नंदुरबार जिल्ह्यात धक्का देणारे पक्षप्रवेश लवकरच होतील; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा दावा

नंदुरबार – राज्यभरातून भारतीय जनता पार्टीत आणखी काही नेते आणि कार्यकर्ते प्रवेश घेताना दिसतील. नंदुरबार जिल्ह्यात देखील आश्चर्य करायला लावणारे प्रवेश होतील; अशा शब्दात भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपात इतर पक्षातून होणाऱ्या इन्कमिंग विषयी दावा केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित दादा पवार यांच्या विषयी अधिक भाष्य करणे त्यांनी टाळले, मात्र भाजपात येणाऱ्यांचे स्वागत केले जाईल असेही म्हणाले.

भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष पद जानेवारीपर्यंत आहे तसेच राहील असे संकेत देऊन प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले की पक्षांतर्गत संघटनात्मक बदल इतक्यात होणार नाहीत जानेवारी नंतर केले जातील.
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे राज्यभर दौरे चालू असून त्या अंतर्गत आज दिनांक 13 सप्टेंबर रोजी ते नंदुरबार दौऱ्यावर आले. भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. त्या प्रसंगी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरात त्यांनी ही शक्यता वर्तवली. राज्याचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित, भाजपाचे आमदार राजेश पाडवी, माजी आमदार शिरीष चौधरी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, प्रदेश समिती सदस्य डॉक्टर शशिकांत वाणी, माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी आणि भाजपाचे सर्व प्रमुख कार्यकारणी सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.
काँग्रेसचे माजी आमदार एडवोकेट पद्माकर वळवी हे भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेणार असल्याची शक्यता वर्तवणारी चर्चा काही दिवसांपूर्वी होती. या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले की ज्याप्रमाणे राज्यात अचानक मुख्यमंत्री बदलून सत्तांतर घडताना दिसले, त्यासारखेच आश्चर्य करायला लावणारे पुढे घडेल आणि आणखी काही नेते भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेताना दिसतील.
अजित दादा पवार हे त्यांच्या पक्ष नेत्यांवर नाराज असणे,  पक्षातील कोणाशी त्यांचे वाद असणे , या सर्व त्यांच्या पक्षांतर्गत भानगडी आहेत. आम्हाला त्याच्याशी घेणेदेणे नाही. भाजपात त्यांनी यावे यासाठी आम्ही त्यांना फोन केलेला नाही आणि करणारही नाही परंतु राष्ट्रवादी असो की उद्धवसेना असो की काँग्रेस असो कुठूनही जे कोणी चांगले कार्यकर्ते येत असतील त्यांचे भाजपा स्वागत केले जाईल. पक्षात बाहेरून आलेल्यांची गटबाजी निस्तरायला आमचा पक्ष समर्थ आहे; असे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले.
कुपोषण निर्मूलन विषयी बोलताना त्यांनी सांगितले की विद्यमान सरकार अधिक काळजीपूर्वक उपाययोजना करीत आहे त्यामुळे आदिवासी विकास विभागाचा निधी अन्यत्र वळवून भलत्या मार्गी लावण्याचे प्रकार यापुढे घडणार नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!