नंदुरबार झेडपीतील भाजपाच्या सत्तेत उद्धव सेनेची लॉटरी, काँग्रेसलाही मिळाले सभापतीपद

नंदुरबार-  नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सभापती पदांची निवड अपेक्षेप्रमाणे बिनविरोध पार पडली तथापि निवड चालू असतानाच शहादा तालुक्यातील जयश्री दीपक पाटील या ज्येष्ठ सदस्या निघून गेल्यामुळे त्याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले. उद्धव सेनेला दोन सभापतीपद देण्यात आले हे देखील आजच्या निवडीचे विशेष ठरले.
नंदुरबार जिल्हा परिषदेत 56 सदस्य असून त्यात उद्धव सेनेचे फक्त दोनच सदस्य आहेत. परवा घडलेल्या सत्तांतर नाट्यप्रसंगी उद्धवसेनेच्या या दोन सदस्यांनी म्हणजे शंकर पाडवी आणि गणेश पराडके यांनी भारतीय जनता पार्टीला साथ दिली. त्याची परतफेड म्हणून भारतीय जनता पार्टीने चक्क या दोघांना सभापती पद बहाल केले. या उलट शहादा तालुक्यातून सत्तापालटासाठी सहकार्य उभे करणारे ज्येष्ठ नेते दीपक पाटील आणि माजी उपाध्यक्ष जयपाल सिंह रावल यांना मोठी अपेक्षा होती व तसे असताना त्यांना कोणतेही सभापती पद मिळाले नाही.
नंदूरबार जिल्हा परिषदेच्या चार सभापती पदासाठी आज विशेष सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी समाज कल्याण सभापती पदी उबाठा शिवसेनेचे शंकर आमश्या पाडवी, महिला बालकल्याण सभापती पदासाठी भाजपाच्या सौ. संगीता भरत गावीत, विषय सभापती पदासाठी उबाठा शिवसेनेचे गणेश रुपसिंग पराडके व काँग्रेसच्या हेमलता शितोळे बिनविरोध झाले. या सर्व सभापतींचा कार्यकाळ सव्वा वर्षासाठी राहणार आहे त्यानंतर अन्य सदस्यांना या पदांवर संधी देण्यात येईल.
खासदार डॉक्टर हिना गावित यांनी पत्रकारांना याविषयी अधिक माहिती देताना सांगितले की आमच्याकडे बहुमत असून अनेक सदस्य सभापती पदासाठी इच्छुक होते त्यामुळे सभापती पदाचा कार्यकाळ सव्वा सव्वा वर्षात विभागून देण्यात येणार आहे त्यामुळे पुढील सव्वा वर्ष अन्य सदस्यांना संधी देता येईल. कोणाचीही नाराजी नाही सभा त्याग कोणी केलेला नाही, असेही खासदार हिना गावित म्हणाल्या.
परवा म्हणजे दिनांक 17 ऑक्टोबर 2022 रोजी काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव सेनेच्या सदस्यांनी बंडखोरी करीत नंदुरबार जिल्हा परिषदेतील काँग्रेस आणि शिंदे गटाची शिवसेना यांच्या हाती असलेली सत्ता संपुष्टात आणआणली व भारतीय जनता पार्टीला साथ देत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपाच्या डॉक्टर सुप्रिया गावित यांना तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे सुहास नाईक यांना बहुमताने निवडून दिले. यामुळे आज दिनांक 20 ऑक्टोबर 2022 रोजी होणाऱ्या सभापती पदाच्या निवडी प्रसंगी बहुमतात असलेल्या भाजपा, उद्धवसेना व काँग्रेसचा बंडखोर गट यांचे उमेदवार बिनविरोध निवडून येतील हे आधीच स्पष्ट दिसत होते. परंतु ऐनप्रसंगी शहादा तालुक्यातील सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांच्या पत्नी सौ जयश्री पाटील व काँग्रेसच्या हेमलता शितोळे यांच्यापैकी कोणी माघार घ्यावी यावरून सभा चालू असताना रस्सीखेच झाली. जयश्री पाटील यांनी अर्ज माघारी घेतल्यावर हेमलता शितोळे देखील आपोआपच बिनविरोध निवडून आल्या दरम्यान ती निवड घोषित होण्याआधीच पत्रकारांदेखत जयश्री पाटील या सभा सोडून निघून गेल्या.
—————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!