प्रेसिडेंट अनिल, जॅक्सन प्रकल्पाचे सीपीओ मानव माथूर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नरेश पाडवी, पोलीस उपअधीक्षक संजय महाजन, भारतीय जनता पार्टीचे विविध पदाधिकारी नगरसेवक आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.