नंदुरबार – येथील जिल्हा परिषदेच्या ११ गटात आणि पंचायत समितीच्या १४ गणात झालेल्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीला रोखण्यात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना यश मिळाले असून जिल्हा परिषदेतील सत्ता काँग्रेस आणि शिवसेनेच्याच ताब्यात राहणार हे स्पष्ट झाले आहे. पालकमंत्री के सी पाडवी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने तर चंद्रकांंत रघुवंशी यांच्या नेतृत्वात शिवसेनेने आधीपेक्षा जास्त जागा मिळवून शहादा व नंदुरबार विधानसभा मतदार संघात भाजपाला धक्का दिला आहे. आता हे नेते नंदुरबार जिल्हा परिषदेतील प्रमुख पदांविषयीचे सूत्र जुने आहेे तसेच ठेवतात की, नवा भिडू नवा डाव असे म्हणत बदल केले जातात; याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
पोट निवडणुकीचे आज जाहीर झालेले निकाल अनेक अर्थाने महत्त्वाचे ठरले. गटाच्या आणि गणाच्या दार संघात मतदार संघात झालेले मतांचे विभाजन मोठे मजेदार असून अनेक वर्षानंतर खरोखरची राजकीय रस्सीखेच चालू झाल्याचे निकाल पत्रातील आकड्यांवरून कळते. भाजपाला नामुष्की झेलावी लागली आहे. भारतीय जनता पार्टीला म्हणजे पर्यायाने डॉक्टर विजयकुमार गावित गटाला आपण मात देऊ शकतो; हा विश्वास महाआघाडीच्या घटक पक्षात निर्माण करणारे चित्र निकालातून पुढे आले आहे. या रस्सीखेचमुळे जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेचे सूत्र बदलेल की तसेच राहिल, हा प्रश्न कार्यकर्त्यांची उत्सुकता वाढवून गेला आहे
शिवसेनेचे विजयी उमेदवार तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे पुत्र एडवोकेट राम रघुवंशी यांनी उपाध्यक्ष पद शिवसेनेकडेच राहील, असे ठामपणे माध्यमांसमोर सांगितले. यामुळे शिवसेना आपला हिस्सा आहे तसाच कायम ठेवण्याच्या भूमिकेत राहील, याचे संकेत एक प्रकारे दिले गेले आहेत. तथापि पालकमंत्री एडवोकेट के सी पाडवी यांच्या भगिनी गीता पाडवी यांचा राजकारणात प्रथमच प्रवेश झाला असून त्या खापर गटातून विजयी झाल्या आहेत. जिल्हा परिषदेत त्या केवळ सदस्य म्हणून बसतील की, मानाच्या पदावर बसतील? हे पुढे पाहायला मिळेल. त्यांना मानाचे पद मिळावे असा प्रयत्न झाल्यास कोणत्या सभापतीला कात्री लागेल, हे पहाणे औत्सुक्याचे राहणार आहे.
जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्षा एडवोकेट सीमा वळवी यांची पहिलीच राजकीय टर्म आहे. माजी मंत्री पद्माकर वळवी यांच्या त्या कन्या आहेत. शहादा तसेच अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातील पद्माकर वळवी समर्थकांच्या भावना राखण्यासाठी अडवोकेट सीमा वळवी यांना अध्यक्षपद देण्यात आले होते. ते आता तसेच राहील का? हे जिल्हा परिषदेतील नव्या सत्ता गणितावर अवलंबून राहणार आहे.
दरम्यान, दीड वर्षांपूर्वी निवडणूक झाली तेव्हा भाजपा २३, कॉंग्रेस २३, शिवसेना ७ आणि राष्ट्रवादी ३ असे संख्याबळ होते. शिवसेना आणि काँग्रेस मिळून 30 चे संख्याबाळ पूर्ण होत असल्याने त्याप्रसंगी दोघं मिळून सत्ता स्थापन केली होती. राष्ट्रवादीचे तीन सदस्य मात्र भाजपा सोबत राहिले होते. आता काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षांचे संख्याबळ पूर्वीपेक्षा एकेक जागेने वाढले. निकाला अंती जिल्हा परिषदेतील काँग्रेस 24 शिवसेना 8 आणि राष्ट्रवादी तीन असे संख्याबळ बनले. डॉक्टर अभिजीत मोरे यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रवादी काँग्रेस निश्चितच आघाडी सोबत राहण्याची भूमिका घेईल. परिणामी हे तीनही घटक पक्ष एकत्र आल्यास मजबूत आघाडी जिल्हा परिषदेत पाहायला मिळणार आहे.
विशेष असे की प्रत्येक पक्षातील प्रत्येक प्रमुख नेत्यांच्या घरातील प्रमुख सदस्य रिंगणात उतरवला गेल्याने ही पोटनिवडणूक आणखीन लक्षवेधी बनली होती. कोपर्ली गटातून ३००० मतांचे अधिक्य मिळवून ऍड.राम रघुवंशी विजयी झाले आहेत. त्यांनी उपाध्यक्ष पदावरून सुरु केलेला राजकीय प्रवास आता पुन्हा सुरु राहणार आहे. माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या घरातील चौथा सदस्य म्हणजे डॉ.सुप्रिया गावित यांचे या निमित्ताने राजकारणात पदार्पण झाले आहे. कोळदा गटातून १३६९ चे मताधिक्य घेऊन त्या विजयी झाल्या आहेत. मात्र डॉ.विजयकुमार गावित यांचे पुतणे पंकज गावित यांना राम रघुवंशी यांच्या समोर पराभव पत्करावा लागला. भाजपाचे माजी जिल्हा अध्यक्ष नागेश पाडवी पराभूत होणे शहादा तालुक्यातील भाजपाचे गण घटून काँग्रेसचे वाढणे अशा गोष्टी भाजपाची नामुष्की दर्शवणाऱ्या आहेत.