नंदुरबार – ग्राहकांना आपल्या हक्काची जाणीव व्हावी यासाठी येथील तहसील कार्यालयाच्या आवारात राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त माहिती प्रदर्शन लावण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र ग्राहक पंचायतचे नंदुरबार तालुका अध्यक्ष तसेच वैधमापन शास्त्र निरीक्षक सोमनाथ महाजन, नायब तहसीलदार दिनेश गावित, पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार रमेश वळवी व अन्य उपस्थित होते. याप्रसंगी भाऊसाहेब थोरात यांनी सांगितले की, प्रत्येक ग्राहकांनी आपल्या हक्कांविषयी जागृत राहणे आवश्यक आहे. या माहिती प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांना सेवा देणे सोयीचे ठरणार आहे. या माहिती प्रदर्शनात धुळे व नंदुरबार वैधमापन विभाग, पुरवठा शाखेतर्फे शिधापत्रिका बाबत माहिती देण्यात आली. तसेच गॅस एजन्सी तर्फे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.पुरवठा निरीक्षक रामराज वाडेकर, रवी बोकुळे, महसूल सहाय्यक रुपेश रोडे, संदीप वाडीले, सोमा सोनवणे,अव्वल कारकून श्रीमती जानी पावरा यांनी माहिती प्रदर्शनाचे संयोजन केले. शेकडो ग्राहकांनी दिवसभरात प्रदर्शनाला भेट देऊन माहिती जाणून घेतली.