नंदुरबार जिल्ह्यात महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद; आघाडीकडून निवेदन तर प्रहारचे ‘जोडे मारो’ आंदोलन

नंदुरबार-  महा विकास आघाडी घटक पक्षांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला नंदुरबार जिल्ह्यातून संमिश्र प्रतिसाद मिळाला. दरम्यान केंद्र शासनाच्या निषेधार्थ नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली तसेच निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना निवेदन देण्यात आले. नंदुरबार, नवापूर, तळोदा, अक्कलकुवा, शहादा, धडगाव येथील तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांनाही निवेदन देण्यात आले.
    नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटी तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नंदुरबार जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले होते. परंतु नवरात्र दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोरोना काळानंतर सुरू झालेली बाजारपेठ बंद करण्याची मानसिकता व्यापाऱ्यांनी दर्शविली नाही त्यामुळे बहुसंख्य दुकान आणि व्यवस्थापन चालू असल्याचे पहायला मिळाले.
महाराष्ट्र बंद आंदोलना दरम्यान आज नंदुरबार येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांची तत्काळ हकालपट्टी करा; अशी मागणी करीत प्रहार शेतकरी संघटनेतर्फे प्रतिकात्मक पुतळ्यास ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले. मात्र पोलिसांनी तात्काळ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर प्रहार संघटनेतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनावर प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन पाटील, उपाध्यक्ष रवींद्र वळवी, तालुकाध्यक्ष योगेश पाटील, प्रताप पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते कृष्णदास पाटील यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.
    महाराष्ट्र बंद ला लोक संघर्ष मोर्चा व संयुक्त किसान मोर्चानेही पाठींबा दिला. आम्ही संयुक्त किसान मोर्चाशी सलग्न संघटना मागील ११महिन्यापासून संविधानाच्या चौकटीत लोकशाही मार्गाने संघर्ष करीत आहोत व जो पर्यंत केंद्र सरकार तीन कृषी कायदे रद्द करीत नाहीत तो पर्यंत आम्ही दिल्लीच्या सीमांवर लढत राहू व शक्य असेल तेव्हा राज्याराज्यांत संघर्षही उभा करू, असे लोक संघर्ष मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रतिभा शिंदे, कथा वसावे, सचिन धांडे,आतिश जगताप, भरत कर्डिले, प्रकाश बारेला,ताराचंद पावरा, ईश्वर पाटील (लाला सर), चंद्रकांत चौधरी, अशोक पवार, पन्नालाल मावळे, सुप्रिया चव्हाण, तेजस्विता जाधव, केशव वाघ, सोमनाथ माळी यांनी निवेदनात म्हटले आहे. दरम्यान लोक संघर्ष मोर्चाच्या जळगाव, नंदुरबार, बुलढाणा, धुळे, औरंगाबाद, पुणे, सातारा ,नाशिक , यवतमाळ येथील सर्व प्रतिनिधी या आंदोलनात सामील झाले.
दरम्यान, काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून एकत्रितपणे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लोकशाही मार्गाने सुरू केलेल्या आंदोलनाला दडपण्याचा प्रयत्न केंद्रातील सरकार सातत्याने करीत आहे. त्याचा निषेध म्हणून जिल्ह्याचे पालक मंत्री एडवोकेट के सी पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, माजी मंत्री पद्माकर वळवी, काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांच्या नेतत्वाखाली बंद पुकारण्यात आला. देशामध्ये शेतकरी विरोधी कायदे करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो. यापुढेही केंद्रातील सरकारने शेतकऱ्यांचे आदोलन बळाचा वापर करून उधळन लावण्याचा प्रयत्न केल्यास महा विकास आघाडी सरकारचे सरकारमध्ये सामील असेल. केंद्र सरकारने शेतकांच्या विरोधामध्ये पारित केलेले काळे कायदे त्वरित रद्द करावे असे निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक, सेवादलाचे जिल्हा कार्याध्यक्ष एजाज बागवान, चिटणीस पंडित पवार, विश्वास वळवी, महेश गव्हाणे, रवींद्र कोठारी, शांतीलाल  पाटील ,रऊफ शाह, दिलावर शाह, स्वरूप बोरसे, शमा शेख, भावना गवाले यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!