नंदुरबार – आज दुपारी भर दिवसा नंदुरबार शहरातील उमापती महादेव मंदिर परिसरात एका तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. दंगलीची घटना वेळीच आटोक्यात आणून शांतता राखण्यात पोलिसांना यश आलेले असताना लगेचच भर दिवसा झालेल्या खुनाच्या आजच्या घटनेमुळे संपूर्ण शहर हादरुन गेले. दरम्यान एका संशयताला अटक करण्यात आली असून स्थिती नियंत्रणात राखण्यात पोलिसांना यश आले आहे.
अधिक वृत्त असे की, नंदुरबार शहरात नवापूर बायपास पासून साक्री नाका परिसराकडे जाणारा एक आडरस्ता असून या रस्त्यावरच अत्यंत एकांतात निर्जन स्थळी उमापती महादेव मंदिर आहे. या मंदिरालगत आज रविवार दिनांक 9 एप्रिल 2023 रोजी दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. हे वृत्त कळताच नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक तांबे, उपविभागीय अधिकारी सचिन हिरे, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली. ज्याचा खून झाला त्याचे नाव कृष्णा अप्पा पेंढारकर असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. पोलिसांना त्याच्या डोक्यावर पोटावर आणि अन्य ठिकाणी गंभीर जखमा आढळून आल्या. पुढील तपासाचा भाग म्हणून मृतदेह लगेचच शासकीय जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला.
दरम्यान, जमिनीच्या व पैशाच्या वादातून गोळ्या घालून हा खून झाला तसेच मारेकरी स्वतःच पोलीस ठाण्यात दाखल झाला; अशी चर्चा शहरात पसरली होती. तथापि जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, हा खून चाकू भोसकून झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे गोळी झाडल्याचे अद्याप निष्पन्न झालेले नाही तथापि ती तपासणी केली जात आहे. खून कोणत्या कारणाने झाला हेही अद्याप स्पष्ट व्हायचे आहे. त्याचा तपास केला जात आहे. संशयावरून एकाला अटक करण्यात आली असून मयत कृष्णा पेंढारकर यांच्या नात्यातीलच हा संशयित आहे. त्यामुळे या प्रकरणाला घरगुती वादाचे संदर्भ असल्याचे तपासातून पुढे येत आहे; , असे जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांनी सांगितले. संशयित आरोपी नंदुरबार पासून जवळच असलेल्या खामगाव परिसरातील असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कृष्णा पेंढारकर याच्यावर पूर्वीपासून काही गुन्हे दाखल आहेत व त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारीशी संबंधित असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. खुनाची घटना घडली त्या ठिकाणी काही अंतरावर एक दुचाकी पडलेली आढळली. कृष्णा पेंढारकर त्या गाडीवरून आला असावा आणि पाठलाग करणाऱ्या हल्लेखोरांच्या तावडीतून सुटण्यासाठी तिथे झटापट झाली असावी, असा कयास लावण्यात येत आहे. कृष्णा पेंढारकरचा संघटनात्मक काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांशी संबंध होते त्यामुळे घटना कळताच मोठ्या संख्येने काही तरुण धावून आले. घटनास्थळी तसेच पोलीस ठाण्यात जमाव जमला होता. परंतु पडसाद उमटू नये, याची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील आणि अन्य अधिकारी यांनी शहरात ठिकठिकाणी वेळीच बंदोबस्त लावला तसेच खामगाव येथे देखील बंदोबस्त लावण्यात आला. त्यामुळे सायंकाळी उशिरापर्यंत कोणताही अनुचित प्रकार घडला नव्हता. सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया चालू होती.