नंदुरबार जिल्ह्यात अतिवृष्टीचा सिलसिला जारीच; अवकाळी मुसळधारेने शेतकऱ्यांचे मोडले कंबर

नंदुरबार – नंदुरबार जिल्ह्याला तीन दिवसापासून मुसळधार पाऊस झोडपत असून शेतीचे पुन्हा प्रचंड नुकसान झाले आहे तर कुठे दरड कोसळून रस्ते बंद पडण्यासारख्या घटना घडत आहेत. अशातच पुन्हा मुसळधार बरसणार असल्याचे अंदाज वर्तवले जात आहेत. वारंवार अवकाळी अतिवृष्टी होणे आणि कापणीला आलेले पीक नष्ट होऊन तोंडचा घास हिसकावला जाणे, हे अरिष्ट नंदुरबार जिल्ह्यात क्रमाने सुरूच असल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.

नंदुरबार जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून सलगपणे मुसळधार पाऊस बरसला. त्यामुळे पावसाची यंदाची सरासरी शंभरीच्या पुढे गेली. नंदुरबार तळोदा नवापूर शहादा या तालुक्यांमधील अनेक नदी नाल्यांना पूर आले. सलग तीन दिवसापासून मुसळधार पाऊस चालू असल्याने शेतांना तलावाचे स्वरूप आले. तोंडचा घास हिसकावला जावा त्याप्रमाणे शेतातील पीक उध्वस्त आणि जमीनदोस्त झाल्याचे दुर्दैवी दृश्य शेतकऱ्यांना पहावे लागले. नंदुरबार तळोदा शहादा तालुक्यातील केळी पपई कापूस सोयाबीन या पिकाची नासधूस झालेली पाहायला मिळाली. नवापूर तालुक्यात पावसाने अक्षरशः थैमान घातले असून शेतात कापून ठेवलेले भाताचे पीक शेतात साचलेल्या पाण्यावर तरंगत आहे. नवापूर तालुक्यातील चौकी, मोरकरंजा, पानबारा, सोनखांब, तिळासर, जामनपाडा, खेकडा, झामणझर, कारेघाट, लक्कडकोट, गडद, आमपाडा आदी भागांतही पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसाने भात, सोयाबीन, तूर, मका पिकाला फटका बसला आहे. दरम्यान पावसामुळे चांदसैली घाटात दरड कोसळून रस्ता बंद झाला तर शहादा तालुक्यात कळंबू येथे घराची भिंत कोसळली. चांद शैली घाटातील दरड चा मलबा जे.सी.बी.मशीन द्वारे मलबा बाजूला करायचे काम प्रगतीपथावर आहे, तथापि तळोदा कोठार धडगांव रस्ता रा.मा. 8 रस्तावरील वाहतूक काही तासांसाठी बंद आहे. दरम्यान भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष दीपक पाटील आणि अन्य पदाधिकारी यांनी एकत्रितपणे जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन पंचनामे तातडीने करण्यात येऊन मदत द्यावी अशी मागणी करणारे निवेदन सादर केले.

शेत नुकसानीचा क्रम सुरूच; भरपाईचं काय?

या आधी मे महिन्यात अवकाळी पाऊस बरसून मोठे नुकसान झाले होते. सप्टेंबर महिन्यातही परतीच्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांना फटका देणारे असेच मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी झालेल्या पंचनामा नुसार नंदुरबार जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात अतीवृष्टीमुळे २ हजार ४४३ शेतकरी बांधवांच्या १ हजार ५३० हेक्टर शेतीपिकांचे नुकसान झाले होते. त्यावेळी सलग तीन दिवस चाललेल्या वादळी पावसामुळे झाडे कोसळणे, वीज पडून तीन गाईंचा मृत्यू होण्याबरोबरच शेकडो हेक्टरवरील पपई, केळी, कापूस, सोयाबीन आणि बाजरी भुईसपाट झाली होती.
नंतर ऑक्टोबर महिन्याच्या प्रारंभी वादळी पावसामुळे झाडे कोसळणे, वीज पडून तीन गाईंचा मृत्यू होण्याबरोबरच शेकडो हेक्टरवरील पपई, केळी, कापूस, सोयाबीन आणि बाजरी भुईसपाट झाले होते. नंदुरबार व आष्टे महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली होती. नंदुरबार तालुक्यातील कोपर्लीसह ओसर्ली, अमळथे, होळ, चौपाळे, न्याहली, आष्टे शिवारात मिरची, पपई, केळी, कापूस, सोयाबीन या पिकांना सर्वाधिक फटका बसला. वावद, आष्टे शनिमांडळ परिसरात देखील शेती पिकांचे नुकसान झाले. तत्कालीन पंचनामेनुसार 2000 च्या जवळपास शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असताना राज्य शासनाकडून पारित झालेल्या आदेशानुसार मात्र नंदुरबार जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टी आणि पूरामुळे ९३१ शेतकरी बाधित झाले असून त्यांच्या ४४५ हेक्टर क्षेत्रातील शेतीचे नुकसान झाल्याची नोंद आहे. यासाठी शासनाने ₹५३ लाख ९९ हजारांचा निधी मंजूर केला आहे. यावरून मोठी नाराजी व्यक्त होत आहे. आता विद्यमान स्थितीत चार दिवसापासून चालू असलेल्या मुसळधार पावसात झालेल्या नुकसानीचे पंचनामे अद्याप सुरू झालेले नाहीत त्यासाठी पाऊस थांबण्याची प्रतीक्षा केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!