नंदुरबार – विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वाऱ्याने आणि पावसाने थैमान घातल्यामुळे पिकांची आणि बाजारपेठेचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान नवापूर आणि नंदुरबार येथे वीज पडून चार जनावरांचा मृत्यू झाला तर काही ठिकाणी झाडे कोसळले व घरांचे पत्रे उडाले.
तळोदा अक्कलकुवा धडगाव आणि नंदुरबार या तालुक्यांमध्ये आज दिनांक 6 मार्च 2023 रोजी दुपार
तीन ते पाच वाजे दरम्यान धुळीच्या वादळासह अचानक आलेल्या पावसाने मोठे थैमान घातले. होळी सणा निमित्त नंदुरबार नवापूर तळोदा अक्कलकुवा धडगाव या प्रत्येक तालुक्यातालुक्यातील प्रमुख गावांमध्ये बाजारपेठा सजलेल्या होत्या. त्यातून मोठी आर्थिक उलाढाल घडत असते. परंतु आज ऐन होळीच्या दिवशी प्रचंड धुळीचे लोट आणि सोसाट्याचा वारा यामुळे एक ठिकाणच्या बाजारपेठा जवळपास उध्वस्त झाल्या. अवकाळी पावसामुळे मांडलेली दुकाने आवरताना आणि विक्रीचे सामान वाचवताना एकच धावपळ उडाली.
वीज कोसळून जनावरांचा मृत्यू
दरम्यान अक्कलकुवा तालुक्यातील प्रसिद्ध काठी येथील तसेच नंदुरबार मधील होलिकोत्सवाच्या उत्साहावर पाणी फिरले. प्रत्येक तालुक्याच्या तहसील कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार गारपीट झाल्याचे अद्याप माहिती नाही तथापि पिकांच्या नुकसानीची माहिती घेतली जात आहे. नवापूर तालुक्यात वीज पडून एक म्हैस दगावली. नंदुरबार तालुक्यात कंढरे गावात वीज पडून तीन जनावरांचा मृत्यू झाला.
9 मार्च पर्यंत पावसाचे वातावरण
दरम्यान आज 6 मार्च 2023 रोजी नंदुरबार जिल्ह्यातील किमान तापमान: १९.६ अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान: ३४.० अंश सेल्सिअस इतके नोंद झाले. जिल्हा कृषि हवामान केंद्र कृषि विज्ञान केंद्र, कोळदा यांनी म्हटले आहे की, भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दि. ६ ते ९ मार्च दरम्यान हवामान ढगाळ राहील तर तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. किमान तापमान १४ ते १८ व कमाल तापमान ३४ ते ३७ अंश सेल्सिअस राहील. हलक्या पावसाची शक्यता असल्याने हरभरा, गहु, इत्यादी पक्वता अवस्थेत असलेल्या पिकांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
तालुकानिहाय हवामान अंदाज
नंदुरबार व नवापूर तालुका : दि. ६ ते ९ मार्च दरम्यान हवामान ढगाळ राहील तर तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. किमान तापमान १४ ते १६ व कमाल तापमान ३५ ते ३७ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
*शहादा, अक्कलकुवा व तळोदा तालुका: दि. ६ ते ९ मार्च दरम्यान हवामान ढगाळ राहील तर तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. किमान तापमान १३ ते १६ व कमाल तापमान ३४ ते ३६ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
*अक्राणी तालुका : दि. ६ ते ९ मार्च दरम्यान हवामान ढगाळ राहील तर तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. किमान तापमान १४ ते १५ व कमाल तापमान ३३ ते ३५ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
यालाच म्हणतात अस्मानी सुलतानी कहर…सरकार नुकसानभरपाई देत नाही आणि पिक विमा कंपनी नोंद घेत नाही. शेतकऱ्यांना वालीच उरला नाही.!😔😢😭
मायबाप सरकारने त्वरीत नुकसानीचे पंचनामे करुन नुकसानीची भरपाई त्वरित द्यावी.