नंदुरबार- स्फोटक शोधणारे जिल्हा पोलिस दलातील प्रशिक्षित श्वान ‘ब्राऊनी’च्या साह्याने बॉम्ब शोधक पथकाला वर्दळीच्या ठिकाणी तपासणी करताना पाहून काही काळ सामान्य नागरिक धास्तावले. परंतु दक्षता म्हणून तपासणी केली जात असल्याचे समजताच सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.
शहर आणि जिल्ह्यात नवरात्र उत्सवा दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून नंदुरबार शहरातील रेल्वे स्थानक, बस स्थानक, खोडाई माता मंदिर येथील वर्दळीच्या परिसरात घातपात विरोधी पथकातर्फे तपासणी अभियान राबविण्यात येत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, शहर पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सुजित डांगरे यांच्या बॉम्ब शोधक व नाशक पथकाने भेट देऊन नंदुरबार बस स्थानक, रेल्वे स्टेशन आणि खोडाईमाता मंदिर परिसरात तपासणी अभियान राबविले. यावेळी बॉम्ब शोधक व नाशक पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल गुलाब वळवी, नीलकंठ भामरे, पोलिस नायक राजेंद्रकुमार गावित, सुनीलकुमार सूर्यवंशी, पोलीस कॉन्स्टेबल मयूर माळी, अमोल देशमुख, सहभागी झाले होते.