नंदुरबार – युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीची निवडणूक प्रक्रिया जाहीर करण्यात आली असून निवडणूक निरीक्षक म्हणून बिहार येथील मनीष टागोर यांची नियुक्ती झाली असल्याची माहिती आज काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष दिलीप नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे युवा नेते राहुल गांधी यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतील युवक काँग्रेसच्या कार्यकारणीची मुदत संपल्यानंतर नवीन निवडणूक जाहीर झाली असून ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी काँग्रेस पक्षाचे बिहार येथील युवा नेते मनीष टागोर यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या निवडणुकीबाबत त्यांनी पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना सांगितले की, सर्वसामान्य तरुण कार्यकर्त्यांनाही युवक कार्यकारिणीत संधी मिळावी, या उद्देशाने ही निवडणूक प्रक्रिया घेण्यात येत आहे. 27 ऑक्टोबर पासून ते 1 नोव्हेंबर पर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. 2 नोव्हेंबरला अर्जांची छाननी होईल. 3 नोव्हेंबर पर्यंत उमेदवार निश्चित केले जातील. नंतर पुढील 12 नोव्हेंबर पासून ते 12 डिसेंबर पर्यंत युवक काँग्रेस कार्यकारणीची निवडणूक प्रक्रिया लोकशाही पद्धतीने राबविण्यात येईल, असेही विभागीय निवडणूक निरीक्षक मनीष टागोर व नंदुरबार जिल्ह्य काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप नाईक यांंनी सांगितले.