नंदुरबार – महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या सहायक सरकारी अभियोक्ता (गट-अ) परीक्षेत नंदुरबार तालुका विधायक समितीचे विधी महाविद्यालय, कायदेविषयक शिक्षण व संशोधन संस्था, नंदुरबार येथील एकूण १७ विद्यार्थी पात्र झाले आहेत. त्यात ६ आदिवासी विद्यार्थी व ३ आदिवासी विद्यार्थिनी यांचा समावेश आहे.
कायदा शिक्षणाची सोय नंदुरबार या दुर्गम व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना नंदुरबार जिल्ह्यातच उपलब्ध व्हावी या हेतूने भारताचे माजी ॲडिशनल सॉलिसिटर जनरल ॲड.राजेंद्र रघुवंशी यांच्या संकल्पनेतून व प्रयत्नांमुळे सन १९९९ मध्ये नंदुरबार तालुका विधायक समितीने विधी महाविद्यालयाची स्थापना केली. या वर्षी महाविद्यालयाचा रोप्य महोत्सवाची सुरुवात होणार आहे. महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी हे न्यायाधीश, सरकारी वकील, प्राध्यापक, जिल्हा व उच्च न्यायालयाचे वकील म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या सहायक सरकारी अभियोक्ता (गट-अ) सन २०२२ च्या परीक्षेत महाविद्यालयाचे एकूण १७ विद्यार्थी पात्र झाले आहेत. त्यात ॲड. वर्षा वसावे, ॲड. लक्ष्मी पावरा,ॲड. वनिता वळवी,ॲड. गोमता पावरा,ॲड. कुवरसिंग वळवी,ॲड. रोहिदास पाडवी,ॲड. ईश्वर वळवी,ॲड. सुनील वळवी,ॲड.चेतन वळवी,ॲड. राजेंद्र मोरे,ॲड. चेतन भोई,ॲड. ज्ञानेश्वर पाटील, ॲड. पूजा भावसार, ॲड. प्रवीण ठाकरे, ॲड. सय्यदअली महफूजअली, ॲड.जितेंद्र गंगावणे, ॲड. सचिन पाटील यांच्या समावेश आहे. नंदुरबार या आदिवासी व दुर्गम भागात गरिबीच्या परिस्थितीतून या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले असून त्यांची निवड झाल्याने ॲड.राजेंद्र रघुवंशी यांची स्वप्नपूर्ती झाल्याचे सिद्ध होते. या सर्व विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल नंदुरबार तालुका विधायक समितीचे चेअरमन माजी आमदार श्री.चंद्रकांतजी रघुवंशी, व्हाईस चेअरमन श्री.मनोजभैया रघुवंशी व सर्व संचालक मंडळाने अभिनंदन केले आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.डी.चौधरी सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या यशाबद्दल या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.