नंदुरबार – नंदुरबार बस स्थानकातून पहिली बस धुळ्याकडे रवाना झाली असून कर्मचाऱ्यांच्या संपात फूट पाडण्याचे हा प्रयत्न असल्याचे सांगत अन्य संपकरी कर्मचाऱ्यांनी प्रचंड विरोध केला. तथापि कडक पोलीस बंदोबस्तामध्ये शहराच्या हद्दी पर्यंत बस रवाना करण्यात आली.
गेल्या महिन्याभरापासून चालू असलेला एसटी संप अद्याप संपण्याचे नाव घेत नसल्यामुळे सामान्य जनता वैतागली आहे. या पार्श्वभूमीवर आजची ही घटना महत्त्वपूर्ण ठरली आहे. नंदुरबार आगारातील एक चालक किरण पवार यांनी कामावर रुजू होण्याची भूमिका घेतली. यावरून आगारात वादंग उभे राहिले. संप करणाऱ्यांमध्ये फूट पडल्याचे भासवण्यासाठी हा प्रकार घडवला जात असून कोणीही याला गांभीर्याने घेऊ नये, आम्ही सर्व कर्मचारी एकजूट असून आमचा संपत चालूच राहील; अशी प्रतिक्रिया या प्रसंगी संपकरी संघटनेच्यावतीने देण्यात आली.
दरम्यान नंदुरबार बस स्थानकातून किरण पवार हे चार प्रवासी बसवून नंदुरबार-धुळे ही बस घेऊन निघाले. त्यावेळी संपकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया लक्षात घेऊन कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शहर पोलीस निरीक्षक किरण खेडकर यांनी स्वतः बसस्थानकातील स्थिती हाताळली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बसच्या पुढेमागे पोलिस वाहन देण्यात आले व नंदुरबार शहराच्या बाहेरील हद्दीपर्यंत सुरक्षित सोडण्यात आले. दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान ही पहिली बस रवाना झाली.